Home | Magazine | Rasik | Gaju Tayde Rasik article

दिवस सुगीचे सुरू जाहले

गजू तायडे | Update - Mar 17, 2019, 12:07 AM IST

लोकांच्या भावना हल्ली कायम व्हेंटिलेटरवर असतात. त्या कशानं दुखावल्या जातील, ते सांगता येत नाहीत. व्यंगचित्रकाराच्या घराव

 • Gaju Tayde Rasik article

  लोकांच्या भावना हल्ली कायम व्हेंटिलेटरवर असतात. त्या कशानं दुखावल्या जातील, ते सांगता येत नाहीत. व्यंगचित्रकाराच्या घरावर कशामुळे दगड, काळी शाई फेकली जाईल, ते सांगता येत नाही. पाठीशी कोणी उभं राहील, याची गॅरंटी नाही. एक वेळ नेते हसून सोडून देतील, तशी शक्यता हल्ली कमीच, पण त्या नेत्यांना देव मानणारे त्यांचे पुजारी मात्र कधी झुंडीनं तुमच्यावर तुटून पडतील, ते सांगता येत नाही...


  ‘आता तुझा धंद्याचा टाइम झाला म्हणायचा!’
  ‘म्हणजे?’
  ‘निवडणुका आल्यात ना! तुम्ही कार्टुनिस्ट लोक आता झडझडून कामाला लागणार! ह्याची फिरकी घे, त्याची टोपी उडव...’
  ‘कार्टुनिस्ट लोक निवडणुकांआधी काय पांढऱ्या अस्वलांसारखे हायबर्नेशनमध्ये जातात काय?’
  ‘तसं नाही, पण निवडणुकांची रणधुमाळी...’
  ‘रणधुमाळी! नुसतं ‘निवडणूक’ नाही म्हणता येतं? रणधुमाळी, रणकंदन, महासंग्राम, आखाडा, दंगल! लोकशाहीचं कुरुक्षेत्र, पानिपत अन् कुस्तीचा हौदा करून ठेवलाय!’
  ‘चॅनेलांची आणि पेपरांची कृपा.’
  ‘हे बाकी खरं. एक तर क्लिशे वापरायचे, नाहीतर भयंकर सर्जनशील होऊन भाषेला अलंकृत करण्याच्या नादात बटबटीत, भडक शब्द वापरायचे. जाऊ दे. मात्र, तुला जसं वाटतं तसं नसतं. व्यंगचित्रकारांचा हंगाम, सुगी, वगैरे असं काही नसतं. आणि निवडणुकांबद्दल म्हणशील तर आपल्या देशात सतत इथं नाही तर तिथं निवडणुका होतच असतात. ग्रामपंचायतीच्या, नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या, जिल्हा परिषदांच्या, विधानसभांच्या, लोकसभेच्या. भारत कृषीप्रधान देश आहे, यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. तसा तो खरंच असता तर इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांंनी जीव दिले नसते. भारत हा निवडणूकप्रधान देश आहे असंच मला प्रामाणिकपणे वाटतं.’


  ‘हे म्हणजे, काहीच्या बाहीच!’
  ‘खरंच सांगतोय. आणि गेल्या काही वर्षांत तर मला हे प्रकर्षानं जाणवतंय. पूर्वी निवडणुकांचा प्रचार मर्यादेत असायचा. म्हणजे, लोकसभेच्या निवडणुका सोडल्या, तर इतर निवडणुकांचा प्रचार त्या-त्या भागांपुरता मर्यादित असायचा. मात्र गेल्या पाच वर्षांतली पंतप्रधानांची आणि विरोधकांचीही भाषणं ऐक. निव्वळ निवडणुकांमध्ये करतात तसली प्रचारकी भाषणं आहेत ती. त्याशिवाय ‘आम्ही यंव केलं अन त्यंव केलं’ असं कोकलून-केकाटून सांगणाऱ्या पेपरांतल्या मोठमोठ्या सरकारी जाहिरातीही बघ. प्रचारकी पोस्टर्सच वाटतात. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा, बैल माजले’ म्हणतात, ते व्यंगचित्रकारांसाठी नव्हे, राजकारणातल्या लोकांसाठी! तेदेखील फक्त वरच्या फळीतल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या मुला-नातवंडांसाठी. सतरंजी उचलणाऱ्यांना फक्त प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुगीचे दिवस सुरू झाल्याचा भास होत असतो. उमेदवार जिंको किंवा हरो, सतरंजी उचलणारे निवडणूक संपताच पुन्हा अडगळीत जातात.’
  ‘म्हणजे, तू निवडणुकांनिमित्त व्यंगचित्रं काढणार नाहीयेस तर.’
  ‘असं कुठं म्हटलं मी? काढीनदेखील सुचली तर. पण अमुकनिमित्त, तमुकनिमित्त ‘मोले घातले काढाया’ अशी हुकमी किंवा फर्माइशी व्यंगचित्रं काढायची म्हणशील, तर ते शक्य नाही मला. माझी मलाच सुचावी लागतात.’
  ‘म्हणजे ‘अगदी आतून’ येत असणार तुझी व्यंगचित्रं.’


  ‘आतून-बितून नाही, बाहेरूनच येतात. बाहेर राजकारणात, समाजकारणात, साहित्य-कलाक्षेत्रात काहीतरी हास्यास्पद दिसलं आणि नेमका त्याचवेळी आपल्यातला मिश्कीलपणा, खट्याळपणा, वात्रटपणा, आचरटपणा जागा झाला की व्यंगचित्रं सुचतात.’
  ‘व्यंगचित्रकाराला आचरट असावं लागतं?’
  ‘बाकीच्या व्यंगचित्रकारांबद्दल सांगता येणार नाही, पण मी आहे बुवा आचरट.’
  ‘समजा, एखादं व्यंगचित्रं तुला सुचलंच, पण एखाद्या पेपरानं छापायला नकार दिला, किंवा त्यांच्या शेड्यूलमध्ये ते बसत नसलं तर वाया गेलं ना.’


  ‘काहीसं बरोबर आहे तुझं. प्रासंगिक मूल्यं असलेली व्यंगचित्रं वेळेवर छापली गेली नाहीत की त्यांचे संदर्भ कालबाह्य होतात. काही पेपरवाले फक्त शेड्यूलमध्ये बसत नाही या एकाच कारणामुळे व्यंगचित्र नाकारतात असंही नाही. ते व्यंगचित्र त्या पेपरच्या राजकीय धोरणाशी विसंगत असू शकतं. किंवा ते व्यंगचित्र त्यांना प्रक्षोभक वगैरे वाटू शकतं.’
  ‘म्हणजे गेली ना वाया मेहनत!’
  ‘छ्या! मेहनत वायाबिया जात नसते हल्ली. व्यंगचित्रं आणि ती प्रकाशित केल्या जातात त्या जागा ह्यांबद्दलच्या तुझ्या धारणा अजूनही जुन्याच आहेत. बाबा रे, सोशल मीडियाच्या उदयानंतर कोणालाही व्यक्त होण्यासाठी छापील माध्यमांचा आसरा घेण्याची गरज राहिली नाहीये. ब्लॉग, फेसबुक. ट्विटर, इन्स्टाग्राम, यांसारखे किती तरी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत आज व्यंगचित्रकारांना.’
  ‘म्हणजे छापील माध्यमांची सद्दी संपली म्हणतोस?’
  ‘अजून तरी नाही. मात्र कधी तरी संपणार. ज्या व्यंगचित्रकारांना पूर्वी प्लॅटफॉर्म मिळत नसे असे किती तरी व्यंगचित्रकार हल्ली सोशल मीडियावर चित्रं टाकतात.’
  ‘पण सगळी कुठं चांगली असतात!’


  ‘सगळीच चांगली, असणं कसं शक्य आहे? त्यांतही भिकार, सुमार, बरी, चांगली, उत्कृष्ट, अप्रतिम अशा विभागण्या असणारच ना! शिवाय व्यंगचित्र म्हणजे, हातानं काढलेलं रेखाटनच असलं पाहिजे अशीही गरज राहिलेली नाही. मीम्स पाहतोस ना? त्यांत फोटो वापरले असतात. काही फोटोंवर प्रक्रिया करून फोटून (Photoon) देखील तयार केली जातात. मीदेखील केली आहेत, अशी कित्येक फोटून.’
  ‘पण मानधन, मोबदला वगैरे?’
  ‘काही तुरळक अपवाद सोडले, तर मराठी छापील माध्यमं व्यंगचित्रकाराला - दिलाच तर - किती मोबदला देत असतील असं तुला वाटतं?’
  ‘...’
  ‘आणि नेटवरही नीट मॅनेजमेंट केली, तर उत्पन्न मिळू शकतं. त्याचे मार्ग असतात. पण आता आपण पुन्हा तुझ्या आवडत्या निवडणुकांकडे वळू या. मागं एका सीनियर जाणत्या नेत्यानं केलेलं एक विधान आठवतं?’
  ‘कोणतं बुवा?’
  ‘गेल्या निवडणुकांच्या वेळी ते एका सभेत म्हणाले होते की, गावाला जाऊन मतदान करा, शाई पुसून इकडे या आणि पुन्हा मतदान करा. झालं, माझ्यातला आचरट जागा झाला आणि एक फोटून जन्मलं- ‘आमची श्याई’! प्रचंड व्हायरल झालं होतं ते. नंतर एका नियतकालिकात छापूनही आलं. ही असते, सोशल मीडियाची ताकत.’
  ‘पण सोशल मीडियावर भावनाही भडकवता येतात ना.’


  ‘नक्कीच. भावना, अस्मिता भडकवता येतात, चारित्र्यहनन करता येतं, अफवा पसरवता येतात. काय वाट्टेल ते करता येतं. पण एवढी एकच बाजू नाहीये सोशल मीडियाची. सकारात्मक बाजूदेखील आहे. आपण कुठल्या बाजूला आहोत हे आपलं आपण तारतम्यानं ठरवावं लागतं.’
  ‘निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच्या तुझ्या व्यंगचित्राचं आणखी एखादं उदाहरण?’
  ‘तो फेमस कोट आठवतो पंतप्रधानांचा?’
  ‘तो ‘नामधारी’ कोट ना? आठवतो की.’
  ‘दिल्ली विधानसभा निवडणूक ‘आप’वाल्यांनी धुवून नेली तेव्हाचं, एक कार्टुन बघ माझं. त्या नामधारी कोटचे धागे उलगडताहेत, आणि त्यांतून केजरीवालांचं ते सुप्रसिद्ध मफलर विणलं जातंय.’
  ‘आठवतंय. मग आता आणखी कार्टून्स सुचली तर करशील का निवडणुकांवर?’
  ‘करीन किंवा करणारही नाही.’
  ‘सुचलीत तरी?’
  ‘हं. जरा कठीणच झालंय रे. लोकांच्या भावना हल्ली कायम व्हेंटिलेटरवर असतात. त्या कशानं दुखावल्या जातील, ते सांगता येत नाहीत. व्यंगचित्रकाराच्या घरावर कशामुळे दगड, काळी शाई फेकली जाईल, ते सांगता येत नाही. पाठीशी कोणी उभं राहील, याची गॅरंटी नाही. पाहिलंय आपण हे सारं आधी, नाही का?’


  ‘पण हिंदी-इंग्रजीवाले कार्टुनिस्ट घेतात ही रिस्क.’
  ‘त्याची दोन कारणं असणार. एक म्हणजे पैसा. माझ्या माहितीप्रमाणे अनेक हिंदी, इंग्रजी पेपरांत व्यंगचित्रकाराला सन्मानानं जगता येईल , एवढा पगार किंवा मोबदला मिळतो. मराठीत तसं असल्यास माझ्या पाहण्यात कधी आलेलं नाही. दुसरं कारण, म्हणजे भय- राजकारण्यांचं. एक वेळ नेते हसून सोडून देतील, तशी शक्यता हल्ली कमीच, पण त्या नेत्यांना देव मानणारे त्यांचे पुजारी मात्र कधी झुंडीनं तुमच्यावर तुटून पडतील, ते सांगता येत नाही. फुंकूनच प्यावं लागतं. मी व्यंगचित्रकारांना दोष देत नाही. प्रत्येकाला जीव प्यारा असतो. तरीही बोटांवर मोजण्याइतके का होईना, मराठी व्यंगचित्रकारदेखील आपल्या परीनं उपहास आणि उपरोधाची शस्त्र प्रभावीपणे वापरत आहेत. शेवटी माझ्यापुरती एक गोष्ट मी नेहमीच लक्षात ठेवतो.’
  ‘कोणती गोष्ट?’
  ‘आपल्या कलेशी बांधील राहून व्यंगचित्रकारानं नेहमी प्रस्थापितांच्या, व्यवस्थेच्या आणि विद्यमान सरकारच्या - मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असू देत - विरोधातच असावं. अर्थात, तो मत कोणाला देतो हा सर्वस्वी त्याचा प्रश्न.’
  ‘पटतंय.’
  ‘चलो फिर. एक-एक कटिंग मारू, विडीकाडी करू आणि निवडणुकांना सामोरं जाऊ. आलिया भोगासी...’


  गजू तायडे
  gajootayde@gmail.com

Trending