आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोटातलं ओठात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘दादा, ते आले ना? ते आले ना?’
‘येणार म्हणजे नक्की येणार बघा आमचे साहेब.’
‘नाही, म्हणजे इथं जीव टांगणीला लागलाय आमचा. काळजात बाकबुक होतंय...’
‘लोकसभेचे उमेदवार आहात भाऊ तुम्ही, असं खचून कसं चालेल? पण साहेबांचा शब्द म्हणजे म्हणजे शब्द. साहेब येणारच! जहालभडक भाषण करणारच! तुम्ही फक्त तुमच्या कार्यकर्त्यांना तेवढ्या सतरंज्या अंथरायला सांगा मैदानात.’
‘आता तुमच्या साहेबांचाच आसरा राहिलाय दादा. केवढा नि:स्वार्थी माणूस. स्वतःचा पक्ष निवडणूक लढत नसूनही बिचारा आमच्या प्रचारासाठी जिवाचं रान करतोय. कसलाही मोह नाही.’
‘त्यांना सुपारी—’
‘अं?’
‘त्यांना सुपारीच्या खांडाचाही मोह नाही. या देशातले तमाम बांधव, भगिनी आणि मातांसाठी करताहेत ते हे सगळं.’
‘आम्ही मोठ्ठाले एलईडी स्क्रीन लावलेत बरं का स्टेजवर. साहेब ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशन करतील ना?’
‘तर? हा सूर्य आणि हा जयद्रथ!’
‘आणि तो बबन का कोण आहे तो पण येणार आहे ना सोबत त्याचा लॅपटॉप घेऊन? स्लाइड्स, व्हिडिओ क्लिपा वगैरे दाखवायला?’
‘त्याला नाही जमणार यायला. लॅपटॉप मोडलाय त्याचा.’
‘मग काय झालं? आपण अरेंज करू की दुसरा लॅपटॉप.’ 
‘पायपण मोडलाय त्याचा!’
‘च्च च्च... अरेरे, अॅक्सिडेंट वगैरे झाला की काय?’
‘तसं नाही, पण परवाच्या सभेत सारखासारखा चुकीच्या स्लाइड दाखवत होता ना तो, म्हणून...’
‘घ्या मोटाभाय. फ्रेश माल आहे.’
‘हे काय आणलंत ट्रकभरून?’
‘निवडणुकांचा मोसम आहे. तुमच्याकडचा स्टॉक संपायला नको.’
‘स्टॉक? हे काय भलतंच?’
‘तसं नव्हे मोटाभाय. या ट्रकात अवग्रह आहेत!’
‘अवग्रह? मागे मी मिसाइलनं अंतराळातच नष्ट केला होता तो का?’
‘छ्या छ्या! तो उपग्रह. अवग्रह नव्हे.’
‘मग आता हा कुठला आणखी ग्रह?’
‘ते इंग्रजीतल्या “एस” सारखं चिन्ह असतं ना, त्याला अवग्रह म्हणतात’
‘हो का? मला नव्हतं माहीत.’
‘तुम्हाला खूप अवग्रह लागतात ना भाषणं करताना! वापरा आता मनसोक्त. म्हणा, “मित्तरोंऽऽऽऽ, भाय्योंऽऽऽऽ, भैनोंऽऽऽऽ, मैंऽऽऽऽ, नेहरूऽऽऽ, पाकिस्ताऽऽऽन”...’

‘हे काय?’
‘काय झालं राहुलजी?’
‘अहो, ही व्हिजिटिंग कार्डं—’
‘छपाईच्या चुकांच्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत की काय कार्डांमध्ये?’
‘नाही, पण किती मऊमऊ, नरम अन लिबलिबीत कार्डं आहेत ही. आणि रंग पण असा फिकट भगवा!’
‘मीच सांगितलं होतं प्रिंटरला या कार्डांवर छापायला.’
‘का पण?’
‘सॉफ्ट हिंदुत्व कार्ड वापरायचं ठरलंय ना आपलं!’

‘डॉक्टर, माझी छाती बघा. आधी छप्पन्न इंची होती ती गेल्या दहा-बारा दिवसांत एकदम पासष्ट इंची झालीय.’
‘हंऽऽ, झोपा बघू त्या टेबलावर. अरेच्या, अहो सूज आलीय छातीवर.’
‘सूज? अशी कशी आली असेल बुवा सूज?’
‘तुम्ही भाषणं करताना उगाच छाती बडवता ना, म्हणून आलीय सूज. तेवढं छाती बडवणं बंद करा, म्हणजे उतरेल सूज.’

‘शत्रुघ्न जी, तुम्ही भाजपच्या नेतृत्वाला विरोध करताना नेमकं काय म्हणाला होतात?’
‘खामोऽऽऽश!’
‘आणि त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं त्यावर?’
‘खामोऽऽऽश!’
‘राहुलजींनी कोणत्या शब्दांनी स्वागत केलं तुमचं काँग्रेसमध्ये?’
‘खामोऽऽऽश!’
‘तुम्ही आता काँग्रेसकडून उभे राहताहात, तेव्हा पटना साहिबच्या मतदारांना काय आवाहन कराल?’
‘खामोऽऽऽश!’
‘आमच्या प्रश्नांना तुम्ही सविस्तर उत्तरं दिलीत त्याबद्दल आभारी आहोत.’
‘खामोऽऽऽश!’


‘नमस्कार मोदीजी.’
‘नमस्कार. आपण कोण? तसा चेहरा जरासा ओळखीचा वाटतोय...’
‘हो की काय? कमाल आहे बुवा! तुमच्या सुप्त जाणिवेत असेन मी कुठंतरी.’
‘असेल, असेल. काय काम होतं?’
‘हे द्यायचं होतं.’
‘हे काय?’
‘गुलाबाचं फूल.’
‘थँक्यू, पण कशाबद्दल हे?’
‘कृतज्ञता म्हणून. अहो, सगळे मला विसरत चालले होते. फक्त तुमच्यामुळेच लोकांना माझ्यात पुन्हा इंटरेस्ट निर्माण झालाय. मी ऋणी आहे तुमचा.’
‘अंऽऽ, पण नाव काय म्हणालात आपलं?’
‘जवाहरलाल मोतीलाल नेहरू.’