पाणीबाणीचे बळी...

ग. बा. पोकळे

Apr 21,2019 12:14:00 AM IST


काय वाटलं असलं त्या आईच्या जिवाला आणि काय वाटलं असेल त्या बापाला. पाळण्यातल्या लेकराला ज्या अंगणात खेळताना बागडताना पाहिलं त्याचं लेकरांना त्याचं अंगणात चेंगरून मरताना पाहण्याची वेळ जन्मदात्यांवर यावी यापेक्षा वाईट वेळ ती काय. या पोळणाऱ्या दुष्काळात पाणी पाणी करून भटकणाऱ्या जिवांना पाण्यासाठी जीव गमवावा लागला तेव्हाच हा दुष्काळ किती तापलाय हे लक्षात आलं.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातलं चिंचाळा गावं. साधारणतः तीन हजारांच्या आसपास इथली लोकसंख्या. सध्या तरी महाराष्ट्राला या जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणूनच आहे. ही ओळख कायम असताना असा सुन्न करणारा दुष्काळ पडला की, ऊसतोड कामगाराच्याही पलीकडे जाते ही ओळखं. त्यातलंच हे चिंचाळा गावं. याच गावात तांड्यावर राहतात बळीराम हरिभाऊ राठोड. यांची ओळख एक सामान्य शेतकरी म्हणून. रोज उठलं की दुसऱ्याच्या रानात मोलानी जायचं. घरची तीन एकर शेती, ती पूर्ण जिराईत. कापूस लावला पण पावसाने लवकरचं पाठ फिरवल्याने कापसाला धड बोंडही आले नाहीत. त्यातून मिळणारं उत्पन्न तर लांबच. बायको, दोन मुलं आणि एक मुलगी असा पाच जणांचा संसार. त्यातं पुढं हा रोज खायला उठलेला दुष्काळ...

विहिरी कोरड्याठाक पडलेल्या, बोअरला गुळण्यावरसुद्धा पाणी नाही. अंगणात चार जनावरं खाण्यासाठी आणि पाण्यासाठी सतत हंबरडा फोडतातं तेव्हा पोटात गोळा येतो. गावात पाणी सुटतं ते २५ दिवसाला एकदा. या सगळ्यातून बळीराम राठोड रोज स्वतःला सिद्ध करतात आणि मरणाच्या दारातून पुन्हा जगण्याचा मार्ग धरतातं. पण एक एप्रिल उजाडला तो काळोख घेऊन, जिथं डोळ्यासमोर पोटच्या दोन गोळ्यांनी डोळे मिटले ते कायमचे ! दिवसभर शेतात राबून संध्याकाळी घरी जाताना बळीराम राठोड बैलगाडीत ३०० लिटर पाण्याची टाकी भरून घेऊन गेले. घरी गेले तेव्हा दोन्ही लेकरं अंगणात गिरक्या घालतं होती. बळीरामांनी पाण्याच्या टाकीसह गाडी अंगणात उभी केली आणि बैल घेऊन ते गोठ्यात गेले बांधायला. तेवढ्यात त्यांचा चार वर्षांचा लहाना मुलगा (आविष्कार) त्या बैलगाडीला मागून लटकला. तो लटकल्यामुळे त्याला झोका द्यायला म्हणून त्यांचाच मोठा मुलगा (जयदेव) पळत गेला. गाडीत भरलेली टाकी पाण्याने भरलेली असल्याने ती घरंगळत खाली येईल या भीतीपोटी बळीरामांनी गाडीच्या धुऱ्याला उटावणी लावलेली होती. (गाडीतील वजनाचा समतोल राहावा म्हणून ही उटावणी लावतात) आता गाडीला हे दोघे लटकल्याने गाडीचा समतोल एका बाजूला आला आणि गाडीच्या धुऱ्या पुढून उचलल्या तशीच टाकीसहित गाडीसुद्धा या दोन चिमुकल्यांच्या अंगावर पडली. आणि त्यातच अगदी किड्या-मुंगीसारखा दोघांचाही जीव गेला...


काय वाटलं असलं त्या आईच्या जिवाला आणि काय वाटलं असेल त्या बापाला. पाळण्यातल्या लेकराला ज्या अंगणात खेळताना बागडताना पाहिलं त्याचं लेकरांना त्याचं अंगणात चेंगरून मरताना पाहण्याची वेळ जन्मदात्यांवर यावी यापेक्षा वाईट वेळ ती काय. या पोळणाऱ्या दुष्काळात पाणी-पाणी करून भटकणाऱ्या जिवांना पाण्यासाठी जीव गमावावा लागला तेव्हाच हा दुष्काळ किती तापलाय हे लक्षात आलं. पण एकीकडे पाण्यासाठी जीव गेला असला तरी दुसरीकडे मात्र रोज धुरवडी रंगलेली असते. शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा या दोन्ही भागांची विभागणी पाण्याच्या निकषावरही करता येते.


कितीही दुष्काळाची दाहकता वाढली तरी शहरात पाण्याची तितकी तीव्रता दिसतच नाही. आणि ती असली तरी इथले लोक त्याची फिकीर करत नाहीत. ग्रामीण भागात आज पाण्यासाठी जिवाची काहीली होतीये, मात्र शहरातले अपवाद भाग सोडले तर बरेच भाग मुबलक पाण्याने ओसंडून वाहतायेत. आमची सवयचं आहे ही असं म्हणून शहरात रोज चार चार बकेट पाणी गाडीवर ओतणारे दारोदार दिसतात. त्यातही बायकोची,मुलाची गाडी वेगवेगळी असते. त्यांची धुण्याची वेळ आणि पद्धतही वेगळीच. बरं फक्त गाडी धूवूनच थांबतील ते शहरवाशी कसले. बागेत झाडाच्या कुंड्या उपाळून येतील इतकं पाणी सोडतात. अंगणात पाणी मारताना दुसऱ्या गल्लीत ओघळ जाईपर्यंत थांबणार नाहीत. इतकचं काय पाणी नाही आलं की आरडा-ओरड करायला शहरातल्या लोकांचा कुणीच हात धरणार नाही. पाण्याच्या गरजेबद्दल दुमत नाही. पाणी सर्वांनाच आवश्यक असतं, मग ते शहरातले असो वा ग्रामीण भागातले. फक्त प्रश्न इतकाच की त्याला परिस्थितीनुरूप हात राखून वापरायला काय हरकत आहे? किमान अशा भेगाळलेल्या दुष्काळात तरी असावीच! पण या पोळणाऱ्या उन्हात आणि सुकत चाललेल्या वर्तमानात पाण्याची कसलीच फिकीर न करता गाडीपासून बागेपर्यंत आणि अंगणापासून रस्त्यापर्यंत सगळं ओलेचिंब करणारे शहरवासी पाहतो तेव्हा मला पुन्हा बळीराम राठोड आठवतात, ज्यांनी पाण्यासाठी पोटच्या लेकरांचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला...

ग. बा. पोकळे
[email protected]
(लेखकाचा संपर्क - ९१६८२०१९०१)

X
COMMENT