आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत आणि गंगा करत आहेत. अद्वैतप्रमाणेच गंगाचा सुद्धा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. तृतीयपंथी असलेल्या गंगाला 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. गंगाची स्वतःची नवी ओळख निर्माण होऊ लागलेली आहे. याविषयी तिच्याशी केलेली ही खास बातचीत;
१. नृत्यकलेविषयी तुझं मत काय? नृत्यकला तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे?
नृत्यकला माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. नृत्यकलेमुळेच मला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. कुणालाही प्रणितबद्दल फार गोष्टी माहीत नव्हत्या. पण, प्रणित नावाचा एक डान्सर आहे, हे सगळ्यांना माहीत होतं. नृत्यामुळे मला स्वतःची ओळख निर्माण करता आली, म्हणूनच नृत्यकला माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे.
२. 'झी युवा'सोबत काम करण्याची संधी तुला कशी मिळाली?
याआधी अनेकवेळा मी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ऑडिशन दिलेली होती. यावेळी मात्र एक मजेशीर किस्सा घडला. 'ट्रान्सजेंडर सूत्रसंचालक हवा आहे' असा एक मेसेज मला आला. त्यात वाहिनीचा किंवा कार्यक्रमाचा उल्लेख मात्र केलेला नव्हता. मी यावेळी सुद्धा प्रयत्न करायचा असं ठरवलं, आणि पोर्टफोलिओ पाठवून दिला. मला लगेचंच स्क्रिप्ट कळवली गेली आणि भेटायला बोलावण्यात आलं. सगळ्याच घडामोडी अगदी वेगाने घडल्या आणि ही संधी मला मिळाली.
३. 'युवा डान्सिंग क्वीन'मधील दोघांपैकी, तुझा अधिक आवडता परीक्षक कोण आहे?
मयूर आणि सोनाली, या दोघांचीही तुलना केली जाऊ शकत नाही. दोघांनीही खूप नाव मिळवले आहे. मयूर माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे, असे मी म्हणेन. सोनाली मंचावर अवतरली, की सगळ्यांचं भान हरपून जातं. दोघांचीही निराळी शैली आहे. माझ्यासाठी खरंतर दोघेही खूप जवळचे आणि लाडके आहेत.
४. सूत्रसंचालक म्हणून या मंचावर तू वावरते आहेस. स्पर्धकांसोबत तुझी कशाप्रकारे गट्टी जमली आहे? तुझा सर्वात आवडता स्पर्धक कोण आहे?
सर्व स्पर्धकांसोबत माझं खास नातं आहे. सगळ्या स्पर्धकांची ओळख मी स्वतः करून दिलेली आहे, हे तुम्हाला माहीत असेल. स्पर्धेदरम्यान आमच्यातील नातं अधिक फुललं आहे. एखाद्या स्पर्धकासोबत टॉम आणि जेरीचं नातं, एखादीची खूप काळजी करणं, काहींसोबत खूप गोड मैत्री, अशी वेगवेगळी नाती सगळ्यांसोबत जोडली गेली आहेत. त्यामुळे, स्पर्धकांमधून एक फेवरेट निवडणं सुद्धा अशक्य आहे.
५. अद्वैत दादरकरसोबत काम करण्याचा तुझा अनुभव व त्याच्याविषयी काही गोष्टी आम्हाला सांग.
अद्वैत दादरकर 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाची जान आहे, असं सगळेच जण म्हणतात. माझंही याबाबतीत दुमत नाही. सूत्रसंचालक म्हणून काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. एवढ्या मोठ्या मंचावर, एका मोठ्या कलाकारासोबत मला काम करायला मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. अद्वैतकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याची विनोदबुद्धी अप्रतिम आहे. सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रम खुलवण्याची खुबी त्याच्याकडे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.