आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान सुनील ढोपे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अंत्ययात्रेला उसळला जनसागर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा- सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांच्यावर शुक्रवारी (२१ सप्टेंबर) येथील सारंग तलावाजवळच्या हिंदू स्मशानभूमीत दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रशासनाच्या वतीने मृत्यूच्या तब्बल ६ दिवसानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता. ‘अमर रहें, अमर रहें, सुनील ढोपे अमर रहें’ अशा घोषणा देवून नागरिकांनी परिसर दणाणून सोडला.
       

येथील शिवाजीनगरमधील मूळ रहिवासी सुनील ढोपे हे भारतीय लष्कराच्या सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना शनिवारी (१५ सप्टेंबर) त्यांचा शिलॉंग (मेघालय) येथे संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांच्या एका ‘आॅडिओ क्लिप’च्या आधारे कुटुंबीयांनी जवान ढोपे यांची वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांनी हत्या केली असा आरोप करीत सोमवारी (१७ सप्टेंबर) जवान ढोपे यांचे शहरात दाखल झालेले पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे हे पार्थिव मागील ३ दिवसांपासून अमरावती येथील शवागारात ठेवण्यात आले होते. यादरम्यान जिल्ह्यातील महसूल व पोलीस प्रशासन , लोकप्रतिनिधी, माजी सैनिक तथा समाजसेविंनी ढोपे कुटुंबीयांनी पार्थिव ताब्यात घ्यावे यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु, जोपर्यंत याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होत नाही व ‘बीएसएफ’मधील त्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर बुधवारी (१९ सप्टेंबर) ‘बीएसएफ’च्या ’त्या’ पाच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येथील शहर पोलिसात ‘झीरो एफआयआर’ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल झाला. तसेच  गुरुवारी (२० सप्टेंबर) अनेक मान्यवरांनी पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी ढोपे कुटुंबीयांची मनधरणी केली. कारंजाचे उपविभागीय अधिकारी यांनी ढोपे यांच्या सर्व मागण्या भारताचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठवून त्याची प्रत ढोपे कुटुंबीयांना दिली. त्यामुळे ढोपे परिवाराचे समाधान झाले व त्यांनी पार्थिव स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी जवान ढोपे यांचे पार्थिव अमरावती येथून सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. त्यानंतर सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास येथील बजरंग व्यायामशाळेजवळून अंत्ययात्रा काढण्यात आली.

 

मुख्य मार्गावरून निघालेली अंत्ययात्रा सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हिंदू स्मशानभूमीत पोहोचली. याठिकाणी त्यांना ढोपे कुटुंबीय, खासदार भावना गवळी, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आमदार राजेंद्र पाटणी , माजी आमदार प्रकाश डहाके , युवक काँग्रेसचे राहुल ठाकरे, नगराध्यक्ष शेषराव ढोके, एचव्हीपीएम हेल्पलाईन चे प्रा.ए.एस.शेख, सभापती फिरोज शेकुवाले,सामाजिक कार्यकर्ते श्याम सवाई, शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर,जमीयत उलेमा-ए-हिंद के मौली मज़हर, शिवेसेनेचे डॉ.सुभाष राठोड,डॉ.महेश चव्हाण,उपविभागीय अधिकारी शरद जावळे, उपविभाागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, तहसीलदार भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदराजंली वाहिली. तदोत्तर त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या तीनदा फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.  


जवान ढोपे यांचे स्मारक उभारणार - नगराध्यक्ष ढोके
जवान सुनील ढोपे यांचा ज्याठिकाणी दफनविधी करण्यात आला त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याकरिता नगरपरिषदेच्या वतीने सर्वस्वी प्रयत्न करू तसेच ढोपे परिवाराच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी दिले आहे. 


मुस्लिम बांधवांनी मोहरमची मिरवणूक केली रद्द
 कारंजात १३ सप्टेंबर पासून गणेशेात्सव सुरू झाला. या दरम्यान सार्वजनिक मंडळासहीत घरोघरी श्री गणेशाची स्थापना झाल्याने शहरातील वातावरण भक्तीमय झाले. एवढ्यातच १५ सप्टेंबर रोजी कारंजा येथील जवान सुनील ढोपे यांच्या मृत्यूची बातमी कारंजा शहरात धडकली. आणि सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सवामधील कार्यक्रम स्थगित केले. शिवाय एकाही गणेश मंडळाने लाउडस्पिकर वाजविला नाही. तसेच २१ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्याने मुस्लिम बांधवांनी मोहरम या सणानिमित्त शहरातून काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. शिवाय अंत्ययात्रेदरम्यान शहरातील आपल्या घरासमोर तसेच चौकाचौकात उभे राहून मुस्लिम बांधवांनी जवान ढोपे यांना श्रध्दांजली अर्पण केली.  तसेच दि.१५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान दि.१६ सप्टेंबर व १७ सप्टेंबर रोजी जवान ढोपे यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला कारंजातील हिंदू मुस्लिम व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. 

बातम्या आणखी आहेत...