आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलात उदबत्तीच्या बरण्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट असेल; पण अजूनही ती आठवली की, हसायला येते. मुंबईत आम्ही मध्यवर्ती भागात राहत होतो. मी तेव्हा शिकत होते. त्या काळात हॉटेलिंग करण्याचे फॅड रुजलेले नव्हते. परंतु, एकदा कामानिमित्त घराबाहेर पडलो. फिरून फिरून खूप दमलो, म्हणून मामा म्हणाला, ‘चल, समोरच्या हॉटेलात जाऊया’ मी इकडे-तिकडे बघत-लाजतच हॉटेलमध्ये शिरले! टेबलावर बसल्यानंतर वेटरने फारसं काही न बोलता, माथ्यावर छिद्रे असलेल्या दोन बरण्या टेबलावर आणून ठेवल्या. त्यानंतर भरलेल्या पाण्याचे ग्लास आणून ठेवले. मामाने सांगितल्यानुसार त्याने इडली सांबर आणि कॉफीची आॅर्डर नोंदवून घेतली; पण त्याला ती सर्व्ह करायला वेळ लागत होता. पण माझ्या मनात वेगळेच विचार चालले होते, ‘या बरण्यांवर त्याने अजून उदबत्त्या कशा लावून ठेवलेल्या नाहीत.’ कदाचित तो विसरून गेला असावा, असेही वाटले. मग मामाला विचारले, ‘ए मामा! तो वेटर या बरण्यांवर लावण्यासाठी उदबत्त्या का आणत नाही.’ मामा मोठ्याने हसू लागला. मला त्याच्या हसण्याचे कारण समजले नाही. मी निरागस चेहरा करून बसले होते. त्याला पुन्हा पुन्हा विचारले, ‘सांग ना! तो वेटर उदबत्त्या लावण्यास का आणत नाही.’ मामा हंसू कसेबसे आवरत म्हणाला, ‘अगं वेडे, त्या बरण्या म्हणजे उदबत्तीघर थोड्याच आहेत? या बरण्यांत मीठ आणि तिखट असते.’ ‘ आपण खातो त्या जिनसांत कमी वाटले तर त्या बरण्या उलट्या करून घ्यायचे असते.’ मामाने नंतर आणलेल्या सांबारावर त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. ते बघितल्यावर मलाही चांगलेच हसायला आले. मोठमोठ्याने हसत होते. आजही त्या हॉटेलात मला बरण्यांबाबतचा प्रसंग आठवला की हसायला येते. तो काळच वेगळा होता. कारण लोक रूढीवादी होते. हॉटेलिंग करणे चंगळवाद समजला जात होता. हॉटेलिंग करणे तर खर्चिक बाब होती.