आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक वर्षातील पहिल्या त्रैमासिकात जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताची आर्थिकस्थिती सध्या डबघाईला गेल्याचे चित्र आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून या त्रैमासिकात जीडीपी घसरुन 5 टक्क्यांवर आला आहे. मागील साडे सहा वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे सरकारचा भांडवली खर्च कमी होणे, विविध क्षेत्रातील घट, विक्री कमी होणे यासह विविध कारणांमुळे जीडीपीत घसरण झाली आहे. गेल्या वर्षातील अखेरच्या त्रैमासिकात 5.8 टक्के जीडीपीची नोंद करण्यात आली होती.

भारतीय प्रवासी वाहन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जून हा मागील 19 वर्षातील सर्वात वाईट काळ ठरला आणि 31 टक्क्यांनी विक्री कमी झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून सतत विक्री घटत असल्याने निर्मितीही बंद करावी लागली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार वेळा 110 बेसिस पॉईंटने रेपो दरात कपात केली आहे. तरीही याचे वाढीत रुपांतर होईल याबाबत अर्थतज्ञांना शंका आहे. आरबीआयने रेपो दर कमी केल्याने बँका स्वस्त कर्ज देतात आणि वाहन खरेदीसाठीही कमी दरात कर्ज मिळते. त्यामुळे वाहन क्षेत्रासाठी ही दिलासादायक बाब मानली जात होती. पण जीएसटी कमी होत नसल्याने ग्राहक अजूनही दर कमी होण्याची वाट पाहत आहे.

जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या काळात सरकारच्या भांडवल खर्चातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे एकही नवा प्रकल्प जाहीर करता आला नाही, परिणामी भांडवली खर्च 28 टक्क्यांनी कमी झाला आणि त्याचा परिणाम जीडीपीवर जाणवला. गेल्या वर्षी याच काळात सरकारने 8.81 बिलियन डॉलर्स 630 अब्ज रुपये खर्च केले होते.