श्रीलंकेत पहिल्यांदाच सामूहिक अंत्यसंस्कार; ईस्टरला झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 321

दिव्य मराठी

Apr 24,2019 11:09:00 AM IST

कोलंबाे - श्रीलंकेत ईस्टरला चर्च व हॉटेलमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांतील मृतांची संख्या ३२१ वर गेली आहे. युनिसेफच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार मृतांत ४५ मुलांचाही समावेश आहे. मृत्यू पावलेले व जखमी ५०० लोकांच्या सन्मानार्थ ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले. या दरम्यान शोकसागरात बुडालेल्या श्रीलंकेत पहिल्यांदाच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. कोलंबोतील नेगोंबोच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये हा विधी पार पडला. येथेच दहशतवादी हल्ल्यात १०० लोक मृत्युमुखी पडले होते. अंत्यसंस्कारापूर्वी मृतांच्या आत्म्याला शांतता मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली व मौन पाळण्यात आले.

भारतीय मृतांची संख्या १० वर पोहोचली, १४ जणांची ओळख पटली नाही

श्रीलंकेत बाँबस्फोटातील मृत भारतीयांची संख्या वाढून ती मंगळवारी दहावर गेली आहे. कोलंबोत भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले. रविवारी झालेल्या स्फाेटात अन्य दोन भारतीय ए. मारेगौडा व एच. पुत्ताराजू यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांनी केली. भारतीयांची संख्या मिळून एकूण ३१ विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. १४ मृतांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

X