Home »Mukt Vyaspith» Fruits Of Worshiping

आशीर्वाद फळास आला

दयानंद तुकाराम कोरे, सोलापूर | Feb 08, 2013, 02:00 AM IST

  • आशीर्वाद फळास आला

नेहमी थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे म्हणतात. जीवन जगण्याच्या धुंदीत अनेकदा आपल्याला त्याचे महत्त्वच कळत नाही. मला त्या वेळी मिळालेला आशीर्वाद आणि त्याचे मिळालेले फळ यांची आठवण अजूनही अंग रोमांचित करते. एका मे महिन्यात मी सकाळी मोटारसायकलवरून शाळेत निघालो होतो. गावाच्या बाहेर साधारण एक किलोमीटर अंतरावर मला एक वृद्ध स्त्री डोक्यावर गाठोडे घेऊन पाठमोरी चालताना दिसली. हॉर्न वाजवल्यानंतर ती थोडीशीच सरकली; पण रस्ता पूर्ण सोडला नाही. मी सहज म्हणून मागे वळून पाहिले तर काय? ती वृद्धा माझ्या शेजारीच राहणारी होती. इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालात, असे मी विचारले तेव्हा असे समजले की, त्या वृद्धेचे तिच्या सुनेशी व मुलाशी भांडण झाले होते. त्यामुळे ती आपल्या माहेरी रागारागाने चालली होती. तिचे माहेर 15 किलोमीटर लांब होते. तेव्हा तिला गाडीवर मागे बसण्यास सांगितले. तिला गाठोडे घेऊन नीट बसताही येईना,तेव्हा ती दोन्ही पाय मागे टाकून बसली.

गाडी चालू असतानाच ती रात्री घरात झालेल्या भांडणाची कहाणी सांगत होती. मी तिची कर्मकहाणी निमूटपणे ऐकून घेतल्याबद्दल तिला समाधान वाटले असावे. कारण, गाडीवर बसल्याबसल्याच तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवून, माझ्या मास्तरचं लगीन लवकर होऊ दे, असा तोंडभरून आशीर्वाद दिला. एकदा नाही तर अनेकदा दिला. त्या वृद्धेला मी मुख्य रस्त्याशी आणून सोडले. त्या वृद्धेच्या आशीर्वादाचा प्रभाव म्हणा किंवा काहीही म्हणा, त्याच महिन्यात मी एक मुलगी पाहिली आणि त्यानंतरच्या केवळ चारच दिवसांत माझे लग्नही पार पडले. आपला आशीर्वाद असा फळास आला हे त्या वृद्धेच्या गावीही नव्हते.

Next Article

Recommended