आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायगाव डेपोत रेल्वेतून पेट्रोल चोरणारी टोळी अखेर जाळ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गायगाव डेपोजवळ पेट्रोलने भरलेली रेल्वे उभी होती. पेट्रोलने भरलेल्या वॅगनमध्ये पाइप टाकून पेट्रोल चोरणाऱ्या टोळीला उरळ पोलिसांनी पकडले. या वेळी दोन वाहनांत पेट्रोलने भरलेल्या कॅन पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान केली. 


गायगाव डेपोत उभ्या रेल्वेतून पेट्रोल चोरीच्या घटना नित्याच्याच असल्याने तशा तक्रारी उरळ पोलिस पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी पेट्रोल चोरट्यांवर पाळत ठेवली. मंगळवारी रात्री ठाणेदार पाटील यांनी गायगावच्या भारत पेट्रोलियम डेपोचे व्यवसाय कार्यपालक गोविंदकुमार शामसुंदर मुंदडा यांना रात्री अडीच वाजता फोनद्वारे माहिती दिली की, नातलगवाडी येथे काही व्यक्ती रेल्वेच्या उभ्या वॅगनमधून पाइपच्या सहाय्याने पेट्रोलची चोरी करून ते एका वाहनांतून चोरून नेत आहेत. त्यानंतर पोलिसांनी चार जणांना पकडले. काही चोरटे अंधारात पळून गेले. पोलिसांना येथे एका काळ्या कारमध्ये ३० लिटरच्या १५ प्लास्टिक कॅन पेट्रोलने भरलेल्या, एम.एच. ३० बी ०७३२ क्रं.च्या लाल टाटा पिकअपमध्ये चार भरलेल्या, ५४ रिकाम्या कॅन दिसल्या व पेट्रोल काढण्यासाठी पाइप दिसला. पोलिसांनी चार लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 


यांना केली पोलिसांनी अटक
साहेबखान शमशेरखान (वय २७),सुधाकर भिकाजी रणवरे (वय ४८), अक्षय प्रकाश आगरकर (वय २०), रुपेश रमेश भाकरे (वय १९),रमेश रामकृष्ण भाकरे (वय ४३), शिवहरी प्रकाश भाकरे (वय २८) यांना अटक केली. तर पोलिसांना पाहून चार आरोपी पळाले. पोलिसांनी आठ जणांंविरुद्ध पेट्रोल जीवनावश्यक पदार्थाची काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने रेल्वेच्या वॅगनमधून चोरीप्रकरणी गुन्हे दाखल केले. 


पेट्रोल चोरीच्या घटना नेहमीच्याच 
गायगावात पेट्रोल चोरीच्या घटना नेहमीच्याच आहेत. वॅगनमधून पेट्रोल काढायचे, ते कमी भावात विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. रेल्वे पोलिसांनी कारवाया केल्या होत्या. त्यानंतर मात्र कारवायांमध्ये शिथिलता आली होती. 

बातम्या आणखी आहेत...