आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप; मिरवणुकीत डीजेला फाटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या विर्षी लवकर या' अशा घोषणा देत रविवारी गणेशभक्तांनी गणरायाला निरोप दिला. या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या डीजेला परवानगी नाहीच, या निर्णयामुळे जवळपास सर्वच मंडळांनी डीजेला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींना निरोप दिला. 


लातूर जिल्ह्यात गुलालाऐवजी फुलांची उधळण, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्ये यासह शांततापूर्ण वातावरणात निघालेल्या मिरवणूक या वर्षीच्या विसर्जनाचे प्रमुख आकर्षण ठरल्या. या वर्षीच्या मिरवणुकांत डीजेचा दणदणाट जाणवला नाही. काहींनी डीजे ऐवजी मोठे स्पीकर लावले. मात्र बहुतांश गणेश मंडळांनी टाळ-मृदंग, लेझीम, ढोल, ताशा या पारंपरिक वाद्यांच्या तालावरच मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आणि अंमलातही आणला. त्याचबरोबर गुलालाऐवजी अनेक मंडळांनी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला. 


परभणीत चारच देखाव्यांनी वेधले लक्ष

परभणी शहरात चार गणेश मंडळांनी मिरवणुकी दरम्यान सादर केलेल्या देखाव्यांचे हजारो गणेशभक्तांनी जोरदार स्वागत केले. परभणीतील विसर्जन मिरवणुकीत पाच गणेश मंडळे सहभागी होती. देशमुख गल्लीतील मानाच्या कबाडीच्या पालखीचे हजारो गणेशभक्तांनी स्वागत केले. गांधी पार्कातील सुवर्णकार गणेश मंडळाने मिरवणुकीच्या अग्रभागी कलावंतांद्वारे पारंपरिक वासुदेव, देवीचा गोंधळ, वाघ्या मुरळी वगैरे कला सादर केल्या. राजे संभाजी मित्र मंडळाचे छोट्या वारकऱ्यांचे भजनी पथक मिरवणुकीत अग्रभागी होते. या पथकाने सुंदर अशी भजने सादर केली. 


नांदेडमध्ये श्री गणेश विसर्जन शांततेत, प्रेक्षकांचा मनस्ताप वाचला 
न्यायालयाच्या आदेशामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेला बंदी असल्याने दरवर्षी प्रमाणे कानठळ्या बसवणारे भोंगे मिरवणुकीत नव्हते. त्यामुळे मिरवणुकीला प्रेक्षक म्हणून जमलेल्या लाखो भाविकांना मन:स्ताप सहन करावा लागला नाही. डीजे नसल्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतीपुढे कोणतेही वाद्य दिसले नाही. 


जालन्यात दु:खाचे सावट 
जालना शहरात मोती तलावात श्री गणेश विसर्जनादरम्यान अमोल रणमुळे (१६) निहाल चौधरी (२६), शेखर भदनेकर (२०) हे तीन तरुण बुडाल्याने शहरावर दु:खाचे सावट पसरले होते. 


उर्वरित ठिकाणी शांततेत विसर्जन 
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. जालना आणि नांदेड जिल्हा वगळता इतरत्र कुठेही अप्रिय घटनेचे वृत्त नाही. 

बातम्या आणखी आहेत...