आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गली गली में शोर है, देश का चौकीदार चोर है'; मोदींचे नाव न घेता पंढरीत सरकारी भिंतीवर फलकबाजी करुन काँग्रेसचा प्रचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- गली गली में शोर है, देश का चौकीदार चोर है' अशा घोषणा येथील नगरपालिका, रेल्वे आणि अन्य काही सरकारी मालकीच्या जागांवरील संरक्षक भिंतींवर रंगवण्यात आल्या आहेत. जिल्हा युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता समजदार को इशारा काफी है या प्रमाणे अत्यंत खुबीने त्यांना उद्देशून या घोषणा भिंतींवर रंगवल्या आहेत. मात्र, सरकारी मालकीच्या जागेवर अशा प्रकारच्या घोषणा लिहिल्याबद्दल संबंधित एकाही सरकारी कार्यालयाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही, हे आश्चर्य आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार आहोत, असे प्रतिपादन अनेक जाहीर सभांमधून केले आहे. यासंदर्भात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका करून मोदींची ही नौटंकी असल्याचे म्हटले होते. काँग्रेसकडून मोदींच्या भूमिकेवर सभांमधून टीका करतानाच त्यांच्या विरोधात आता विविध ठिकाणी अशा प्रकारे भिंतींवर घोषणाही रंगवल्या जात आहेत. 

रेल्वेच्या टाकळी रस्त्यावरील बोगद्यावर, नगरपालिका मालकीच्या लिंगायत स्मशानभूमीच्या भिंतीवर, शासकीय विश्रामगृहासमोरील जलसंपदा विभागाच्या भिंतीलगतच्या स्कूल बस थांब्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता त्यांना उद्देशून विविध घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या घोषणांच्या खाली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस असा उल्लेखही आहे. पंतप्रधानांच्या विरोधातील अशा प्रकारच्या घोषणा रंगवताना नगरपालिका, रेल्वे आदी खात्यांकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. 

 

नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना विचारल्यावर ते म्हणाले, युवक काँग्रेसने भिंतीवर घोषणा लिहिल्याची माहिती मिळाली आहे. चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. 

 

काँग्रेस पक्षाकडून आम्हाला अशा प्रकारच्या घोषणा ठिकठिकाणी भिंतींवर रंगवण्यास सांगण्यात आले होते. शहरातील जास्तीत जास्त लोकांकडून या घोषणा वाचल्या जाव्यात, या उद्देशाने पक्षाकडून आलेल्या घोषणा आम्ही पंढरपूर शहरात २० ते २५ ठिकाणी रंगवून घेतल्या आहेत. नितीन नागणे, जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस 
 

बातम्या आणखी आहेत...