Magazine / निसर्गाचा बाजार...

जमिनीत खोलपर्यंत पाणी मुरवण्याचं काम ही वाळू करते. मात्र, आता आपण वाळू ठेवली कुठे?

दिव्य मराठी

Jul 14,2019 12:14:00 AM IST

भूगर्भांतर्गत असणारा पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि हाच पाणीसाठा स्थिर राहण्यासाठी खूप महत्त्वाची असते वाळू. या सर्रास होत असलेल्या वाळू उपशामुळे कित्येक विहिरीचं आणि बोअरचं पाणी कायमचं नाहीसं झालं आणि ते आजही होत आहे. जमिनीत खोलपर्यंत पाणी मुरवण्याचं काम ही वाळू करते. मात्र, आता आपण वाळू ठेवली कुठे?

नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणाचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत ते लोक जेव्हा हे अधिकार गुंडाळून ठेवतात तेव्हा गडगंज श्रीमंतीच्या हव्यासापोटी दिसेल त्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर घाव घालणाऱ्यांची जमात फोफावते. आपल्याला फक्त पैसा मिळवायचाय हा विचार जेव्हा पक्का झालेला असतो तेव्हा नैसर्गिक साधनांचे मोल यांच्या लेखी शून्य असतं. आणि जेव्हा जेव्हा नैसर्गिक साधनांचे मोल शून्य होऊन भौतिक सुखाचं मोल न मोजण्याच्या पातळीवरचा उच्चांक गाठतं तेव्हा संकट कुठलंही असो तिथे नको तितका खड्डा पडलेला असतो आणि न मिटणारी दरी निर्माण झालेली असते. आज तिथेच नको तितका खड्डा पडतोय जिथे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि तिथेच न मिटणारी दरी निर्माण होतीये जिथे मानवाचं आणि निसर्गाचं नात खूप घट्ट आहे....


गेली सहा महिने महाराष्ट्र आणि त्यातही मराठवाडा भेगाळलेल्या दुष्काळाला तोंड देत होता. या दुष्काळी भेगा आजही पूर्णपणे मिटलेल्या नाहीत. मात्र या दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेऊन कित्येक गावांत मुंग्यांचा उकीर निघाल्यागत वाळूचे ट्रॅक्टर पळत होते, याकडे सर्वांचे मोठे दुर्लक्ष झाले. यामध्ये संधीसाधू वृत्तीच्या कित्येक गावगुंडांनी आपले खिसे गरम करून घेतले, याकडे शासनाचंही दुर्लक्ष होतं आणि ज्यांच्यावर याची जबाबदारी होती त्यांनी यांच्याशी हातमिळवणी केल्याने इथं कुंपणच शेत खात होतं. आणि जेव्हा कुंपण शेत खात तेव्हा शेतीतील पीक असो नाहीतर नदी नाल्यातली वाळू असो त्याचा नाश होणारच. गेल्या वर्षी पाऊस झाला नाही त्यामुळे तळे, नद्या, ओढे, हे सगळे कोरडेठाक पडलेले पाहून एकीकडे कमालीचं दुःख होतं तर एकीकडे आपला सिजन सुरू झाला म्हणून आनंद होता. एक जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर पहाटे चारला उसाच्या थळात दाखल झाल्यासाखे हे नदीत हजर होतात. जिथे-जिथे वाळूची दडी दिसेल तिथं-तिथं उकरायला सुरू, मग कुणाच्या शंभर खेपा तर कुणाच्या पाचशे खेपा... असा हा शासनाच्या डोळ्यात चटणी टाकून चाललेला दोन नंबरचा सरळ आणि सहज व्यवसाय...
३५०० रुपये ब्रासने आज वाळूची विक्री होते. यामध्ये एका ब्रासमागे जेसीबीवाल्याला ८०० रुपये मिळतात आणि उरलेले २८०० रुपये ट्रॅक्टर मालकाला. यामध्ये सगळं आपल्यालाच का मिळू नये या हव्यासापोटी जेसीबीचा आणि ट्रॅक्टरचा मालक एकच असतो. मग खर्च होतो तो फक्त डिझेल आणि दहा-पाच रुपये ड्रायव्हरचा. बाकी सगळ्या मार्गाने नदी-नाल्यांची खोली रुंदी उधाडून आपलं घर भरणारे कित्येक मवाली इथे फुटफुटावर सापडतील. सगळ्यात वाईट आणि निंदनीय गोष्ट म्हणजे संबंधीत भागातले अपवाद सोडले तर (अपवाद म्हणायला तसे शिल्लक राहिलेत का याबद्दल शंका आहे?) पोलीस, तहसीलदार, तलाठी, आणि ग्रामसेवक यांनी मोकळं रान सोडल्याने वाळू माफियांच्या गावोगाव टोळ्या तयार झाल्यात. वाळू उकरणाऱ्यांकडे ग्रामसेवक आला त्याला पोलीस फोन करतो, पोलीस आला की त्याला तलाठी फोन करतो, तलाठी आला की त्याला तहसीलदार फोन करतो, तहसीलदार आला की त्याला जिल्हाधिकारी फोन करतो आणि जिल्हाधिकारी आला की त्याला थेट मंत्रीच फोन करतो... अशी अखंड साखळी आहे बदमाशांची, जशी मधमाशांची असते पोळीसाठी तशी यांची वाळूसाठी! सांगा तुम्हीचं काय करणार ते नदी नाले आणि खोल खोल जाणारे तळे ?...


भूगर्भांतर्गत असणारा पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि हाच पाणीसाठा स्थिर राहण्यासाठी खूप महत्वाची असते वाळू. या सर्रास होत असलेल्या वाळू उपशामुळे कित्येक विहिरीचं आणि बोअरचे पाणी कायमच नाहीस झालं आणि ते आजही होत आहे. जमिनीत खोलपर्यंत पाणी मुरवण्याचं काम ही वाळू करते. मात्र आता आपण वाळू ठेवली कुठे? लांबच कशाला माझ्या घरासमोरच तलाव आहे ज्या तलावावर किमान आठ-दहा गावं आपली शेती करतात. या तलावात गेली पूर्ण उन्हाळा वीसच्या आसपास जेसीबी आणि ३०० च्या वर ट्रॅक्टर दिवस-रात्र वाळूवर काय मातीवर काय कायम सुरू. हे बंदच करायचं नाही इतकाच सिजन आहे म्हणून ट्रॅक्टर आणि जेसीबीवर दोन-दोन ड्रायव्हर ठेवलेत. काय होईल ते होईल, आपल्याला फक्त पैसा कमवायचायं, इतकाच विचार इथं रूढ असल्याने ही सगळी यंत्रणा इतकी वेगात आहे. मात्र अशा दुर्भिक्षकडे सर्वांनीच पाठ फिरवली तर कसं होईल आपलं आणि येणाऱ्या पिढीचेही ? आज पाऊस आणणारी झाडं नष्ट होतायेत आणि पाणी साठवून ठेवणारी वाळूही नष्ट होतीये. शेवटी प्रश्न पडतो झाडं, पाणी, वाळू हे सगळं नष्ट करून आपण असं काय साठवत आहोत जे आपल्याला वाचवले ?...


लेखकाचा संपर्क : ९१६८२०१९०१

X