आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची गळती काही थांबेना, गंगाधर कुंटूरकरही भाजपमध्ये!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळवून देण्यासाठी एकीकडे शरद पवार जिवाचे रान करीत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. नरसी येथे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 

स्व. शंकरराव चव्हाण यांच्यासोबत काम केलेले गंगाधरराव कुंटूरकर हे जिल्ह्यातील नेत्यांमधील एक बडे प्रस्थ आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, राज्यमंत्री, खासदार अशी अनेक पदे त्यांनी काँग्रेसमध्ये भूषवली. शरद पवारांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. २०१४ च्या निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकर, सूर्यकांता पाटील, डाॅ. माधवराव किन्हाळकर यांच्यासोबतच ते भाजपत जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. तथापि त्यांनी मात्र आपण राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट केले. परंतु या वेळी मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

आघाडीला धक्का : गंगाधरराव कुंटूरकर हे नायगाव मतदारसंघातील कुंटूर सर्कलमधील आहेत. हा भाग नायगाव मतदारसंघात आहे. कुंटूरकरांचे व अशोक चव्हाणांचे राजकीय वैमनस्य आहे. तथापि त्यांनी आजपर्यंत काँग्रेसविरोधी भूमिका जाहीरपणे घेतली नाही. परंतु आता ते थेट भाजपमध्येच जात असल्याने नायगावचे काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कुंटूरकरांच्या भाजप प्रवेशाने नायगावमधील निवडणुकीला आता वेगळाच रंग चढणार आहे.
 

राज्य बँक घाेटाळ्यात कुंटूरकर यांचे नाव
नरसी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत त्यांनी भाजपत प्रवेश केला. राज्यात प्रचंड गाजत असलेल्या व शरद पवारांच्या ईडी प्रकरणामुळे सर्वतोमुखी झालेल्या राज्य बँक घोटाळा प्रकरणात गंगाधरराव कुंटूरकर यांच्यावरही आरोप आहेत. हा घोटाळा झाला तेव्हा ते बँकेचे संचालक होते. 

बातम्या आणखी आहेत...