आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलावरील कर वाढवल्याने 2.8 लाख लोकांनी फ्रान्स केले ठप्प!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्समध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांत ४०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती गृहमंत्री क्रिस्तोफर कॅस्टानर यांनी दिली. १४ जणांची प्रकृती गंभीर आहे. 

 

देशातील ८७ ठिकाणी सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शने झाल्याची माहिती आहे. आंदाेलक व पोलिसांत काही ठिकाणी धुमश्चक्रीही झाली. त्यात किमान २८ पोलिस जखमी झाले. देशातील अनेक शहरांत सुमारे २ लाख ८० हजाराहून जास्त नागरिक सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. पोलिसांनी निदर्शने सुरू असलेल्या भागात रात्रभर आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. त्यापैकी १५७ जणांना अटक करण्यात आली. अनेक आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा सापडला होता. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारची १५० ठिकाणे होती. तेथे योग्य ती कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते. 

 

महिन्यापूर्वी निदर्शने झाली होती, पण सरकारचे दरवाढीवर मौन 
फ्रान्सच्या मॅक्रोन सरकारने ग्रीन कराच्या नावाखाली करात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात सोशल मीडियावर निर्णयाच्याविराेधात आंदोलनासाठी एकजुटीचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलक पिवळ्या रंगातील जॅकेट परिधान करून रस्त्यावर उतरले आहेत. एक महिना आधीही आंदोलन झाले होते. परंतु त्याकडे मॅक्रोन सरकारने दुर्लक्ष केले. त्या मौनामुळे जनतेच्या संयमाचा बांध फुटला. 

 

भारतात यंदा पेट्रोल ९.७% , डिझेल २० %ने महाग 
भारतातही इंधन दरवाढीची झळ बसू लागली आहे. यंदा पेट्रोल दरात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. दिल्लीत जानेवारीत पेट्रोल ६९.० रुपयाहून ७६.७ रुपये लिटर झाले. अर्थात तेव्हापासून पेट्रोल ९.७ टक्के महागले. दुसरीकडे डिझेल ५९.७ रुपये लिटरवरून ७१.७ रुपये लिटर झाले. अर्थात ११ महिन्यांत डिझेल २० टक्क्यांनी महाग झाले आहे. 

 

राष्ट्रपती मॅक्रोन यांच्या लोकप्रियतेत २५ टक्क्यांनी झाली घसरण 
फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूएल मॅक्रोन यांच्या लोकप्रियतेत २५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. देशभरात इंधन दर वाढीच्या विरोधात येलो वेस्ट निदर्शने होत असतानाच निवडणूक विश्लेषण करणाऱ्या एका पाहणीचा अहवाल जाहीर झाला आहे. हा अहवाल दू दिमांशे मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात ४० वर्षीय राष्ट्रपतींच्या विरोधात नाराजी दिसून आली आहे. २१ टक्के लोकांनी साधारण कामगिरी असे म्हटले आहे. ३९ टक्के लोक तीव्र नाराज आहेत. ९ ते १७ सप्टेंबर दरम्यान ही पाहणी करण्यात आली होती. केवळ चार टक्के लोकांनीच मॅक्रोन यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. ३४ लोकांनी जवळपास असमाधान असल्याचे व्यक्त केले. त्यावरून देशातील असंतोष स्पष्ट झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...