आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पदवी'साठी नव्हे तर जीवनमूल्य जपणारे शिक्षण घ्यावे; कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकरांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे. एकीकडे यशाच्या उत्तुंग शिखरावर महिला आहेत तर दुसरीकडे आजही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. शिक्षण म्हणजे फक्त शालेय, महाविद्यालयीन पदव्या घेणे नाही तर जीवन जगण्यासाठी आवश्यक ती मुल्ये जोपासणे आहे. स्त्री शिक्षण हे फक्त पदवीपुरते शिक्षण न घेता जीवनमुल्य जपणारे शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे शुक्रवार, ७ सप्टेंबर रोजी स्व. माई चिपळोणकर स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी पहिले पुष्प गुंफले. 


राष्ट्र सेविका समिती यांच्या वतीने श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात दोन दिवसीय स्व. माई उर्फ सावित्रीबाई चिपळोणकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले अाहे. गेल्या २७ वर्षांपासून ही व्याख्यानमाला सुरू असून, मागील २ वर्षांपासून युवा वर्गाचे सांस्कृतिक प्रबोधन या उद्देशाने विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्यानमाला घेण्यात येत आहे. या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी 'स्त्री शिक्षणाची व्याप्ती' या विषयावर विचार मांडले. रोजगाराच्या कौशल्यापुढे जीवनमूल्ये हरवत चालले आहे. शिक्षणापेक्षा नोकरी कशी मिळणार यासाठी कौशल्य प्रशिक्षण घेण्याकडे कल अधिक वाढला आहे. स्त्री शिक्षणाची गरज याबाबत अनेक वर्षांपासून जनजागृती होत असली तरी आजही ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाला मर्यादा आहेत. 


शालेय आणि महाविद्यालयात पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या तशी चांगली असली, तरी पुढील शिक्षण घेऊन स्वत:चे अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांच्या संख्या फारशी नाही. स्त्री शिक्षणाची व्याप्ती पदवीपुरती नाही. त्याच्या पलीकडे जाऊन जीवनमुल्ये जपणारे शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुलींनी देखील स्वत: बद्दल व्यापक विचार केला पाहिजे. लोकांची मानसिकता बदलली तरच समाज बदलतो. नुसते कौशल्य विकास साधणारे शिक्षण, पदवीपुरते शिक्षण न घेता जीवनमुल्ये जपणारे शिक्षण मुलींनी घ्यावे, असे विचार कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका यांनी शहरात मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन महिला महाविद्यालय सुरू करणाऱ्या श्रीमती राधादेवी गोयनका यांच्या जीवन आणि मुलींच्या शिक्षणविषयक कार्याविषयी विचार मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैष्णवी विटुरकर यांनी स्वागत गीत सादर केले. संयोजिका वृंदा देशपांडे यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या २७ वर्षांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सुरभी दोडके यांनी केले. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या नगर कार्यवाहिका स्मिता कायंदे, भारतीय सेवा सदनचे पदाधिकारी गोयनका, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र व्यास यांच्यासह राष्ट्र सेविका समितीच्या जिल्हा, नगरच्या सेविका, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...