आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेगाव- साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा, पंढरीसी जाय ती विसरे बापमाय, अवघा होय पांडुरंग राहे धरुनिया अंग, न लगे धन मन देहभावे उदासीन, तुका म्हणे मळ नासी तात्काळ ते स्थळ सहारीच्या वर वारकऱ्यांसमवेत पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी १९ जून रोजी पंढरपुरला गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी तब्बल दाेन महिन्यानंतर आज, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगावात स्वगृही दाखल झाली. गण गण गणात बोतेच्या गजरात संत नगरीत पालखीसह वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातून व ठिकठिकाणाहून आलेल्या लाखो भाविकांमुळे संतनगरीचे वातावरण भक्तिमय झाले होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपुरसाठी प्रस्थान झाले होते. उन्ह पावसाची तमा न बाळगता दर कोस दर मुक्काम करत ही पालखी पंढरपुरात पोहोचली. पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर पालखीने संत नगरीकडे प्रस्थान केले. दरम्यान, आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास श्री संत गजानन महाराज पालखीचे खामगाववरून संत नगरीकडे प्रस्थान झाले. रजतनगरी खामगावातून पालखीच्या सोबत लाखोंच्यावर भाविक भक्त संतनगरीकरिता मार्गस्थ झाले. या वेळी गुरुवर्य वसंत महाराज अन्नकुटीतर्फे भाविक भक्तांना नि:शुल्क आरोग्य सेवा देण्यात आली. चहाचे वाटप करण्यात आले. श्री गजानन भक्त मंडळ कॉटन मार्केट यार्ड खामगावकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्रींच्या पालखीचे माऊली ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन कॉलेजच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी स्वागत केले व नंतर पालखी नवोदय विद्यालयासमोर आली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पालखीचे स्वागत केले. शहरातील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन होताच महाविद्यालयाचे संचालक श्रीकांतदादा पाटील यांनी व शरद शिंदे तसेच माऊली काॅलेजचे ज्ञानेश्वरदादा पाटील व प्राचार्य, शिक्षक वृंदांनी पालखीचे दर्शन घेतले. व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासह विश्वस्तांनी पालखीचे दर्शन घेतले.
पालखी आगमनामुळे खामगाव, शेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. श्री संस्थानच्या वतीने भजनी मंडळासह श्रींच्या पालखीच्या समोर जाऊन श्रींचे हृदयस्पर्शी स्वागत करण्यात आले. श्रींच्या रजत मुखवट्याची विधिवत पूजा श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी केली. नंतर श्रींच्या पालखीचे दर्शन श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील, विश्वस्त डॉ. रमेशचंद्र डांगरा, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, किशोर टांक, पंकज शितुत, प्रमोद गणेश व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव शरद शिंदे, राजेंद्र शेगोकार, रामेश्वर काठोळे, शिवसेना नेते विजयराज शिंदे यांनी सुध्दा श्रींच्या पालखीचे पूजन करुन दर्शन घेतले. यानंतर हजारोंच्यावर भाविकांनी श्री गजानन वाटिकेच्या प्रांगणात श्रींचे दर्शन घेतले. शहरातील मुख्य रस्त्यावरून शाही थाटात मार्गक्रमण करत मंदिरात पोहोचली. अभंगांनी व गण गण गणात बोतेच्या मंत्राने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. या पालखीमुळे शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते. मंदिरात श्रींच्या पालखीचे स्वागत करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी दर्शन घेतले. शहरातील सर्वच रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.
पालखी आगमनामुळे चोख बंदोबस्त
श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमानानिमित्त शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध भागात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी पोलिस निरीक्षक ८, अधिकारी २५, कर्मचारी २३१, वाहतूक कर्मचारी ३१, साध्या वेशातील ६२ व इतर ३२ अशा प्रकारचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खामगाव ते शेगाव जादा गाड्या
भक्तांची गर्दी पाहता शेगाव-खामगाव मार्गासाठी जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मलकापूर ५ गाड्या, मेहकर ९ गाड्या, चिखली ४ गाड्या, खामगाव ६ गाड्या, शेगाव ७ गाड्या, जळगाव ४ गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
२५ हजार भाविकांना प्रसादाचे वाटप
आज श्रींची पालखी संतनगरीत दाखल होणार असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या वेळी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने २५ हजार भक्तांना मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.