आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंगत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसराईचे दिवस आहेत. लहानमोठ्या, गरीबश्रीमंत सगळ्या लग्नातला समान घटक म्हणजे जेवणाची पंगत आणि वाया जाणारं अन्न. यावर तिखट भाष्य करणारा हा लेख.

 

पाच रुपयांची कचोरी किंवा समोसा चटणी घालून रद्दी कागदावर घेऊन खाताना लोक विचार नाही करत की, ‘तो कागद किती जुना असेल!’ कागदही चाटून घेतात. पण एखाद्या गरिबाच्या लग्नात पंगतीत बसले की, अर्थमंत्री बनल्यासारखे विचार करतात. अकरा/एकवीसचा आहेर केला म्हणजे जणू काही पूर्ण कार्याच्या खर्चाचा चेक फाडला,’ असे कित्येकांना वाटते आणि सर्वदूर बोंब मारत फिरतात. ‘काय जेवण केलं? नुसती वांग्याची भाजी आणि शिरा!’ परंतु पोटभर नुसते शेव दाबले ते कुणालाही सांगणार नाहीत. आपलीच माणसं खिशात हात टाकून चुपचाप उभं राहून तमाशा पाहत असतात. म्हणून वाटतं, आता पंगतीत नुसती ग्लुकोजची दोन बिस्किटं आणि चहा पाजायला पाहिजे. ‘मीठ कमी झालं! खूपच तिखट झालं! भात आलाच नाही! पाण्याची सोयच नव्हती! कशाचाच पत्ता नव्हता.’ अशी कोणी बदनामीच करणार नाही. मदत करण्याचीही भावना लोकांच्या मनातली आता कमी झाली. सर्वच सोबत जेवायला बसले तर, वाढणार कोण? पूर्वी गावातले लोक सर्व पाहुणे जेवल्यावर जेवण करत असत. आता उलटे झाले, गावातले आधी जेवण करून घेतात कारण गुलाबजामुन संपण्याची भीती वाटते. आणि एखादा पाहुणा उपाशी राहिला की, मग त्याचे टोमणे मुलीला सासरी आयुष्यभर ऐकावे लागतात.

गावामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना स्वतःचा हिस्सा बनवणारे स्वयंसेवक आता फार कमी झाले.

पूर्वी स्वबळाने मदत करायचे. आता ‘बळ’ हरवले. खरं बोललो की, मला बोरीच्या काट्यांसारखा वाकळा आहे असे म्हणतात. नागिन डान्स करणारे पत्रावळीवरही ‘नागिणी’सारखे नाचतात. पहिल्या पंगतीत बसण्यासाठी काही लोक तर, मॅरेथॉनमध्ये धावल्यासारखे धावत जातात. इतकी गर्दी आणि चेंगराचेंगरी करतात की, शेव, बर्फी कधी पाहिलीच नाही असे वाटते. आणि दुसऱ्या पंगतीत बसणारे त्यांच्या उरावरच उभे असतात. झाडूनही काढू देत नाहीत तर खरकट्यावरच बसायची तयारी ठेवतात. काही लोक तर वाढणाऱ्याच्या कानात ‘शेव आन, शेव आन’ असे म्हणत त्याला परेशान करून सोडतात.

 

आता हातांनी वाढून घेण्याच्या आणि उभ्याने जेवण करण्याच्या ‘बफे’पार्टीलाही हेच नियम लागू आहेत. नाव वेगळे असले तरी कामं सारखीच आहेत. पापड, सलाद, हलवा, मिठाई, भेंडीची भाजी, पालकाची भाजी आणि पनीरची भाजी असे अनेक पदार्थ असतात की, कोणता पदार्थ आधी खावा कळतच नाही. म्हणून काही लोक थाळी शीघ भरून घेतात. आणि खाल्लं नाही गेले की, फेकून देतात. कोपऱ्यात जाऊन मुलीचा बाप डोळे पुसून येतो त्याचा कुणाला विचारही येत नाही; पण आपल्या थाळीतला गुलाबजाम दुसऱ्याच्या थाळीत चेंडूसारखा उडून तर नाही जाणार याची त्यांना काळजी असते. कारण सर्वच गुलाबजाम चमच्याने खाणे शक्य नसतं. कधी कधी ते दगडासारखे टणक बनतात. म्हाताऱ्या लोकांची तर अधिकच पंचाईत होते. नशिबाने आता महिलांचे बरे दिवस आले आहेत. पूर्वी आधी माणसांची (पुरुषांची) पंगत झाल्यावर महिलांची पंगत बसवत होते म्हणून कित्येकदा चांगले पदार्थ संपून जात. आणि त्यांच्या हिश्श्याला नुसता वरणभातच येत असे. परंतु आता जवळपास सर्वच कार्यक्रमात महिलांचीही पंगत सोबतच बसविली जाते.

 

शेतात पीक होत नसलं तरी हा सर्व प्रोग्राम कर्ज काढून होत असतो. कारण ‘कर्ज कितीही झालं तरी चालेल; पण लग्न आणि पंगत मोठीच झाली पाहिजे,’ असे प्रत्येक बापाचे स्वप्न असते. कारण तो मनाने खूप श्रीमंत असतो. परंतु त्याची अवस्था काय? हे फक्त त्याला स्वतःलाच माहीत असते. आणि काळजी असते ती ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाची. एका दाण्याचे हजार दाणे करणं आता खूप अवघड आहे. शेतात पाणी नाही आणि पाऊस वेळेवर येत नाही. कारण निसर्गसुद्धा बदलला. सर्वांना माहीत आहे. तरीही आयुष्यभराची सर्व कमाई एका दिवसात खर्च होते. आपण इतके हुशार नाही की, आपल्याला तंतोतंत जेवण बनवणं शक्य होईल. अंदाजाने ठरवलेली माणसे येत नाहीत. ‘कमी आले तर अन्न फेकून द्यावे लागते आणि जास्त झाले तर कमी पडते.’ आपण प्रत्येकाला कूपन देऊन तर बोलावू शकत नाही. म्हणून अपेक्षित आकडा डगमगतो. मग पैसेही आपलेच आणि बदनामीही आपलीच. याला जबाबदार कोण?