आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींचे सिद्धांत नैतिक विरोधकांवरच प्रभावी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शशी थरूर (माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार)   आपल्या स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या दांडीयात्रेला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. ब्रिटिश राजवटीविरोधात महात्मा गांधींनी सुरू केलेले हे सर्वात यशस्वी सविनय कायदेभंग आंदोलन होते. ब्रिटिशांनी तेव्हा भारतीयांवर मीठ उत्पादन, विक्रीवर बंदी तसेच प्रचंड कर लावला होता, त्यामुळे लोकांना महाग आणि विदेशी मीठ घेणे भाग पडत होते. मिठावरील या कराला १९ व्या शतकातच विरोध सुरू झाला होता, पण १२ मार्च १९३० ला गांधीजींनी आंदोलन सुरू केल्यामुळेच त्याला यश मिळाले. हे सविनय कायदेभंगाचे सर्वात प्रभावी पाऊल होते. या नाट्यमय घटनाक्रमाने देश आणि जगाचे लक्ष वेधून घेतले. गांधीजींनी मिठावरील कराच्या विरोधात दोन महिन्यांपर्यंत आंदोलन केले आणि इतरांना प्रेरित केले. हजारोंना तुरुंगात डांबले. मेमध्ये गांधीजींना अटकही झाली. त्यानंतर हजारो लोक आंदोलनात सहभागी झाले. २१ मे १९३० ला २५०० सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला. ६० हजारांना तुरुंगात डांबण्यात आले. अखेर दडपशाहीमुळे काहीही फायदा होत नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली आणि जानेवारी १९३१ मध्ये गांधीजींची सुटका करण्यात आली. ५ मार्च १९३१ ला झालेल्या गांधी-आयर्विन करारानंतर गांधीजींनी सत्याग्रह मागे घेतला. त्यांचा नैतिक विजय झालेला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आज विविध प्रकारे जवाहरलाल नेहरूंनी १५ आॅगस्ट १९४७ च्या मध्यरात्री दिलेल्या ‘नियतीशी करार’ या प्रसिद्ध भाषणाच्या स्मृती जागवत आहे, हे गांधीजींच्या दांडीयात्रेची आठवण येण्याचे मुख्य कारण. तेव्हा त्यांनी गांधीजींचे वर्णन ‘भारताच्या भावनेचा अवतार’ अशा शब्दांत करताना म्हटले होते की, त्यांचा संदेश भावी पिढ्या आठवणीत ठेवतील. काय होता हा संदेश? गांधीजी जगातील पहिल्या यशस्वी अहिंसा चळवळीचे अद्वितीय नेते होते. ‘सत्याचे प्रयोग’ ही त्यांची आत्मकथा होती. गांधीजींनी सत्याचा अर्थ ज्या सखोलपणे परिभाषित केला तेवढा जगातील कोणताही शब्दकोश करत नाही. त्यांच्या दृढ मतातून त्यांच्या सत्याचा जन्म झाला होता. अन्यायपूर्ण किंवा असत्य पद्धतींनी सत्याचे दर्शन घडू शकत नाही. म्हणजे आपल्या विरोधकांविरोधात हिंसा करून. हीच पद्धत समजावून सांगण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचा शोध लावला. त्यासाठी ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स (निष्क्रिय विरोध) हा इंग्रजी शब्द वापरणे त्यांना आवडत नव्हते, कारण सत्याग्रहासाठी निष्क्रियता नव्हे, तर सक्रियतेची गरज होती. सत्यावर विश्वास असेल तर तुम्ही निष्क्रिय राहू शकत नाही, सत्यासाठी दु:ख सहन करण्यासाठी सक्रियपणे तयार राहावे लागेल, विरोधकांना जखमी न करता सत्य सिद्ध करण्याची पद्धत म्हणजे अहिंसा. मग त्यासाठी स्वत:ला त्रास झाला तरी हरकत नाही, असे गांधीजी म्हणत असत.  गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीसाठी निवडलेला हा  प्रभावी ठरला. दांडीयात्रा तर त्याचे फक्त प्रतीक होते. गांधीजींनी स्वातंत्र्याचा मुद्दा लोकांपर्यंत नेताना लोकांना असे तंत्र दिले ज्याचे कुठलेही उत्तर इंग्रजांकडे नव्हते. हिंसेपासून दूर राहून गांधीजी आधीच अग्रेसर ठरले होते. अहिंसात्मक पद्धतीने कायदेभंग करून त्यांनी त्यातील अन्यायही दाखवून दिला होता. उपोषणासारखे हत्यार वापरून, आपण योग्य कारणासाठी करत असलेल्या सविनय कायदेभंगासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. अखेर त्यांनी ब्रिटिश राजवटीला भारतातील गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.  आजच्या भारतात गांधीजी आणि दांडीयात्रा यापासून आपल्याला काय शिकवण मिळते? एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, ज्यांना नैतिक अधिकार गमावण्याची चिंता आहे अशा विरोधकांच्या तसेच जे सरकार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मतप्रदर्शनाबाबत उत्तरदायी आहे अशाच सरकारच्या विरोधात गांधीजींचा हा मार्ग अवलंबता येतो. ‘तुम्ही चूक करत आहात हे दाखवण्यासाठी मी स्वत:ला दंडित करेन,’ असे म्हणण्यात गांधीजींच्या  सविनय कायदेभंगाची ताकद समाविष्ट आहे. पण आपण चूक करत आहोत हे माहीत असूनही आणि आधीपासूनच तुमच्याशी असहमत असल्यामुळे तुम्हाला दंडित करू इच्छितात अशा लोकांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. नैतिकता वगळलेला गांधीवाद म्हणजे गरीब वर्ग वगळलेला मार्क्सवाद. तरीही लोकांनी हा मार्ग निवडला, तो त्यांचा वैयक्तिक प्रामाणिकपणा आणि नैतिकता आहे. दडपशाहीने केलेला बंद, पाखंडी धरणे आंदोलन आणि या धरणे आंदोलनावरून हेच दिसते की, गांधीजींच्या सत्याच्या विचारापासून जगाची किती घसरण झाली आहे. त्यामुळे गांधीजींची महानता कमी झाली नाही. ज्या काळात जग फॅसिस्टवाद, हिंसा आणि युद्ध यांच्यात विभागले जात होते, त्या वेळी गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि शांतता यांचा अर्थ शिकवला. कोणीही बरोबरी करू शकणार नाही असे व्यक्तिगत मानदंड त्यांनी मिळवले. ज्यांची व्याप्ती समर्थकांपुरतीच मर्यादित नव्हती असे ते एक दुर्लभ नेते होते. त्यांच्या विचारातील मौलिकता आणि त्यांनी घालून दिलेले धडे आजही जगाला प्रेरणा देतात. आपण आजही गांधीजींपासून बरेच काही शिकण्याची गरज आहे. 

बातम्या आणखी आहेत...