Gadchiroli blast / गडचिरोली भूसुरुंग स्फोट प्रकरण; पोलिस उपाधीक्षकांची उचलबांगडी

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून खबरदारीच्या नियमावलीचे पालन न झाल्यानेच पोलिस पथक नक्षलवाद्यांच्या सापळ्यात अडकल्याचा निष्कर्ष

प्रतिनिधी

May 15,2019 08:51:00 AM IST

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरुंग स्फोट प्रकरणात निष्काळजीपणा बाळगल्याचा आरोप असलेले कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांची बदली नंदुरबारला करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कारवाईची मागणी केली होती. १ मे रोजी झालेल्या या घटनेत १५ जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेच्या आदल्या रात्री नक्षलवाद्यांनी दादापूर येथे २७ वाहनांची जाळपोळ केली. या घटनास्थळावर पोलिस पथक पोहोचत असताना मार्गातच भूसुरुंग स्फोटाची घटना घडली. जाळपोळीच्या घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून खबरदारीच्या नियमावलीचे पालन न झाल्यानेच पोलिस पथक नक्षलवाद्यांच्या सापळ्यात अडकल्याचा निष्कर्ष प्राथमिक चौकशीतून काढण्यात आला आहे. सुरक्षेची कुठलीही खातरजमा न करता कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी पोलिस पथकाला दादापूर येथे पोहोचण्याचे आदेश दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्याबद्दल शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबीयांमध्ये रोष होता. या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने या घटनेची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल गृह मंत्रालयास सादर होणार आहे.

X
COMMENT