आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 दिवसांत 27 वाहनांवर 7 लाखांचा इंधन खर्च; तरीही ‘अवनी’ टप्प्याबाहेरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पांढरकवडा येथील हल्लेखोर ‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी १७ सप्टेंबर २०१८ रोजी वन विभागाने मोहीम सुरू केली. या मोहिमेला २७ आॅक्टोबर रोजी एक महिना ०७ दिवस म्हणजे ४० दिवस पूर्ण झाले. सुरुवातीला जुजबी स्तरावर असलेली मोहीम वाघिणीने घेतलेल्या बळींची संख्या वाढल्यावर व माध्यमांत प्रकरण गाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हाती घेतली. सध्या २७ वाहने माेहिमेत आॅन ड्यूटी आहेत. यात २ जिप्सी फक्त पेट्रोलवर चालणाऱ्या आहेत. ४० दिवसांत २७ वाहनांवर ७ लाख ११ हजार ८०२ रुपये ३० पैसे इंधनावर खर्च झाल्याची माहिती वनाधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.   


सध्या मोहिमेवर असलेल्या २७ वाहनांमध्ये ०२ जिप्सी, ३ स्काॅर्पिओ, १ मोठी आणि १ लहान रेस्क्यू व्हॅन, वाघिणीला शिकार करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या वाहतुकीसाठी महिंद्राचे १ वाहन, १ ट्रॅक्टर, १ ट्रक तसेच वनाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. वाघिणीला ट्रँक्विलाइज करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची वाहतूक छोट्या रेस्क्यू व्हॅनमधून होते. वाघिणीने शिकारीसाठी जंगलाबाहेर येऊ नये म्हणून तिच्यासाठी घोडा, बैल, बकरी आदी प्राण्यांची वाहतूक एका व्हॅनमधून केली जाते. तर मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, पाणी तसेच अन्य साहित्य ट्रकमधून पाेहोचवण्यात येते.   

 

वन संरक्षकाच्या वाहनावर रोज ९ लिटर इंधन खर्च   
वाघिणीला पकडण्यासाठी लावलेला बेस कॅम्प कंपार्टमेंट नं. १५० मध्ये राळेगाव तालुक्यातील सराटी येथे आहे. प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा सध्या पांढरकवडा येथे तळ ठोकून आहेत. पांढरकवडा ते राळेगाव बेसकॅम्प हे अंतर सुमारे ४५ किमी आहे. सकाळी एक आणि सायंकाळी एक अशा दिवसातून दोन फेऱ्या होतात. एका गाडीला एका फेरीसाठी सरासरी साडेचार लिटर इंधन लागते. त्यानुसार दोन फेऱ्यांसाठी किमान ९ लिटर इंधन लागते.  

 
वाहनांमध्ये २५ वाहने डिझेलवर चालणारी तर २ जिप्सी पेट्रोलवर चालणाऱ्या आहेत. पांढरकवडा येथे आजघडीला पेट्रोलचे दर ८७.५५ पैसे, तर डिझेल ७८.०५ पैसे आहे. एका गाडीला दिवसाला ९ लिटर या हिशेबाने सुमारे ७०६ रुपयांचे डिझेल लागते. २५ गाड्यांसाठी १७,६६२ रुपये होतात. ३७ दिवसांचे एकूण ६ लाख ५३ हजार ४९४ रुपयांचे डिझेल लागले. तर एका गाडीला दिवसाला ९ लिटर या हिशेबाने सुमारे ७८८ रुपयांचे पेट्रोल लागते. २ गाड्यांसाठी १,५७५ रुपये होतात. ३७ दिवसांचे एकूण ५८ हजार ३०८ रुपयांचे पेट्रोल लागले. दोन्ही मिळून एकूण ७ लाख ११ हजार ८०२ रुपये ३० पैशांचा इंधन खर्च आतापर्यंत झाल्याचा अंदाज आहे.  

 

नबाब शाफतअली खानवर फक्त जेवणाचा खर्च   
नेमबाजीचे राष्ट्रीय विजेते व ट्रँक्विलाइज तज्ज्ञ नबाब शाफतअली खान गेल्या महिनाभरापासून तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चार ते पाच सहकारी आहेत. नबाब शाफतअली खान यांनी अजूनपर्यंत वन खात्याकडे अधिकृतरीत्या कोणत्याही शुल्काची मागणी केलेली नाही. ते व त्यांच्या सहकाऱ्यांचा नाष्टा व जेवणाचा खर्च वन विभाग करत असल्याची माहिती या वनाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.   

  

वाघीण एकदाच झाली ट्रँक्विलाइज   
वाघिणीला फेब्रुवारी २०१७ मध्ये ट्रँक्विलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या वेळी ती पूर्णपणे ट्रँक्विलाइज न होता अर्धवट बेशुद्धीत होती. त्यामुळे तिला जेरबंद करण्याची जोखीम घेण्याचे टाळल्याचे वनाधिकाऱ्याने दिली. ट्रँक्विलाइज करण्यासाठी लागणारे इंजेक्शन १० हजारांना येते. यात केटामीन व झायलाॅजीनचे १० एम. एल. मात्रेत मिश्रण करून सिरिंजमध्ये भरले जाते. एकदा केलेल्या मिश्रणाचा प्रभाव २४ तास राहतो. त्यानंतर हळूहळू प्रभाव कमी होत जातो. 

 

वाघिणीने ३ घोडे, एका रेड्यासह ४ जनावरे केली ठार   
शिकारीसाठी वाघीण जंगलाबाहेर येऊ नये व तिला जंगलातच शिकार मिळावी यासाठी वन विभागातर्फे जंगलात ठिकठिकाणी घोडा, बैल वा रेडे असे प्राणी लावले जातात. याला ‘बेट’ म्हणतात. यात बहुतांश घोड्यांचा समावेश असलेले १५ बेट लावले होते. त्यापैकी वाघिणीने ४ प्राणी मारले. यात ३ घोडे व १ रेड्याचा समावेश आहे. २ घोड्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर २ दोरी सोडून पळाले व ७ प्राणी जिवंत असल्याचे वनाधिकाऱ्याने सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...