आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवाची पर्वा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निसर्ग प्रत्येक प्राण्यामध्ये उपजत ज्ञान पेरतो. हे ज्ञान अर्थातच अस्तित्वाशी निगडित असतं, यात वाघासारखा प्राणी अकल्पित असं शहाणप दाखवतो. जंगलचा राजा असला म्हणून तो नसता माज करत नाही की, फुकाचा धोकाही पत्करत नाही.

 

विदर्भातील मे महिना म्हणजे, वैशाख वणवा.  मेळघाटातील जंगलात हा काळ वणव्याचा म्हणजेच आगीच्या हंगामाचा. आगीपासून जंगलाचे संरक्षण व्हावे, या हेतूने दिवसभर गस्त घालून मी नुकताच सेमाडोह पर्यटन संकुलातील निरीक्षण कुटीच्या व्हरांड्यात विसावलो होतो, तोच एका वनरक्षकासोबत एक अनोळखी इसम हजर झाला. त्याच्या अवतारावरून हा मेळघाटातील गवळी समाजाचा गुराखी असावा, हे सहजच ध्यानात येत होते. त्याच्या चेहऱ्यावरील घबराटीवरून काही तरी अनुचित घडले असल्याचे जाणवले. त्याला विचारले, ‘काय झालं?’ विनाविलंब तो बोलला, ‘साहेब, माझी म्हैस वाघाने मारली.’ मेळघाटातील गवळी समाज तसा परंपरेने जगणारा, गुरे चराईच्या प्रमुख रोजगारावर विसंबून असलेला. असे असले तरी आपली गाय, म्हैस शिकारी प्राण्याकडून संरक्षित जंगलात मारली गेल्यास, त्याची नुकसान भरपाई वन-विभागाकडून मिळते, इतके ज्ञान त्यांना एव्हाना नक्कीच झाले आहे. तशी माहिती मिळाल्यास वन-विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन खातरजमा करतात, पंचनामा करतात आणि आवश्यक तो अहवाल तयार करतात ज्याच्या आधारे संबंधित व्यक्तीस नुकसान भरपाई मंजूर होते. थोडक्यात, वाघोबाच्या अनैसर्गिक पर्यायी खाद्याचा खर्च सरकार उचलते. सुडाच्या भावनेतून वाघावर विषप्रयोग करून त्यास ठार  मारण्याच्या प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठीचा हा सरकारी प्रयत्न असतो. पण त्यासाठी घटना घडल्यापासून अठ्ठेचाळीस तासांच्या आत वन-अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करणे अनिवार्य असते, त्यात उशीर झाला, तर सरकारऐवजी त्या पाळीव प्राण्याच्या मालकाला, हा भुर्दंड सोसावा लागतो.  

 

‘नाव काय रे तुझं?’ मी. उत्तर आले, ‘तुकड्या गवळी.’ नंतर तुकड्याने सांगितले सेमाडोह-धारणी रस्त्यावर सेमाडोह पासून दोन कि.मी. अंतरावर ही घटना घडली असून, रस्त्याच्या बाजूला असलेल्या सागवानाच्या प्लॅन्टेशनमध्ये म्हैस मृत पडली आहे. तुकड्याच्या सुचनेनुसार स्थळ पंचनामा करणे, तर भागच होते, पण दिवसभराच्या थकव्यामुळे ते काम तातडीने न करता थोड्या वेळाने करता आले असते. तेवढा वेळ हाताशी होता. पण मला व्याघ्रदर्शनाची संधी खुणावू लागली होती. पंचनाम्याकरिता कागद इत्यादी साहित्य घेऊन दोन ते तीन कर्मचारी लगेच तयार झाले. अनुभवी चालक अब्दुल कहार यांनी मिनी बस काढली. व्याघ्रदर्शनाला निघाले की, साहेबांना जय्यत तयारी लागते, हे कर्मचाऱ्यांना माहीत होते. त्यानुसार त्यांनी पर्यटन संकुलातील आगारातून आवश्यक साहित्य जसे, नायलॉनच्या दोरीचा पाळणा (Hammock) सोबत घेतला. याशिवाय पाठीवरच्या सॅकमध्ये टॉर्च, दुर्बीण, पाण्याची बाटली व पार्ले-जी बिस्किटचा एक पुडा टाकला. वाघ जरी आमच्यासमोर मांसाहाराचा आनंद घेणार असला तरी आम्हाला मात्र बिस्किटाच्या पुड्यावरच समाधान मानाव लागणार होते.


थोड्याच वेळात आम्ही सेमाडोह-धारणी मार्गावर होतो. दहा मिनिटांत मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्याकडॆ मिनीबस वळली आणि केवळ शंभर मीटर अंतरावर रस्त्याच्या मधोमध मरून पडलेली म्हैस दिसली. तिच्या मानेच्या वरच्या व खालच्या भागाला सुळ्यांनी केलेली दोन खोल भोकं स्पष्ट दिसत होती. रक्तस्त्राव थांबला होता. म्हैस आकाराने खात्या-पित्या घरची वाटत होती. जखमेवरील दोन दातांच्या व्रणांमधील अंतर आणि शिकारीचा भरभक्कम आकार यावरून हा पराक्रम वाघाचाच आहे हे स्पष्ट होते. अतिरिक्त पुरावे म्हणून जमिनीवर वाघाच्या पंजांचे अस्पष्ट ठसे होते. म्हशीच्या अंगावर नखांच्या ओरखड्याशिवाय इतर कुठली जखम नव्हती. म्हशीचा मृतदेह अख्खा शाबूत होता. याचा अर्थ, वाघाने अद्याप पार्टी सुरू केली नव्हती. तुकड्या म्हणाला, ‘मी गुरे राखणीवर होतो. अचानक गुरं बुजाडली आणि सैरावैरा पळू लागली. मीसुद्धा वाट मिळेल तसा पळत सुटलो. भीतीपोटी मागे वळून पाहिले नाही त्यामुळे मला वाघ प्रत्यक्ष दिसला नाही. तिथून निसटलेल्या गुरांमध्ये माझी एक म्हैस नव्हती, म्हणून मी थेट तुमच्याकडे सूचना द्यायला आलो.’ तुकड्याचे सांगणे तर्कसंगत वाटत होते. आम्ही स्थळ-पंचनामा केला आणि त्याचे बयाण घेतले. 

 

दरम्यान माझे लक्ष मचाण बांधण्यासाठी योग्य झाड शोधण्याकडे लागले होते. पंधरा ते वीस वर्षे वय असलेल्या उंचच उंच सागवानाच्या झाडांमध्ये फांद्यांचा घेर असलेलं एकही झाड नव्हतं. थोड्याच वेळात अंधारणार होतं. आमच्याकडे वेळ कमी होता. वाघ शिकारीवर  येणार याची खात्री होती. पण धोक्याची थोडी जरी शंका आल्यास, वाघ शिकारीवर येत नसतो. जंगलातील सगळ्यात बलवान असूनही वाघ अजिबात जोखीम घेत नसतो. शिकार न खाता परत जाणे म्हणजे कमीपणा असा प्रतिष्ठेचा प्रश्न तो उभा करत नाही. सत्तेचा लहानसा भाग वाटेला आला आणि थोडी चलतीची हवा आली, की सामान्य माणसाला त्याचे प्रदर्शन केल्याशिवाय रहावत नाही. वकुबापेक्षा अधिकची जोखीम घेण्याची वृत्ती असलेल्या माणसास वाघापासून याविषयी शिकण्यासारखे आहे.

 

मेलेल्या म्हशीपासून सुमारे तीस मीटर अंतरावर ज्या बाजूने वाघ येण्याची शक्यता होती तेथील तुलनेने मोठ्या बुंध्याची दोन झाडे निवडून त्यावर आम्ही नायलॉनच्या दोरीचा पाळणा बांधला. पाळणा जामिनीपासून वीस फूट उंचीवर बांधण्यात आला.  एकच पाळणा असल्यामुळे मी एकट्याने थांबायचे असे ठरविले. अंधारू लागले होते. इथली हालचाल लवकर संपविण्याची घाई होती. मिनी बस चालक आणि इतर कर्मचाऱ्यांना ‘रात्री साडेनऊला मला घ्यायला या’ असे सांगून पिटाळले.

 

मिनी बस जाण्याच्या आवाजाच्या आधी माझे पाळण्यात स्थिरावणे आवश्यक होते कारण, बस गेल्यानंतर इतर काही चाहूल लागल्यास वाघाने येणे टाळले असते. लगेच एका झाडाच्या आधाराने वर चढत पाळण्यात विसावलो. माझ्या भाराने मध्यम आकाराची गोलाई असलेली ती झाडे परस्परांकडे झुकली. आता त्या पाळण्याची झोळी झाली आणि तान्हुल्या बाळासारखा मी झोळीत अवघडलो. पाठीला बाक आला, हालचाल करण्याची सोय उरली नाही. पाठिवरच्या सॅकपर्यंत हात पुरविणे दुरापास्त बनले. झोळीचा आकार घेतलेला नायलॉनच्या दोरीचा पाळणा जमिनीपासून वीसवरून पंधरा फुटाच्या उंचीपर्यंत खाली घसरला होता. वाघासाठी मी केवळ एका छलांगीच्या अंतरावर होतो. पण आता परतिचे दोर कापले गेले होते. मदतीसाठी हाक मारणे म्हणजे अरुण्यरुदन ठरले असते, कारण वाढत्या काळोखाशिवाय कुणीच सोबती नव्हता.

 

अर्धा तास निश्चेष्टावस्थेत पडून राहिल्यानंतर प्रथम हालचालीची चाहुल लागली! मी कानात जीव आणला. आवाज स्पष्ट होते. पण दिसत काहीच नव्हते. मचाणापासून तीस मीटरवर स्वर्गवासी म्हशीच्या अंगावरील माशांच्या घोंगावण्याचा आवाज आणि तेवढ्याच अंतरावर दुसऱ्या बाजूला तो वैशिष्ट्यपूर्ण आवाज. मिट्ट अंधारात चांदण्यांचा मंद-निळा तेवढा प्रकाश पसरला होता. अंधारात सरावलेल्या डोळ्यांमुळे तेवढा प्रकाशही मनाला उभारी देत होता. पुढील अर्धा-पाऊण तास काहीच घडलं नाही. सुमारे सव्वाशे मीटर अंतरावरील सेमाडोह-धारणी मार्गावरून थोड्या अंतराने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा आवाजच तेवढी शांतता भंग करीत होता. एव्हाना पाळण्यात पडल्या-पडल्या दीड तास उलटून गेला होता. खाली होणाऱ्या हालचालींकडे मी लक्ष केंद्रित करून होतो. आता मला ऐकू येऊ लागलेले आवाज अधिक स्पष्ट होते. नक्कीच शिकारी प्राणी सावजाच्या दिशेने पाऊल टाकत होता. इकडे भुकेने माझा जीव व्याकूळ झाला होता. पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांचे आवाज वाघोबाला ऐकू गेले, तर काय ...अशी कल्पना त्या परिस्थितीतही मला सुचून गेली आणि हसू आले. चांदण्याच्या छताखाली एका कडेवर पालथ्या अवस्थेत, जमेल तितके निरीक्षण मी करत होतो. आणि तो क्षण आला. एका कडावरच्या दोन तासांच्या हठयोगावर वाघोबा प्रसन्न झाले होते. चांदण्याच्या सौम्य निळ्या प्रकाशात एक नव्हे, दोन नव्हे तर सोबतचा एक छावा धरून एकूण तीन वाघोबांचे दर्शन झाले. अदभूत नजारा होता! मेळघाटाच्या किर्र जंगलात, भयाण शांततेत, घनघोर काळोखात प्रचंड जोखीम घेऊन केलेला वेडेपणा सार्थकी लागला होता. दोन वाघ आणि त्यांच्या पायात घुटमळणार बछडं निळसर चांदण्यात अंगावर आगळाच रंग ल्यायल्यासारखे भासत होतं. एक पेंटिंग जणू डोळ्यासमोर साकारलं होतं. त्याच सौंदर्य अवर्णनीय! पेंटिंगचा फिल कधी येऊ शकणार नव्हता. दृश्य जिवंत होत आणि पाहणारा एकमेव दर्दी मी बेहोशीत होतो! तिमिर चित्रासारखेच (Silhoutte) एक अद्भूत दृश्य मी अनुभवले होते.

 

बेहोशी उतरायला वेळ लागला नाही, कारण दोन्ही वाघ माझ्या मचाणाच्या बरोब्बर खाली येऊन उभे राहिले होते.  छावा आपला त्या दोघांच्या पायात घुटमळत होता. इतक्या काळोखातही ‘रात्र झाली, झोपी जा’ अशी कटकट त्याला कुणी करत नव्हतं. मी निपचित पडलो होतो, हे सांगण्याची गरज भासू नये कारण मी तेव्हा हललो असतो तर ही कथा तुमच्यापुढे आलीच नसती. दोन्ही सिनिअर्सना माझा गंध जाणवला असावा. त्यांनी आजूबाजूला वेध घेतला,पण वर नजर फेकली नाही कारण त्यांची नजर म्हशीवर होती. काही क्षणात पूर्ण कुटूंबाने मोर्चा म्हशीकडे वळवला. वाघ सहसा आधी केलेली शिकार पूर्णतः संपवतो आणि नंतरच दुसऱ्या शिकारीच्या प्रयत्नास लागतो. वाघोबांनी माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकते. आता ते माझ्या नजरेआड झाले होते.
काही क्षणात म्हशीचा फडशा पडण्यास सुरुवात झाली. आता मला सगळ ऑडिओच्या रूपात जाणवत होतं. ऐकू येणाऱ्या आवाजावरून मी सगळे अंदाज बांधत होतो. सेमाडोह धारणी हमरस्त्यावरून एखादे वाहन गेले की, खाण्याचं सोडून पूर्ण फॅमिली जवळच्या बांबू रांजीमधे जाऊन दडत होती. वाहनाचा आवाज शांत झाला, की परत येऊन पुन्हा म्हशीवर ताव मारायचे. असे त्यांनी किमान चार वेळा तरी केले असावे.

 

साडेनऊच्या ऐवजी आमची मिनीबस वीस मिनीट आधीच कच्च्या रस्त्याकडे वळताना दिसली. वाघ कुटुंब त्वरित अदृश्य झालं. वक्तशीरपणाचे धडे आपणच या कर्मचाऱ्यांना दिल्याबद्दल आज पहिल्यांदाच खंत वाटली. भुकेल्या पोटी एकट्याने तीन तासांपासून मचाणावर बसलेल्या आपल्या बिलंदर साहेबाच्या काळजीने ते बिचारे अस्वस्थ झाले असावे. मिनी बसचे हेडलाइट आणि हातातील टॉर्चच्या प्रकाशात चालक अब्दुल कहार आणि इतर मंडळी मचाणाखाली येऊन उभे राहिले.


‘सर, दिखा क्या?’
‘एक नही, तीन दिखा.’ मी.
खाली उतरून म्हशीचे निरीक्षण केले. शिकारीच्या पुठ्ठ्यापासून तर पोटापर्यंतचा मांसल भाग वाघ आधी फस्त करत असतो. पोटाच्या लादीस थोडाही धक्का लागू देत नाही. पोटाची लादी फुटल्यास आतील घाणीची दुर्गंधी सर्वत्र पसरते. मांसल भाग खाऊन झाला की वाघ, अलगद छातीचा पिंजरा उघडून, पोटाची लादी धडापासून वेगळी करतो. केवळ पंजांची नख, जीभ आणि दात यांचा वापर करून सराईतपणे ही शस्त्रक्रिया करणारा वाघ, तेव्हा निष्णात सर्जनच्या भूमिकेत असतो. म्हणूनच वाघाला ‘क्लिन इटर’ म्हणजेच चाटूनपुसून शिकार फस्त करणारा म्हटले जाते. याउलट बिबट्या शिकार खाण्यास पोटापासून सुरु करतो. म्हणून त्याला ‘नास्टी इटर’ म्हणजेच ‘कळसवाणा शिकारी’ म्हटले जाते. शिकार खाण्याच्या या पद्धती वरून शिकार वाघाने केली की बिबट्याने, ते खात्रीपूर्वक सांगता येते. अर्ध्या म्हशीला मोक्ष प्राप्त झाला होता. बाकी शरीर आमच्या वक्तशीरपणाने केलेल्या अडथळ्यामुळे मोक्षाला प्राप्त झाले नव्हते. जंगलात निरीक्षणाचे वेळापत्रक निश्चित करणे घातक असल्याची प्रचिती आली.

 

दुसरे दिवशी पुन्हा निरीक्षणाकरीता गेलो. म्हैस त्याच स्थितीत होती. वाघांनी परत शिकारीवर येण्याचे टाळले होते. जंगलाचा राजा असलेला वाघ, पण फाजील जोखीम न पत्करणे हा त्याचा स्वभाव आणि तेच त्याच्या अस्तित्वाचे रहस्य! ‘जान सलामत तो भैंस पचास’ असा विचार करत वाघ-फॅमिलीने उर्वरित म्हैस वाया जाऊ दिली होती. संरक्षित जंगलातील रात्रीची वाहतूक बंद करणे का आवश्यक आहे, ते या प्रसंगावरून कळले. वाघांना आपली मागणी लोकशाही पद्धतीने मांडता आली असती, तर त्यांनी यासाठी आवाज (डरकाळी फोडून) नक्कीच उठविला असता.

शब्दांकन : जी. बी. देशमुख
संपर्क : ९४२३१२४८३८
gbdeshmukh21@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...