Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | ganesh chaturthi shadu ganesh making tips

या सोप्या टिप्स फॉलो करून स्वतः घरातच शाडूची गणेश मूर्ती बनवा आणि स्थापन करा

रिलिजन डेस्क | Update - Sep 12, 2018, 10:58 AM IST

स्वतः गणेशमूर्ती तयार करून तिची स्थापना करण्याचा आनंदच काही और असतो. आपण तयार केलेली मूर्ती व्यावसायिक कलाकाराएवढी सुबक

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  स्वतः गणेशमूर्ती तयार करून तिची स्थापना करण्याचा आनंदच काही और असतो. आपण तयार केलेली मूर्ती व्यावसायिक कलाकाराएवढी सुबक असेलच असे नाही. पण तिच्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे घरीच शाडूची माती विकत आणून मूर्ती बनवण्यालाही अनेक जण प्राधान्य देतात. अशाच गणेशभक्तांसाठी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती तयार करण्यासंदर्भात काही टिप्स याठिकाणी देत आहोत.


  मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
  - शाडूची माती - अनेक ठिकाणी ही माती सहजपणे उपलब्ध होते. किलोच्या दरानुसार ही माती मिळते.
  - माती भिजवण्यासाठी भांडे
  - लाकडी पट्टी किंवा मूर्ती तयार करण्याची अवजारे. काही दुकानांमध्ये अवजारे विकतही मिळतात. त्याला Carving stics असेही म्हणतात.
  - रंगकाम करण्यासाठी ब्रश.
  - रंग - नैसर्गिक रंगाचाच वापर करावा, त्यासाठी हळद, मुलतानी माती, कुंकू, गुलाल याचा ावपर करूनही रंग तयार करता येतात. तसेच विकतही मिळतात. डींकाचा (फेव्हीकॉल) वापर केल्यास मूर्ती लवकर रंग पकडतात.
  - मूर्ती जेवढी मोठी तयार करायची असेल (तळाचा आकार) त्यानुसार जाड खोके.
  त्याशिवाय जुने वृत्तपत्र, प्लास्टीक. (याशिवाय आपल्या गरजेनुसार साहित्य वापरता येईल.)


  पुढील स्लाइडवर वाचा, मूर्ती तयार करण्याची कृती...

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  सर्वात आधी विकत आणलेली शाडू माती चांगल्या पद्धतीने भिजवून घ्यावी. ती अधिक घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. घरात कणीक भिजवण्याची सवय असल्याने आई किंवा घरातील महिला यात आपल्याला मदत करू शकतात. कोरडी माती जास्त असू द्यावी म्हणजे माती पातळ झाल्यास तिचा वापर करता येऊ शकतो. तसेच कोरडी माती पावडरप्रमाणेही वापरता येते.

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  मूर्तीचा तळ किंवा बेस तयार करण्यासाठी ज्या आकारात मूर्ती तयार करायची असेल तेवढ्या आकाराचे एक जाड खोके घ्यावे. याचा मोल्डप्रमाणे वापर करता येईल. त्या खोक्यात आधी कोरडी माती पावडरप्रमाणे लावून घ्यावी. म्हणजे माती त्याला चिटकत नाही. त्यानंतर भिजवेली शाडू माती टाकून हव्या तेवढ्या जाडीचा थर तयार करून घ्यावा. माती टाकताना समप्रमाणाकडे लक्ष द्यावे कोठेही खड्डा किंवा पोकळपणा राहणार नाही हे पाहावे. 

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  आधी मूर्तीचा खालचा भाग तयार करण्यास सुरुवात करा. म्हणजेच श्रीगणेशाचे पाय किंवा आसन तयार करायचे असल्यास ते आधी तयार करावे. तुमच्या कल्पनेतील मूर्तीनुसार तुम्ही तयार करू शकता. पण साधारणपणे सुरुवातीला पाय तयार करण्यासाठी दोन समान आकाराचे मातीचे गोळे घेऊन त्याला आकार द्यावा. मातीचा जो बेस तयार केला आहे, त्याचा आकार लक्षात घेऊन याचा आकार ठरवावा. हे पाय तयार केलेल्या तळावर व्यवस्थित लावून घ्यावेत. एक पाय (किंवा दोन्ही पाय) मुडपलेला करता येईल. त्याचबरोबर पाठीचा भागही जोडून घ्यावा. 

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  आता शरीराचा भाग किंवा धड तयार करण्यासाठी साधारण इंग्रजी टी आकाराचा एक गोळा तयार करून घ्यावा व तो पाठ आणि पायाच्या भागावर लावावा. हा भाग लावताना पोटाचा भाग मोठा आणि गोलाकार येइल याची काळजी घ्यावी. त्यासाठी वेगळा गोल गोळाही वापरता येऊ शकतो. याला व्यवस्थित चिटकवण्यासाठी मातीचा व पाणी हाताला लावून त्याचा वापर करावा.

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  डोके तयार करण्यासाठी एक गोल गोळा घेऊन तो शरीरावर लावाला. तो व्यवस्थित लावल्यानंतर एक लांब तुकडा घेऊन सोंडही त्याला लावता येईल. हात तयार करण्यासाठी लहान लहान तुकडे वापरून मूर्तीनुसार त्याला आकर देऊन ते मूर्तीला जोडावे.

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  मूर्तीला अंतिम आकार देण्यासाठी कान अत्यंत महत्त्वाचे असतात. गणेशाच्या कानावरून त्या मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलवता येऊ शकते. कान लावल्यानंतर ही मूर्ती आपण सुरुवातीला तयार केलेल्या तळावर लावून घ्यावी. या मूर्तीला सुबक बनवण्यासाठी तिला तुमच्याकडे असलेल्या अवजारांनी किंवा आईस्क्रीमची स्टीक अथवा लाकडी पट्टीने कोरून (घरातील चाकू किंवा बटन नाईफचाही वापर करता येऊ शकेल) आकार देता येऊ शकतो. 

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  मूर्ती थोडी सुकू द्यावी त्यानंतर बारीक-सारीक काम करावे. म्हणजे धोतराच्या घड्या, पितांबर, दागिणे असे काम करताना योग्य आकार मिळवता येतो. तसेच उंदीरमामा, बाप्पाच्या हातातील मोदक या गोष्टी तयार करून घ्यावा. टोपही मातीचा करणार असाल तर तोही तयार करून घ्यावा. अन्यथा पुठ्ठ्याचा चांगला पर्याय असतो किंवा अत्यंक कमी किमतीत आकर्षक टोप विकतही मिळतात.

 • ganesh chaturthi shadu ganesh making tips

  यानंतर मूर्ती चांगली वाळवून घ्यावी. त्यासाठी दोन ते तीन दिवसही लागू शकतात. मूर्तीला रंग देण्यासाठी हळद, कुंकू, गुलाल, गेरू यांचा वापर करता येईल. तसेच मुलतानी मातीचा वापरही करता येऊ शकतो. यात तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून रंग देता येतो. मात्र, कटाक्षाने नैसर्गिक रंगांचाच वापर होईल हे लक्षात ठेवा. धोतरासाठी हळद, पितांबरासाठी अष्टगंध आणि शरीराला रंग देण्यासाठी मुलतानी माती वापरता येईल. 


  पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गणेशाचे विसर्जन. अशा प्रकारे तयार केलेल्या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य आहे. तसे केले तर मूर्तीचे पावित्र्यही आपण राखू शकतो. घरातील एखाद्या मोठ्या भांड्यात विसर्जन करावे. ही माती घराच्या बागेतील झाडांना वापरता येऊ शकते.

Trending