आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोटातलं ओठात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक


‘आईऽऽऽ!’
‘काय झालं रे बाळा?’
‘अगं, बाबांनी पट्टेरी अंडरपँटीवरच घराबाहेर धूम ठोकली!’
‘काय मेलं दळभद्री लक्षण! म्हटलं आज रविवार, तेव्हा घरातच बसून निवांत सिनेमा बघू या. नव्हता बघायचा सिनेमा, तर सरळ सांगायचं ना! असं पळून कशाला जायचं? निदान पळण्याआधी पायजमा तरी चढवायचा! किती अश्लील दिसते ती पट्टेरी चड्डी!’
‘यात तुझंच चुकलं आई!’
‘माझंच चुकलं? ते कसं रे कार्ट्या?’
‘तू किचनमधून एवढ्या मोठ्यानं ओरडायला नको होतंस.’
‘असं काय ओरडले मी?’
‘तू ओरडून मला नाही का म्हणालीस, “ए, लाव रे तो व्हिडिओ”!’

......................

‘अहो, अहो, पटकन इकडे या बघू!’
‘काय आहे?’
‘अहो, टीव्हीवर बघा ना, आपले मोदी आहेत.’
‘ह्या! त्यात काय नवल? ते नेहमीच असतात टीव्हीवर!’
‘पण कित्ती छान अभिनय करताहेत बघा ना!’
‘अगं, काहीतरी नवीन सांग ना. अभिनय करतात म्हणे! ते नेहमीच भाषणात अभिनय करत असतात.’
‘भाषणातला अभिनय नाही हो. सिनेमातला अभिनय!’
‘सिनेमातला अभिनय? कुठला सिनेमा लागलाय टीव्हीवर?’
‘शूटआउट अॅट लोखंडवाला!’
‘माझे आई, ते मोदी नाहीत. विवेक ओबेरॉय आहे तो!’

......................


‘भौ पंजाब, शिग्रेट-गिग्रेट हाये काय यखांदी तुह्याजवय?’
‘नाई ना बे अजाब, चाल आपन पानठेल्यावरून घ्यू इकत!’
‘हौ, अन माह्यासाटी एक च्युइंगमबी घेजो!’
‘काहून बे? च्युइंगम कायले पायजे तुले?’
‘अगा पंजाब, घरात गेल्यावर माह्या बुढ्याले वास नाई आला पायजे ना शिग्रेटीचा!’
‘तुहा कानी अजाब, छुप्या प्रतिगाम्यावानीच मामला हाये!’
‘ते कसं बा?’
‘ते लोकं शिग्रेट पेतेत प्रतिगामीपनाची, अन् शिग्रेटीचा वास मारासाठी पुरोगामित्वाचं च्युइंगम चघयतेत!’
‘हड् बा पंजाब. त्वा माही तल्लफच घालौली गड्या शिग्रेटीची!’

......................

‘अहो, काय झालं? आवाज कसला झाला एवढा धप्पकन?’
‘अगं, पाय घसरून पडलो मी बाथरूममध्ये.’
‘पुन्हा? कितवी वेळ आहे ही असं पडण्याची? रोज रोज असे काय पडता हो?’
‘आता मला काय हौस आहे आहे पडण्याची?’
‘सगळी सोंगं कळतात हो. उगाच नाटकं करू नका.’
‘नाटकं?’
‘तर काय? मोदीजींना अपशकून करायचा म्हणून रोज आपटता बदाबदा! पण माझं एक ऐकून ठेवा!’
‘आता काय सांगणारेस?’
‘कितीही आपटा, येणार तर मोदीच!’

......................

‘या या, कुचभल्लीवार. श्रीराम, श्रीराम! खूप दिवसांनी येणं केलंत. अगं ए, सुंठवडा आण बघू कुचभल्लीवारांसाठी!’
‘सुंठवडा? म्हणजे काय हो पंत?’
‘रामनवमीचा प्रसाद.’
‘पण रामनवमी तर कधीच होऊन गेली. सुंठवडा एवढे दिवस टिकतो?’
‘तर? तुम्हाला सुंठवडा म्हणजे बटाटावडा वाटला की काय? शिवाय आम्ही फ्रिजमध्ये ठेवतो सुंठवडा. आमची ही दर रामनवमीला सुंठवडा आणि कृष्णाष्टमीला पंजिरी बनवते. आल्यागेल्याला प्रसाद वाटत असतो आम्ही. हं, हा घ्या सुंठवडा. जय श्रीराम.’
‘छान लागतो की.’                   
‘मग? प्रभुरामचंद्रांचा प्रसाद तो, छानच असणार. आता एकदाचं मंदिर बनलं अयोध्येत, की झालं. यंदा जाहीरनाम्यात वचनच दिलंय आम्ही तसं! मंदिर वहीं बनायेंगे!’
‘आम्ही?’
‘म्हणजे आमच्या पक्षानं हो!’
‘आणि फक्त यंदाच? गेली पंचवीसेक वर्षं तेच वचन देताय की. हे वचन तुमच्या सुंठवड्यासारखंच आहे बघा पंत. जाहीरनाम्याच्या फ्रीजमध्ये वर्षानुवर्षं टिकतंय.’
‘विनोद नको. “आम्हि काय कुणाचे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे!” समर्थांनीच म्हटलंय. शिवाय सेतुबंधनाची कथा माहीत आहे ना? अहो, रामनामानं दगडदेखील तरतात. सियावर रामचंद्र की जय!’
‘बाकी रामनामानं दगडही तरतात हे तुमचं म्हणणं आपल्याला हंड्रेड परसेंट मंजूर!’
‘बघा, पटलं ना!’
‘नक्कीच. अहो, अवतीभवती पाहिलं तर रामनामानं केवढे तरी दगड तारलेले दिसतात.’
‘म्हणजे तुम्हाला राममंदिर बनायला नकोय तर!’
‘राममंदिर तर कधीचंच बनून तयार आहे पंत, आहात कुठं?
‘बनून तयार आहे? कुठं? दाखवा बघू.’
‘नाही दाखवता येणार. त्यासाठी हनुमान असावं लागतं.’
‘म्हणजे?’
‘सगळ्यांनाच कुठं छाती फाडून दाखवता येते?’


गजू तायडे
gajootayde@gmail.com