आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी अभियंत्यांनी केवळ सव्वा लाखात तयार केली रेसिंग कार, ताशी ७३ किलाेमीटर वेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- देखणे डिझाइन, त्याला दोन स्पार्क असलेले १२५ सीसीचे इंजीन आणि तासाला ७३ किलोमीटरचा वेग असे फीचर्स असलेली रेसिंग कार सध्या युवकांचे आकर्षण ठरली आहे. एखाद्या नामांकित कंपनीच्या रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी टीम व्हेलर फॉर्म्युला वन रेसिंग कार तयार केली आहे मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी अगोदर या कारचे डिझाइन तयार केले. त्यानंतर त्यासाठी आवश्यक स्पेअर पार्ट (सुट्या भागांची) निर्मिती केली. आता ही कार हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उतरवली जाणार आहे. 


अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणासाठी अशा प्रकारच्या विविध यंत्रांची निर्मिती करावी लागते. त्याचाच एक भाग म्हणून मत्स्योदरी महाविद्यालयातील मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एफ वन रेसिंग कार तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले. त्यासाठी त्यांनी सलग तीन महिने परिश्रम घेतले. त्यातून ही अनोखी रेसिंग कार साकारली आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उतरवण्यासाठी त्यांनी ही कार तयार केली. त्यासाठी त्यांनी या स्पर्धेच्या अटींची माहिती घेतली व त्यानुसार काम सुरू केले. साधारणपणे अशा स्पर्धांसाठी विद्यार्थी सध्या अस्तित्वात असलेल्या रेसिंग कारचीच कॉपी करतात. मात्र येथील २५ विद्यार्थ्यांनी स्वत:ची संकल्पना वापरून मनासारखी कार तयार केली. सुरुवातीला त्यांनी विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने कारचे डिझाइन तयार केले. ते करताना त्यांनी फॉॅॅर्म्युला रेसिंग कारच्या सर्व नियमांचे पालन केले. त्यानुसारच कारचे चेसिस, ट्रान्समिशन, ब्रेकिंग, स्टेअरिंग डिझाइन व फॅब्रिकेशन असे विविध पार्ट जोडले आहेत. १०६ किलो वजनाची ही कार पेट्रोलवर धावते. त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या "टीम व्हेलर" ने भारत फॉर्म्युला कार्टिंग पॉवर्ड बाय कॅड टेक्नॉलॉजी (बी.एफ.के.सी.टी.) या तामिळनाडूच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशभरातील १२० संघांमधून आठवा क्रमांक पटकावला. 

 

अशी होती टीम...
संघ प्रमुख विवेक खंडेलवाल, व्यवस्थापक प्रतीक श्रीपत, हार्दिक एल्गलवार, महेश ठोंबरे, मिलिंद राजळे, अजय देशमुख, दुर्गेश काबरे, गाडीचालक गौरव पाण्डेय व इतर विद्यार्थ्यांनी ही कार तयार केली. त्यांना प्रा.स्वप्निल ढोले, प्रा.प्रफुल्ल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. तर संस्थेचे अध्यक्ष आ. राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर. गायकवाड, प्राचार्य डॉ.एस.के.बिरादार आदींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. 


चॅलेंज २०१८ चे लक्ष्य 
भारत फॉर्म्युला कार्टी पाॅवर्ड बाय कॅड टेक्नॉलॉजी या तामिळनाडूच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून देशभरातील १२० संघांमधून आठवा क्रमांक पटकावला. आता हैदराबाद येथे होणारी स्टुडंट कार्ट डिझाइन चॅलेंज २०१८ ही स्पर्धा लक्ष्य असणार आहे. 


स्पर्धेतून सुचली संकल्पना 
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत देश पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठीच रेसिंग कारची संकल्पना सूचली. ही कार वेगळी असेल, असा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे अनेक रेसिंग कारचा अभ्यास करून त्यांनी या कारची निर्मिती केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...