Gadchiroli flood / पुरानंतरचे भामरागड : प्राण कंठात घेऊन लोकांनी दीड आठवडा काढला टेकड्यांवर; इंटरनेट, वीजयंत्रणा अद्यापही ठप्प

पर्लकोटा पुलावरून पाणी वाहत असल्याने तुटला होता संपर्क

रमाकांत दाणी

Aug 12,2019 08:46:00 AM IST

भामरागड (गडचिरोली) - पुराच्या थैमानाने अख्खे भामरागड दीड आठवडा ठप्प होते. संपूर्ण तालुक्याचे गाव पाण्याखाली आल्याने शेकडो नागरिकांनी मिळेल त्या सामानासह गावातील उंच ठिकाणांवर आश्रय घेतला. काहींना शेजारच्या लोकबिरादरी प्रकल्पात आश्रय घ्यावा लागला. किरकोळ कामासाठी घराबाहेर पडलेले अनेक जण ३-४ दिवसांनंतरच घरी परतले. तालुक्याला बाहेरच्या जगाशी जोडणाऱ्या पर्लकोटा पुलावरील पाणी अोसरले आणि दीड आठवड्यापासून पुराचा सामना करत असलेल्या भामरागड तालुक्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. सरकारी मदतकार्याचा मागमूसही नाही. लोक स्वतःच सावरत आहेत. दूरसंचार यंत्रणा ४ दिवसांपासून ठप्पच आहे. विजेचा लपंडावही सुरूच असून लोकांच्या हालअपेष्टा अद्याप संपलेल्या नाहीत.


गडचिरोलीतील भामरागड हा अतिदुर्गम तालुका. निसर्गसंपदेने नटलेले भामरागड नक्षलवादी हिंसाचाराचा हाटबेल्ट मानले जाते. सर्वाधिक नद्या व नाल्यांचा समावेश असलेल्या तालुक्यासाठी नेमकी हीच बाब तापदायक ठरते. दरवर्षी येणाऱ्या पुराला स्थानिक आदिवासीही सरावले आहेत. अशात सरकारी यंत्रणाही ढिम्म आहे. जुलैच्या शेवटच्या दिवसांत गडचिरोलीत पावसाने थैमान घातले. छत्तीसगडमधून प्रवाहीत होणाऱ्या इंद्रावती, पामूलगौतम आणि पर्लकोटा दुथडी भरून वाहू लागल्या. दोनच दिवसात भामरागडला पुराने वेढा घालून बेटाचे स्वरूप आणले. पुराची कल्पना आलेल्या अनुभवी गावकऱ्यांनी मिळेल त्या सामानासह पंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, तहसील कार्यालयासह उंच ठिकाणांवर आश्रय घेतला. बाजारपेठेतील दुकाने यापूर्वीच रिकामी झाली होती. बाजारपेठेचा नंतर तलाव झाला. आता पुराच्या चिखलमातीने भरून गेलेली घरे साफसूफ करून लोक राहायला येत आहेत. रिकामी झालेली दुकाने पुन्हा सुरू झाली. सर्वसाधारणपणे दरवर्षी दिसणारे हे भामरागडचे चित्र आहे.

१२ वर्षांपासून पुलाचे काम कागदावरच
लोकबिरादरी प्रकल्पातील शिक्षक श्रीराम झोडे सांगतात, पर्लकोटावरील पूल किमान ४० वर्षे जुना आहे. दरवर्षी त्यावर १०-१२ फूट पाणी असते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री व आरआर पाटील पालकमंत्री असताना २००८ मध्ये पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय झाला. विलासराव व आबाही हयात नाहीत. सध्याच्या सरकारने काहीच केले नाही. १२ वर्षांपासून पुलाचे काम कागदावरच आहे. नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी कंत्राटदार काम करण्यास तयार नाही, असे प्रशासन सांगते. बीआरअोच्या माध्यमातून पुलाचे काम का होत नाही, असा झोडेंचा सवाल आहे. नक्षलवाद्यांपासून शेजारच्या सूरजागड खाण प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस ताफा तैनात केला आहे. मात्र, पुलाच्या उभारणीसाठी सरकार अशी महत्त्वाकांक्षा का दाखवत नाही, असा प्रश्न मुख्याध्यापक पी.बी. गोळे यांनी केला. विकासापासून कित्येक दशके मागे राहिलेला भामरागड तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी दत्तक घेतला होता.

शाळांना महिनाभर पावसाळी सुटी जाहीर
पक्के रस्ते नसल्याने तालुक्यातील किमान शंभर गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. तेथे पावसाळ्यात दुचाकीही जात नाहीत. २० ते २५ शाळांना महिनाभर पावसाळी सुटीच द्यावी लागले. मुलांचे अतोनात नुकसान होते, अशी व्यथा लोकबिरादरी प्रकल्पातील शिक्षक लीलाधर कसारे मांडतात. मुळातच येथील लोक अत्यंत गरीब असल्याने आर्थिक नुकसान फार होत नसले तरी पावसाळ्यात येथील जनजीवन अत्यंत हलाखीचे राहते, असे ते सांगतात.

सर्पदंशाच्या घटना सातत्याने घडतात
या पुलाप्रमाणेच असंख्य नाल्यांना येणाऱ्या पुरामुळेही वाहतुक व जनजीवन ठप्प होते. रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेणेही शक्य होत नाही. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते लालसू नगोटी यांनी ३० जुलैची घटना सांगतात. गुंडेनूर येथील लखमी जट्टी या महिलेला प्रसववेदना सुरू झाल्यावर खाटेवर टाकून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलेे. पुलावर पाणी असल्याने नाइलाज झाला. लखमी पुलाजवळच प्रसूत झाली. नवजात अर्भक दगावले. लखमीचे प्राण कसेबसे वाचले. भामरागडच्या अतिदुर्गम तालुक्यात अशा अनेक घटना घडतात. पुराच्या काळात दरवर्षी सर्पदंशाने मृत्यूच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात, असे लोकबिरादरी प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत असलेले डॉ. दिगंत आमटे सांगतात. या भागात खासगी दूरसंचार नेटवर्क नाही. बीएसएनएलचे नेटवर्क दोन दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे आम्हालाच कोणाशी संपर्क साधणे अशक्य झालेय, असे दिगंत सांगतात.

तहसीलच्या लिपिकालाही फटका
स्थानिक तहसील कार्यालयातील लिपिक भिवगडे गेल्या आठवड्यात काही कामाने नदीचा पूल अोलांडून हेमलकसा येथे आले होते. परत येईपर्यंत पूल पाण्याने भरलेला होता. भिवगडे यांना पुलावरून पाणी अोसरण्यासाठी तीन दिवस हेमलकसा येथेच मुक्काम ठोकावा लागला.

X
COMMENT