आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी सुट्टीचा सदुपयोग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौरी कुलकर्णी


दिवाळीची सुट्टी म्हणजे मौजमजा करत नवीन काही शिकण्याची मुलांना मिळणारी मोठी संधीच असते. दप्तराच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या मुलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना, कल्पनाशक्तीला वाव मिळतो तो खरं तर ह्या सुट्टीतच.दिवाळीच्या सुट्टीत मुलांना संस्कृत श्लोक शिकवण्याकडे माझा कल असतो. रामरक्षा, मारुती स्तोत्र, अथर्वशीर्ष अशा विविध स्तोत्रांचे पठण मुलांनी करावे. संस्कृत श्लोक पठणाने उच्चार स्पष्ट होऊन पाठांतरही छान होते. आपल्याकडे वर्षभरात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. रोज एका सणाविषयी माहीत असलेली माहिती वहीवर लिहून काढावी. जेणेकरून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. 

लता मंगेशकर, सचिन तेंडुुलकर यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे जीवन कसे घडले, याबद्दलची माहितीही लिहून ठेवता येते. लिखाणामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता वाढीस लागते. वाचन, लेखन आणि कथन हे व्यक्तिमत्त्व विकसासाठीचे तीन प्रमुख टप्पे आहेत. महाभारत, रामायणातील कथा, साने गुरुजींचे श्यामची आई यासारख्या कथा वाचाव्या. वाचलेल्या कथा कथन कराव्या, म्हणजे वक्तृत्व सुधारण्यास मदत होते आणि स्मरणशक्तीचाही कस लागतो. वर्तमानपत्रात येणारी विविध कोडी सोडवावी. आजकाल वर्तमानपत्रांमध्ये खास मुलांसाठी शब्दकोडी दिली जातात. ती सोडवल्यास मुलांचे मनोरंजन तर होईलच, पण त्यांच्या बु्द्धीला ताणही दिला जाईल. शिवाय मैदानी खेळ खेळावेत. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य जाणून घ्यावे, त्यांचा आदर्श समोर ठेवून जीवनात यशस्वी वाटचाल करावी. हल्ली मुलांना आजी-आजोबांचा न मिळणारा सहवास ही एक गंभीर बाब आहे, सुट्टीचा काही काळ आजी-आजोबांच्या सहवासात घालवल्यास मुलांना त्यांचे प्रेम अनुभवता येईल.

लेखिकेचा संपर्क : ८४८५८२१४४२