गांधीजी म्हणत, गुरांच्या / गांधीजी म्हणत, गुरांच्या शवच्छेदनातून गोरक्षण

विजय दिवाण

Jan 31,2019 10:55:00 AM IST

१ मे १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नालवाडीला येऊन विनोबांना भेटले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नालवाडीतील महार समाजाने मृत गुरांचे कातडे सोडवण्याचे काम सोडून दिले होते. गोपाळराव वाळूंजकरांना नालवाडी परिसरात एक मेलेला बैल दिसला. त्यांच्या मनात आले, आपण विनोबांबरोबर दलित वस्तीत आलो आहोत ते अस्पृश्यता निवारण व जातिअंतासाठी. आपण दलित झाल्याशिवाय दलितांचे दु:ख आपल्याला कळणार नाही, मग मेलेल्या गुरांचे कातडे सोडवण्याचे काम आपण का करू नये? आणि गोपाळरावांनी हे शवच्छेदनाचे काम हाती घेतले.


ठक्कर बाप्पांनी ही गोष्ट गांधीजींच्या कानी घातली. दुसऱ्या दिवशी गांधीजींनी गोपाळरावांना बोलावून घेतले व म्हणाले, ‘तुमचे काम मला फार आवडले. हरिजन-सेवेपेक्षाही ते फार महत्त्वाचे आहे.’ गांधीजी केवळ बोलून थांबले नाहीत, त्यांनी गोपाळरावांना अद्ययावत चर्मालय उभारण्यासाठी एक लाख रुपये आणून देण्याचे आश्वासन दिले. आणि १ ऑगस्ट १९३४ रोजी गोपाळराव वाळूंजकरांनी नालवाडीजवळ चर्मालय उभे केले.

सुरुवातीला मेलेली गुरं सहज मिळत होती. पण चर्मालय सुरू होताच दलितांनी अडचणी उभ्या केल्या. ते म्हणून लागले, पशू जिवंत असेपर्यंत पशू पाळणाऱ्यांचा मालकीचा असतो. पण मेल्यानंतर मृत गुरांची मालकी आम्हा दलितांची आहे, तेव्हा मेलेल्या गुरांना तुम्हाला हात लावता येणार नाही. अखेर हे प्रकरण कोर्टात गेले व त्याचा निर्णय गोपाळरावांच्या बाजूने लागला. अडथळा दूर झाला असला तरी तो पुन्हा उद््भवू शकतो याची जाण गांधीजींना होती. त्यामुळे विधानसभेत प्रस्ताव आणून तसा कायदा करून घ्यावा, असे गांधीजींनी गोपाळरावांना सुचवले. गांधीजींनी स्वत: विधानसभेत मांडायचा मसुदाही तयार करून मध्य प्रांताच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला.

गांधींनी मेलेल्या गुरांच्या चामड्याला ‘अहिंसक चामडे’ अशी वैचारिक संज्ञा प्राप्त करून दिली. अहिंसक जीवनप्रणाली स्वीकारणाऱ्या गांधीवाद्यांच्या पायात अहिंसक पादत्राणे आली. गोशाळेने गोसेवा होईल व चर्मालयाने गोरक्षण होईल. गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींची ही दृष्टी बाळगून आपण काही कामे हाती घेतली तर ती गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल!
(लेखक सर्वोदयी कार्यकर्ते आहेत)

X
COMMENT