आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रंदिन आम्हा तणावाचं तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक बेफिकिरी हे भारतीय समाजाचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे अमृतसरच्या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रावण दहनाचा कार्यक्रम रेल्वे रुळांवर उभे राहून पाहत असताना वेगात आलेल्या रेल्वेगाडीखाली जवळपास ६० लोक चिरडले गेले. एकच आकांत माजला. राज्य शासन - केंद्र शासन, स्थानिक नेते यांच्यावर टीकेची झोड उठली. रेल्वे खात्याच्या असंवेदनशीलतेवर कोरडे ओढले गेले. ही दुर्घटना दुर्दैवी खरीच. पण या घटनेत ज्यांना दूषणे दिली गेली, त्या रेल्वेचालकांना अशा प्रसंगी कोणत्या अवस्थेतून जावे लागते? त्यांची मानसिक-भावनिक स्थिती कशी असते? यावरचे हे मनोगत....

 

पृथ्वीचा परिघ साधारण ४०,०७५ किमी आहे. पृथ्वीच्या २४ प्रदक्षिणेइतकं अंतर भारतीय रेल्वे रोजच धावत असते. ‘घुमता साधू आणि बहता पानी’ स्वच्छ असते असे म्हणतात. अधिक फिरले, प्रवास केला की अक्कल येते, असेही म्हणतात. पण इतक्या वर्षांनंतर आपल्याला काही फार समजले, असे वाटत नाही. रोज धक्कादायक घटना घडतात आणि आपले अज्ञान, आपली बेफिकिरी नव्याने समोर येते. रेल्वेची गाडी धावत असताना रुळांवर माणसांनी येऊ नये, अशीच व्यवस्था असते. आम्ही चालक मंडळी किंवा ट्रॅकशी निगडित माणसांना एक वेगळे ओळखपत्र असते. त्यात रूळ ओलांडण्याची परवानगी असते. कुणीही तिऱ्हाईत रूळ ओलांडतो, तर तो गुन्हा असतो. तरीही लोक रेल्वेच्या रुळांवरून चालताना दिसतात.


आम्हाला गाडी चालवायला निघताना एक काॅशन ऑर्डर दिली जाते. त्यावर रुळांवर कुठे काही काम चालू असेल तर वेग कमी करण्याची सूचना असते. उदा. वैतरणा नदीवर पुलावरून अनेक माणसे पलीकडच्या गावात जाण्यासाठी रेल्वे पुलाचा सर्रास वापर करतात. रेल्वे आम्हाला त्याची सूचना लिहून देते. सतत शिटी वाजवा, सतर्कता बाळगा. कारण माणसे ट्रॅकवर चालत आहेत. इतक्या बारीक गोष्टींची काळजी रेल्वे घेते. माझ्या रोजच्या मार्गावर बलसाडजवळ पारडी नावाचे एक स्टेशन आहे. तिथल्या जंगलात एक जुने शंकराचे मंदिर आहे. श्रावणात आणि महाशिवरात्रीला तिथे मोठी जत्रा भरते.

 

पंचक्रोशीतून माणसं दर्शनाला येतात. आम्हाला त्या दिवशी विशेष काळजी घेण्याची, सतत शिटी वाजवण्याची सूचना ठळक स्वरूपात दिली जाते. आम्ही ती सूचना तंतोतंत पाळतो. गेटवरून पास होताना शिटी वाजवण्याचा आमचा परिपाठ आम्ही नेहमीच पाळतो. तरीही माणसं रुळावर येत असतात. गेट बंद असताना गाडीची शिटी जोरदार ऐकू येतानादेखील शेवटच्या क्षणापर्यंत लोक गेट पार करत असतात. त्यांना वाटते, आपण पार होऊ आणि कधी तरी अंदाज चुकतो, पाय घसरतो / अडखळतो आणि मग काहीच उरत नाही. गाडी भरधाव वेगात त्यांना उडवून पार होते. मग सोपे असते व्यवस्थेला दोष देणे. शेवटच्या क्षणापर्यंत गेट पार करणारी माणसं आम्ही बघतो, तेव्हा चालक म्हणून आमच्याही काळजाचा ठोका चुकतो. हृदयाचे ७२ ठोके मिनिटाला होतात. अचानक त्यातला एखादा चुकतो तो कायमचा. असे अनेक ठोके आमच्या आयुष्यात चुकले आहेत, ते निव्वळ चुकतातच, परत येतच नाहीत.


सतत मृत्यूचं भान देणारी नोकरी मी करतो. दिवसाला १४-१५ माणसे रोज रुळांवर दगावतात. तीही आमच्या मध्य/पश्चिम रेल्वेच्या लोकल धावतात त्याच टप्प्यात. मेल गाड्यांच्या खाली मरणाऱ्यांची संख्या याच्यात नाही. एरवी मी चालवत असलेल्या गाडीत हजारो माणसं प्रवास करत असतात. समोर येणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावणं शक्य नसतं. सायकलचे दोन्ही ब्रेक एकदम लावले, तर सायकल उलटते. इथे अख्खी २४ डब्यांची गाडी किंवा लोकल आपत्कालीन ब्रेक लावल्यामुळे रुळांवरून घसरण्याची शक्यता खूप असते. बऱ्याचदा आम्हाला फार दुरूनच जाणवते की एखादा माणूस रुळांवर येणार किंवा नाही, अशा वेळी हॉर्न वाजवण्यापेक्षा दुसरे फार काही हातात नसते. प्रत्येक ठिकाणी वेग कमी करणे, गाडी थांबवणे शक्यच नसते. रुळांवर एकच गाडी धावत नसते, मागे-पुढे अनेक गाड्या वेगात धावत असतात. एक गाडी थांबली की, मागच्या-पुढच्या गाड्या थबकतात, सगळे वेळापत्रकच बिघडते.


एखादा माणूस गाडीखाली आला की गाडी थांबवण्याचा नियम आहे. गाडीचा वेग ताशी ११०-१३० किमी असतो, त्यात इंजिनाचे ११० टनांच्या आसपासचे वजन. या सगळ्यामुळे फटका इतका जोरात बसतो की, गाडीखाली आलेली माणसं असो वा जनावरं (अलीकडे भाकड जनावरं रेल्वे रुळांवर सोडून जाणाऱ्यांचंही प्रमाण वाढतंय.) छिन्नविच्छिन्न होतात. परत गाडी जागच्या जागी नाही थांबत, चार-पाच किमी पुढे जाऊनच थांबते. मग स्टेशनच्या मधल्या टप्प्यातली दुर्घटना आम्ही स्टेशनच्या मास्तरांना सांगतो, ते पुढची कारवाई करतात. परवाची ही घटना. बोईसरला एक माणूस गाडीखाली आला. बाजूच्या शेतातून येऊन तो जिवाची फिकीर न करता गाडीसमोर रुळांच्या शेजारून चालत होता. चालक हॉर्न वाजवतोय, पण त्याचे लक्ष नाही. त्यात तो माणूस उडाला. बेफिकिरीमुळे एक आयुष्य क्षणात संपले.

 

अपघात झाला त्या वेळी गाडीचा वेग जवळ जवळ १०९ किमी / तास होता. अशा प्रसंगी नियंत्रण यंत्रणा वॉकी- टॉकीवर पहिला प्रश्न विचारते, ट्रॅक क्लिअर आहे का? ट्रॅकवर काही जरी असेल तर गाडी चालवता येत नाही. ते जे काही असेल, ते बाजूला करूनच गाडी पुढे चालवावी लागते. या घटनेत इंजिनात चढण्यासाठी पुढच्या बाजूला असलेली लोखंडाची शिडी पार वाकून दुसऱ्या बाजूला येऊन एके ठिकाणी विसावली होती. लोखंडाची सळई वाकणं म्हणजे किती जोराचा फटका लागला असेल त्याची कल्पना करता येऊ शकते. त्याचे पाठ/पोट एक झाले असेल इतका जोराचा फटका लागला असणार माणसाला. इंजिनाचा फटका लागला की बऱ्याचदा रक्तही येत नाही. निव्वळ मांस बाहेर येतं.

 

नंतर थोड्या वेळाने रक्त वाहायला लागते. वजन-वेग यांच्यामुळे तो फटका पार जीवघेणा होऊन जातो. तर या अपघातानंतर इंजिनाच्या बाजूला मांसाचे तुकडे चिकटलेले चालकाला दिसले. ते स्वच्छ करूनच गाडी पुढे गंतव्य स्थानापर्यंत नेण्यात आली. अशा तणावाच्या प्रसंगी चालकाला दुःखी होता येत नाही. अस्वस्थ वाटून चालत नाही. परत पुढच्या टप्प्यापर्यंत गाडी व्यवस्थित चालवायची, मन विचलित होऊ द्यायचं नाही, हे आव्हान पेलावं लागतं. गाडी चालवताना फोन बंद असतात, तेव्हा कुणाशी बोलायचं नाही, आपली व्यथा कुणाबरोबर शेअर करायची नाही. या आणि अशा स्वरूपाच्या कुचंबणेतून सतत चालकांना जावं लागतं. मग घरी आल्यावरही मन सैरभैर राहतं. काही खाण्यापिण्याची शुद्ध नसते.

 

प्रचंड मानसिक-भावनिक कोंडी होते. आपण एक माणूस उडवला तेव्हा तो तरुण / म्हातारा / स्त्री पुरुष यांच्या घरात काय हलकल्लोळ माजला असेल, या विचाराने छाती दडपून जाते. दिवस- दिवस झोप लागत नाही. ‘बंद पापण्या दुखू लागल्या, झोपच नाही डोळ्यांना, 
आत एक जाणवते कंपन, थरारते तार बारकी !’असे काही तरी होऊन जाते. शेवटी इंजिन ड्रायव्हर असला तरीही सगळ्यात आधी तो एक संवेदशील माणूसही असतो. त्यालाही मूलबाळ असते, त्याचीही वाट पाहणारे घरी कुणी तरी असते.

 

तो एकाच वेळी हजारो प्रवाशांची जबाबदारी शिरावर घेऊन भरधाव जात असतो, गाडीत बसलेले, त्याच्या भरवशावर निवांत झोपलेले प्रवासी त्याची पहिली आणि अंतिम जबाबदारी असते. या हजारोंचा जीव वाचवण्यासाठी त्याला तातडीचे निर्णय घ्यावे लागतात. ट्रॅकवर आलेल्या एका- दोघांसाठी तो हजारोंचा जीव धोक्यात घालू शकत नाही. चुकून घटना घडलीच तर त्यातनं बाहेर निघणं, तेही तत्काळ, महत्त्वाचं असतं. कारण रेल्वेचं धावणं महत्त्वाचं. इथे खोळंबायला, थांबायला, कुणालाही वेळ नाही. अनेकांच्या चुका डोक्यावर घेऊन आम्ही चालक मंडळी फिरत असतो. घटनेनंतर बऱ्याचदा गाडी थांबवली की जमाव हिंसक होतो.

 

मोटरमन, ड्रायव्हर त्यात सापडतात. त्यांच्यावर हल्ला करणे फारच सोपे असते. अशा वेळी गर्दीला आवरणे फार कठीण असते. थंडी-वाऱ्यात, पाऊस-पाण्यात आपली नोकरी निष्ठेने करणारी आमची जमात या समाजाचाच एक भाग आहे. आम्ही काही सुपरमॅन नाही. आम्हालाही आमचे कुटुंब आहे. या अशा गोष्टी घडतात तेव्हा समाज आमच्याकडे संशयाने बघतो. व्यवस्थेवरचा त्यांचा राग आम्ही समोर असल्यामुळे आमच्यावर निघतो. परंतु सुधारणा आपल्यापासून करायला हवी हे कुणाच्या कधी लक्षात येत नाही. रूळ हे गाडी चालवण्यासाठी आहेत. फिरण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, स्टंट करण्यासाठी नाहीत. आजकाल नवीन फॅड आलंय गाडी येताना गाडीबरोबर सेल्फी काढायची.

 

गाडीच्या जवळ हवेचा दाब निर्माण होतो, तो तुम्हाला आत खेचू शकतो. एखादा दगड उडून तुम्हाला जखमी करू शकतो. याचे भान कुणालाच येत नाही. हातात मोबाइल, कानांना हेडफोन, मग मागे गाडी येऊ दे नाही तर विमान, कोणाला काहीच फरक पडत नाही, याचंच आम्हाला वैषम्य वाटत राहतं.

 

- गणेश मनोहर कुलकर्णी

magnakul@rediffmail.com

लेखकाचा संपर्क : ९८१९९५७८५२
 

बातम्या आणखी आहेत...