आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांशी चकमकीनंतर ६० ते ७० नक्षलवाद्यांचे साहित्य सोडून पलायन

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गडचिरोली जिल्ह्याच्या खोब्रामेंढा जंगलातील कारवाई

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात खोब्रामेंढा जंगलात नक्षलवाद्यांच्या शिबिरावर गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने हल्ला चढवला. सुमारे अर्धा तास चाललेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांना शिबिरातील साहित्य सोडून पळ काढावा लागला. या चकमकीत दोन्ही बाजूंनी प्राणहानी झाली नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.


बुधवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही चकमक झडली. यासंदर्भात माहिती देताना गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, जंगलात साठ ते सत्तर नक्षलवादी शिबिरासाठी गोळा झाल्याचे गस्तीवर असलेल्या सी-६० पथकाच्या लक्षात आले. एकमेकांची चाहूल लागल्याने दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सुमारे अर्धा तास ही चकमक सुरू होती. मात्र, त्यानंतर पोलिसांचा वाढता दबाव लक्षात घेऊन नक्षलवाद्यांनी शिबिर सोडून घनदाट जंगलात पळ काढला. 


यानंतर सी-६० पथकाने शिबिरस्थळाची पाहणी केल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात टाकून देण्यात आलेले साहित्य आढळून आले. यात प्रामुख्याने स्फोटकांचा समावेश असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. चकमकीत सहभागी झालेले सी-६० पथक अद्याप गडचिरोलीला परतलेले नाही. त्यामुळे या चकमकीची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही मात्र, नक्षलवाद्यांचा कुठे तरी घातपाती कारवायांची योजना होती, असा अंदाज बलकवडे यांनी वर्तवला.

बातम्या आणखी आहेत...