आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींच्या सत्य-अहिंसेच्या तत्त्वात विश्वमानवाचे दर्शन घडते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेदाने आपल्याला एक शब्द दिलाय. विनोबांनी त्यावर सविस्तर विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, जगात एक विश्वमानव असला पाहिजे. आपण खूप लहान-लहान माणसे आहोत. वेगवेगळ्या भागात विभागले गेलेलो... मी अजिबात अतिशयोक्ती न करता म्हणतो की, गांधीबापू विश्वमानव होते. विनोबाजींनी तर तुलसीदास, पैगंबर साहेब, जगद‌्गुरू शंकराचार्यांनाही विश्वमानव म्हटले आहे. वेद शब्दाच्या आधारे विनोबा विश्वमानवाचे विश्लेषण करतात. विश्वमानव म्हणजे नेमके काय? गांधीजींच्या तत्त्वज्ञानात जे दिसते, त्यावरून विश्वमानवाची ओळख पटते. बापूंची विश्वमानवांमध्ये गणना केल्यास अशा व्यक्तींची यादी खूप मोठी होऊ शकते. असो. बापूजींच्या विराट व्यक्तिमत्त्वातील फक्त चार वैशिष्ट्ये निवडू. पहिले- नि:स्पृहता (मोहाचा अभाव). दुसरे- तरुण शेतकरी. तिसरे- संवेदनशील वैज्ञानिक व चौथे- सत्य व अहिंसा.

नि:स्पृहता : ब्रिटनमधील प्रसंग. जाॅर्ज पंचम यांच्यासमोर बापू बसले होते. चर्चिल यांना ते खटकले. गांधीजी सामान्य भारतीय वेशात असल्याने ते प्रोटोकाॅलमध्ये बसत नव्हते. धोती आणि खांद्यावर एक उपकरणे होते. एका मुलाने विचारले, 'तुमच्याकडे कुर्ता नाही का? मी आईला सांगू का, तुमच्यासाठी कुर्ता शिवायला.' बापू म्हणाले, 'मी आभारी आहे. पण तुझी आई किती कुर्ते शिवेल? मला ४० कोटी कुर्ते लागतील. कारण माझ्या देशातील ४० कोटी लोकांच्या शरीरावर कपडे नाहीत. तुझी आई एवढे कुर्ते शिवू शकली तर मीसुद्धा कुर्ता घालेन.' हा त्याग गांधीजींच्या ठायी होता. एका राजासमोर गांधी वैराग्य आणि नि:स्पृह वृत्तीत वावरत होते.

लढाऊ शेतकरी : गांधीजी तरुण शेतकरी आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (त्यांचीही जयंती २ आॅक्टोबरला असते.) यांनी 'जय जवान जय किसान' असा नारा दिला होता. विनोबा म्हणाले होते, पृथ्वीवर क्षत्रिय शेतकरी, ब्राह्मण शेतकरी असले पाहिजेत. आदिवासींनीही शेतकरी झाले पाहिजे. 'युवास्यात् साधु, युवास्यात् अध्यापक:' म्हणजे साधू कधी म्हातारा होत नाही. एक वेळ त्याचे शरीर वृद्ध होईल, पण विचार नाही. मला गांधींमध्ये नेहमी तरुण शेतकरी दिसला. त्यामुळे ते विश्वमानव आहेत, हे मी पुन्हा एकदा ठामपणे सांगू शकतो.

संवेदनशील वैज्ञानिक : बापूंनी सात सामाजिक पापे असल्याचे म्हटले आहे. असंवेदनशील विज्ञान हेदेखील सामाजिक पाप आहे. गांधीजींच्या रूपात आपल्याला एक संवेदनायुक्त वैज्ञानिक मिळाला. ते पदार्थावर संशोधन करणारे वैज्ञानिक नव्हते तर चिद‌्विलास वैज्ञानिक होते. तुम्ही त्यांचे प्रयोग पाहा. या माणसाने आरोग्य, शिक्षणावर प्रयोग केले. बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयोग केले ग्राम स्वराज्य- ग्रामोद्योग- सर्वोदयाचे प्रयोग केले. त्यामुळेच गांधीजी विश्वमानव आहेत. त्यांनी प्रत्येक ठिकाणाहून, प्रत्येक धर्मातून शुभ तत्त्व घेतले. तरीही सनातन हिंदू असल्याचा त्यांना गर्व होता. ते निर्भीडपणे म्हणतात, 'सर्वांना स्वत:चा अभिमान असला पाहिजे, पण कधीही संकुचित बनू नका.' 'एकम सत्' ही आपली परंपरा आहे. 'आ नो भद्रा क्रतवो....' जेथून शुभ विचार मिळतात, ते घ्या. इस्लाम, सनातन धर्म, ख्रिस्ती, जैन, बौद्ध धर्मातूनही घ्या. चारित्र्यवान असणे चुकीचे नाही, पण एखाद्या जातीला दुय्यम समजणे, यासारखा गंभीर गुन्हा नाही.

सत्य व अहिंसा : सत्य हाच माझा धर्म, सत्य मिळवण्याचा माझा मार्ग अहिंसा आहे. अहिंसेतूनच मी सत्यापर्यंत पोहोचू शकतो, असे बापू म्हणतात. सत्य व अहिंसेचे हे व्रतच बापूंना विश्वमानव बनवते. शक्य तेवढे सत्याचे निर्वहन केले पाहिजे. वैचारिक सत्य, वाणीतील सत्य आणि आचरणातील सत्य हे भगवान शिवाचे त्रिपुंड आहेत. लोक म्हणतात, सत्य कटू असते. पण मला हे पटत नाही. सत्य मधुर असते. 'सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्....' म्हणजे सत्य आणि मधुर बोलले पाहिजे. गांधीजी हे विश्वमानवतेचे प्रमाण आहेत . गांधीजींनी ११ व्रते सांगितली होती. त्याची सुरुवात सत्य व अहिंसेतून होते. यात चोरी न करणे तसेच अपरिग्रहाचाही समावेश आहे. अर्थात या ११ गोष्टींचे पालन करणे आपल्याला शक्य नाही. त्यापैकी ४-५ चे अनुकरण केले तरी खूप होते. गांधीजींच्या एकादश व्रताच्या जेवढे समीप आपण पोहोचू, तेवढी निर्भयता प्राप्त होईल. त्यामुळेच गांधीजी विश्वमानव होते, असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.

शक्य तेवढे सत्य जपले पाहिजे...
सत्य हाच माझा धर्म, सत्य मिळवण्याचा माझा मार्ग अहिंसा आहे. अहिंसेतूनच मी सत्यापर्यंत पोहोचू शकतो, असे गांधीजी म्हणतात. सत्य व अहिंसेचे हे व्रतच बापूंना विश्वमानव बनवते. त्यामुळे आपणही शक्य तेवढे सत्य जपले पाहिजे.
 

बातम्या आणखी आहेत...