आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमधील पुरात उद्ध्वस्त झालेल्यांच्या मदतीसाठी सरसावली मंडळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केरळमधील विनाशकारी महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्यांना मदत देण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळे पुढे सरसावली आहेत. यात दादाश्री प्रतिष्ठानने मोठा वाटा उचलत कर्नाटकातील केरळच्या सीमेगलगत असलेल्या पूरग्रस्त कोडागू जिल्ह्यास ११ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर रेवणी मारुती मंडळ ५१ हजार रुपये देणार आहे. तीन मध्यवर्ती मंडळांनी अन्य मंडळांना आर्थिक मदत देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यामुळे या प्रयत्नातून चांगली मोठी रक्कम उभी राहू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 


रेवणी मारुती गणेश मंडळ देणार ५१ हजार रुपये 
गोल्ड फिंच पेठेतील रेवणी मारुती गणेेशोत्सव मित्र मंडळ यंदा साधेपणाने साजरा करत खर्च वाचवून ५१ हजार रुपयांचा निधी चंद्रपूर जिल्ह्यातील भामरागड व इतर गावांमधील पूरग्रस्त भागात देणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी दिली. गेल्या दहा वर्षापासून हे मंडळ स्थापना आणि विसर्जनावेळी मिरवणूक काढत नाही, तसेच कुठल्याही व्यापाऱ्यांकडून वर्गणी घेतली जात नाही. हे याचे वैशिष्ट्य आहे. सर्व काही सदस्यांचा स्वखर्च असतो. साध्या पध्दतीने उत्सव साजरा करून हा पैसा सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वापरण्यात येतो. अशा विधायक उपक्रमांनी या संस्थेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यंदा या मंडळाकडून पूरग्रस्त भागांना ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. 


मध्यवर्ती मंडळांनी केले आवाहन 


मदत गोळा करावी 
सर्वात अगोदर जेव्हा पोलिस आयुक्तांनी सर्वांची बैठक घेतली होती त्या बैठकीतच सर्व मंडळांना केरळला मदत करण्याचे आवाहन केले. सर्व मंडळांनी आपापल्या मंडपात डिजिटल लावून जनजागृती करून वर्गणी गोळा करून तसेच वैयक्तिक स्वरूपातली देणगीसुद्धा द्यावी. याला लवकरच प्रतिसाद मिळेल.
- दास शेळके, ट्रस्टी अध्यक्ष, सार्वजनिक मध्यवर्ती मंडळ 


आवाहन केले आहे 
गेल्या वर्षीच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आम्ही आज पूरग्रस्त भागांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. केरळ हा आपल्या देशाचाच एक भाग आहे. माणुसकी पेक्षा काही महत्त्वाचे नाही. मंडळांनी पूरग्रस्त भागांना आर्थिक मदत करावे.
- रवी माने, जनरल सेक्रेटरी, लष्कर मध्यवर्ती मंडळ 


दादाश्री प्रतिष्ठान देणार ११ लाख 
केरळमधील पुराचा फटका कोडागू जिल्ह्याला बसला आहे. भारतीय सैन्यामध्ये कोडागू जिल्ह्यातील सैनिकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अनेक वीर या भूमीने देशास दिले. या गावाला यंदा मदत करण्याचा निर्णय दादाश्री प्रतिष्ठानने घेतला. अकरा लाख रुपये जमा करून कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या हाती सुपूर्द करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा उदयशंकर रमेश पाटील यांनी दिली. दादाश्री प्रतिष्ठानतर्फे गेल्या पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. प्रतिष्ठानच्या उत्सवात दहा वर्षांपासून त्यांनी उत्सवाचा कल बदलला आहे. भारतीय संस्कृती व पुरातन हिंदू संस्कृतीला धरून देखावे तयार केले आहेत. शिस्तबद्ध, उत्तम नियोजन हे या प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य आहे. २०१५ मध्ये शेतकऱ्यांना, २०१६ मध्ये दादाश्री शौर्य सन्मान कार्यक्रम हाती घेतले. 


पूर्वभागातूनही मदत जाईल 
उद्या आमच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही समस्त पूर्व भाग मध्यवर्तीच्या सर्व मंडळांना पूरग्रस्त भागांना मदत करण्याचे आवाहन करणार आहोतच. आमच्या मध्यवर्ती मधून दोन ते तीन मंडळे अशा पद्धतीने आर्थिक मदत करतील.
- लक्ष्मीकांत गड्डम, समन्वयक, पूर्वभाग मध्यवर्ती मंडळ 

बातम्या आणखी आहेत...