Magazine / विनाशाच्या मार्गावर...

चड संपला की उतार आहे आणि उतार संपला की चड आहे, हे जसं पूर्णतः नैसर्गिक अगदी तसंच आहे मेघराजाचं

ग. बा. पोकळे

Jun 16,2019 12:03:00 AM IST

चड संपला की उतार आहे आणि उतार संपला की चड आहे, हे जसं पूर्णतः नैसर्गिक अगदी तसंच आहे मेघराजाचं. तो हमखास बरसतो या चड-उताराप्रमाणे. परंतु आपण आता हा चडही सोडलाय आणि उतारही. आपण भौतिकतेच्या कृत्रिम एक्स्प्रेस हायवेवरती अगदी सुसाट आहोत जिथे अगदी गतिरोधकसुद्धा उखडून फेकलेत.

काळाच्या ओघात माणूस बदलतोय हे सत्य असलं तरी त्या बदलाच्या ओझ्याने निसर्ग रोज काकणभर वाकतोय हे कसं नाकारता येईल. आपल्या सुखाच्या आणि समाधानाच्या संकल्पना इतक्या जाड झाल्यात की त्याच्या आड आपल्याला जन्मताच मिळालेलं नैसर्गिक वरदान आपल्याला किंचितही दिसेनासे झालयं. मात्र कोणत्याच डोंगराला फक्त चड नाहीये आणि कोणत्याच दरीला फक्त उतार नाहीये. चड संपला की उतार आहे आणि उतार संपला की चड आहे, हे जस पूर्णतः नैसर्गिक अगदी तसच आहे मेघराजाचं. तो हमखास बरसतो या चड-उताराप्रमाणे. परंतु आपण आता हा चडही सोडलाय आणि उतारही. आपण भौतिकतेच्या कृत्रिम एक्स्प्रेस हायवेवरती अगदी सुसाट आहोत जिथे अगदी गतिरोधकसुद्धा उखडून फेकलेत. मात्र मागे वळून पाहण्याची गरजच राहिली नाही या अविर्भावात जर आपण हा प्रवास करत असू तर पुढे येणारा धोका हा कायम मागेच पाहायला लावणारा असेल म्हणून हा लेखप्रपंच!...


गेली आठ महिने झालं जमिनी रोज बोटभर अंतराने भेगाळतायेत आणि नदी नाल्यातलं पाणी इतभराने तळ गाठतयं. रानोरान कांद्याचे ढिगारे पडलेले आणि एकीकडे कपाटाला पोट गेलेली जितराब चाऱ्याची आशा लावून बसलेली. ऊन म्हणतंय मी आणि त्यात घरातले दारातले सगळे भांडे पालथे घातलेले... पाण्याचा थेंब नाही घरात आणि दारातही अशी अवस्था. पण आता हा पोळणारा आणि न कळणारा दुष्काळी चड संपतोय आणि पाऊसकाळी उतार लागतोय. जिथे सुखाच्या सरी बरसतील आणि दुष्काळी डोंगर चडून आलेला सिनभाग त्यात वाहून जाईल. केरळच्या किनारपट्टीवर मोठ्या थाटात आलेला मेघराजा आता देशभरातील बळीराजाला आलिंगन घालेल आणि या तापलेल्या भुईला मनसोक्त ओलाव्याचे दान देईल...


हे सगळं होत असताना मनात एकच विचार येतो तो, आपण हा ओलावा टिकवून का ठेवत नाही? आणि हा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक स्वरूप का प्राप्त होत नाही? काय अवस्था झालेली महाराष्ट्राची आणि त्यामध्ये खोलवर गेलीये ती म्हणजे मराठवाड्याची. महाराष्ट्रात २०१६ ला अशीच परिस्थिती उद्भवली तर ६२०० च्या वर टँकरने राज्याची तहान भागवली. यावर्षी त्यापेक्षा तळ गाठलेली परिस्थिती आहे. ६५०० च्या वर टँकरने पाणीपुरवठा केला गेला. यापेक्षा भेगाळलेली आणि न शिवता येण्यासारखी परिस्थिती मराठवाड्याची झालीये. यामधील आठ जिल्ह्याला गेल्या दशकभरात दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी ३०० च्या वरचं टँकर लागले. मात्र कालांतराने ही संख्या महाराष्ट्रात पाणीपुरवठा करतात त्या टँकरच्या निम्मी फक्त मराठवाड्यासाठीच लागू लागली. यावर्षी तब्बल एकट्या मराठवाड्यासाठी ३ हजार ६८ टँकरने पाणीपुरवठा केला गेला म्हणजे महाराष्ट्रात जेवढे टँकर लागतात त्यातले निम्मे फक्त मराठवाड्याला लागले. यावरूनच लक्षात येईल इथल्या माणसांसह प्राण्यांच्या नारड्याची कोरड आणि भुईची तहान किती तीव्र झालीये...


हे सगळं होतंय ते निसर्गाच्या अनियमितपणामुळे होतंय, असं म्हणून जर आपण आपली जबाबदारी झटकणार असू तर येणारी परिस्थिती कुणाच्याच हातात राहिलेली नसेल हे सांगायला कोण्या तज्ज्ञाची मुळीच आवश्यकता नाही. शंकरराव चव्हाणांनी जायकवाडीची उभारणी केली नसती तर आपण कुणाकडं पाहिलं असतं हा नेहमी प्रश्न पडतो. मात्र त्यांच्या नंतरच्या मराठवाड्यातील राजकारण्यांनी काय केलं हा प्रश्न जास्त छळतो. पंचायत समितीच्या सदस्य पदावर वर्णी लागल्यानंतरच राज्याचं नेतृत्व यांना खुणावत असल्याने इथले अनेक नेते फक्त कागदावरच मराठवाड्याचे राहिले, बाकी यांनी कायम मुंबई नाहीतर दिल्ली इतकाच विचार केला आणि मराठवाड्याच्या प्रश्नांना कायम तिलांजली दिली हे लातूरला रेल्वेने पाणी आणल्यावर दिसलचं होतं महाराष्ट्राला.
अशा या अकार्यक्षम राजकारण्यांच्या प्रदेशात आता इथल्या कष्ट करणाऱ्या तरुणाने शेतकऱ्याने, कामगाराने, आणि जाणीव असणाऱ्या सर्वच वर्गाने जमेल त्या मार्गाने निसर्गाचं कोणत्याच प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपला प्रदेश समृद्ध होण्यासाठी जमेल तिथे पाणी साठवावे, शेततळी करावीत, घरावरच आणि दारातलं पाणी कसं अडवता येईल याचा प्रयत्न करावा, मनसोक्त झाडं लावावीत आणि आपल्यासहित येणाऱ्या पिढीचीही सोय करावी. नाहीतर आपण हा विनाशाकडचा भौतिक आणि कृत्रिम सुखाचा प्रवास इतक्याच वेगाने चालू ठेवला तर कदाचित आपण या मार्गावरचे शेवटचे प्रवाशी असू....

लेखकाचा संपर्क: ९१६८२०१९०१

X
COMMENT