आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर आणि वाळवंट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या वेळी सांगली-सातारा भाग महापुरात होता तेव्हा मदतीचे हेलिकॉप्टर तिथे मदतीसाठी गिरक्या घालत होते, आणि तेव्हाच दुष्काळ पाचवीला पुजलेल्या मराठवाड्यात हेलिकॉप्टर फिरत होते ते कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी. हे दोन्ही भाग महाराष्ट्रातलेच असून किती हा नैसर्गिक दुर्विलास! 
 
निसर्गाच्या आदिम शक्तीपुढे कुणाचाच ठावठिकाणा कायमस्वरूपी स्थिर राहू शकत नाही याची जाणीव जेव्हा फक्त बोलण्यापुरतीच उरते तेव्हा नैसर्गिक आपत्तीचा परहघ हा क्षणात होत्याचं नव्हतं करणारा असतो याकडे माणूस बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. अशा दुर्लक्षात आणि स्वचौकटीत माणूस मनात येईल त्या कल्पनेतून आपल्या सोयीनुसार खोदत असतो, बुजवत असतो आणि बांधतही असतो या धरणीमातेच्या शिरावर मोठमोठे बंगले, इमारती, आणि वसाहतीसुद्धा. हे सगळे घडत असताना व्यवस्था कळून न कळल्यासारखे आणि दिसत असताना डोळ्याआड करते तेव्हा येणारे मूठभर संकट केव्हा ओंजळीत न मावणारे झाले हे  सांगली-साताऱ्यासारखा परिसर रात्रीत पाण्याखाली जाईपर्यंत लक्षात येत नाही. मात्र वेळ निघून गेल्यावर हाती लागेल ते कवेत घेण्यापलीकडे काहीच करता येत नाही, डोळ्याला सगळे दिसत असले तरी...
 
मिळेल ते आपल्या हक्काचे असावे या भावनेतून कित्येक सामान्य लोकआज मोठमोठे बिल्डर झाले. याच बिल्डरांनी आणि व्यवस्थेला चालवणाऱ्या राजकीय बिल्डरांनी संगनमताने आपल्या कित्येक पिढ्यांची सोय करण्याच्या नादात बुजवून टाकल्या त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बुजवले ते खळखळणारे बंधारे आणि नाहीसेे केले ते जनावरांना पाणी पाजणारे ओढेसुद्धा. शहराच्या वसरीला असणारी माळवदाची कित्येक घरं नामशेष होऊन तिथे आता पाच-पाच, दहा-दहा मजली इमारती उभ्या राहिल्यात. बघता-बघता पंधरा-वीस घरांची वस्ती एकवटलीये या दहा मजल्यात. पाणी आल्यावर वाहून जाणाऱ्या कुटुंबांना या इमारतींनी उंचीवर ठेवले असले तरी याच इमारतींनी नद्या, नाल्यांचे तोंड बंद करून पाणी पार नाकापर्यंत आणले आहे, हे मात्र कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही. राजकीय अनास्थेचा आणि राजकीय संबंधांचा पुरेपूर वापर करून पूर नियंत्रण रेषा मोठ्या मोठ्या इमारतींनी सजवल्यात या बिल्डरी जमातींनी...

सरकारच्या कित्येक नियमांना कायम गुंडाळत ठेवून नदीच्या दुतर्फा भागात कितीतरी टोलेजंग इमारतींसह मोठ्या-मोठ्या वसाहती निर्माण झाल्यात आणि होतायेत. या सगळ्याच शहरातील कॉलनीत जसे नाले तुंबले तसे पाण्याचा या इमारतींनी पूर्ण प्रवाहही रोखलाय. त्याच पाण्याने आज क्षणात होत्याचे नव्हते केले. अमर्याद पसरणाऱ्या या मानवी हव्यासाला महापुराने अगदी उखडून फेकले. कोल्हापूरला २८ जुलैला सुरू झालेल्या मेघराजाने ६ ऑगस्टपर्यंत ४५ फुटांची धोकापातळी ओलांडून ५७ फूट ५ इंच पाणी पातळी गाठली होती. जिथे आभाळ आलंय म्हणून अंगणातले घरात घेण्याची लगबग सुरू झाली होती, तेवढ्यात मेघराजा बरसला आणि कित्येक घरं बघता-बघता पाण्याखाली गेली! प्रश्न पडला काय घ्यायचे अंगणातले घरात आणि घरातले हातात? अंगणातले घरात घेईपर्यंत घरच पाण्यात बुडाले होते जिथे संपूर्ण संसार पुरात तरंगत होता आणि  डोळ्यात महापूर दाटून आला होता... 
 

शेवटी या नैसर्गिक चक्रव्यूव्हात आपत्तीजनक दुष्काळ आहे आणि महापूरही आहे. एका बाजूला दुष्काळात कमालीचा कुणीतरी पोळतोय आणि एकीकडे या महापुरात कोणीतरी अक्षरशः उद्ध्वस्त होतोय. ज्या वेळी सांगली-सातारा भाग महापुरात होता तेव्हा मदतीचे हेलिकॉप्टर तिथे मदतीसाठी गिरक्या घालत होते, आणि तेव्हाच दुष्काळ पाचवीला पुजलेल्या मराठवाड्यात हेलिकॉप्टर फिरत होते ते कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी. हे दोन्ही भाग महाराष्ट्रातलेच असून किती हा नैसर्गिक दुर्विलास! राज्यात महापुराचे वातावरण असले तरी मराठवाड्यात आजही पाण्यावाचून गावं तरंगलेली आहेत. पिकांनी माना टाकल्यात, तर काही ठिकाणी उभ्या पिकात नांगर घातलेत. या अशा टोकाच्या दोन बाजू जेव्हा निसर्गाकडून समान पातळीवर येत नाहीत तेव्हा जबाबदार व्यवस्था म्हणून संबंधित सरकारने उपाययोजना करून पुरानेही आणि दुष्काळानेही मृत्यूला कवेत घेणाऱ्या या दरीला वाट करून द्यायला हवी, ज्या वाटेवर मानवी हव्यासातले बंगले नाहीत, दहा-दहा मजली इमारती नाहीत, कुठेच अडवलेला बंधारा नाही, कुठेचं नदी तुंबलेली नाही आणि ओढ्याचा कुठेच नाला झालेला नाही...

याअगोदरचा कुठलाच अनुभव नाही म्हणून न पेलणारेही संकट अंगावर घ्यावेच लागते. मात्र अशा संकटांचा पाढा वाचलेला असतानाही फक्त तत्कालीन परिस्थितीत कमालीचा आटापिटा करायचा आणि परिस्थिती निवळली की बाजूला व्हायचे ही झाली अनास्था. ज्या अनास्थेने आज एक भाग पाण्यात घातलाय आणि एक भाग वाळवंटात....

लेखकाचा संपर्क: ९१६८२०१९०१