आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूमचा दरवाजा बंद, गीझरचा गॅस लीक; गुदमरून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- साताऱ्यातील अालोकनगर येथे बाथरूममधील गॅस गीझर लिकेज होऊन गुदमरलेल्या गौरी संजय फासाटे या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नारेगाव परिसरातील ब्रिजवाडी भागातील गल्ली नंबर एकमधील घरात मंगळवारी (११ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता आग लागल्याने मोठे नुकसान झाले. घटना घडली तेव्हा घरात कोणीही नव्हते. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील तीन गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. 


पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सातारा परिसरातील अालोकनगर भागात बाथरूमधील गीझरचा गॅस अचानक लीक झाला. त्या वेळी गौरी आणि तिची १८ वर्षांची नातेवाईक मयूरी बाथरूमचा दरवाजा बंद करून कपडे धूत होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांना दरवाजा उघडण्याचे किंवा कोणाला आवाज देण्याचे सुचले नाही. दोघींच्या नाकातोंडात गॅस गेला. बराच वेळ झाला तरी मुली बाहेर येत नाहीत, कपडे धुण्याचा आवाजही थांबल्याचे लक्षात येताच घरच्या मंडळींनी दरवाजा तोडला. तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना तत्काळ सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १० सप्टेंबर रोजी गौरीचा मृत्यू झाला. 


हा प्रकार नेमका कसा घडला हे सखोल तपासातच स्पष्ट होईल. पण प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार गॅस श्वसनवाहिन्यांत गेल्यानेच मृत्यू झाला असावा असे दिसते, असे चंद्रमोरे म्हणाले. गौरीसोबतच्या मयूरीची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे सांगण्यात आले. मयूरी आणि गौरीचे काय नाते आहे, गौरीचे आईवडील काय करतात, आदींचा तपशील शोधणे रात्री उशिरापर्यंत सुरू होेते. 

 
शेजारच्यांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावले 
ब्रिजवाडीत पिताजी मोरे यांचे दोन खोल्यांचे घर आहे. मंगळवारी सकाळी घरातील सर्वजण कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. त्याच वेळी सकाळी अकराच्या सुमारास घरात आग लागली. शेजारच्यांनी ही माहिती तत्काळ मोरे कुटुंबीयांना दिली. तोपर्यंत शेजारच्यांनी अग्निशमन विभागाला फोन करून बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम जवानांनी घरातील सिलिंडर काढले. तोपर्यंत आगीत घरातील सोफा, टीव्ही व इतर साहित्य जळून गेले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 


प्रमाणित कंपनीचे गीझर, सिलिंंडर नसेल तर... 
गीझरमधून गॅस कसा लीक होऊ शकतो याबाबत गेल्या १५ वर्षांपासून गीझर विक्री करणारे धनंजय पांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, गीझरमधून गॅस लीक होऊच शकत नाही. पण योग्य पद्धतीने गीझरची फिटिंग झाली नसेल तर हा प्रकार होऊ शकतो. त्यांनी केलेल्या काही सूचना अशा : 


१ प्रमाणित कंपनीचेच गॅस सिलिंडर, गीझर घ्यावे. कारण किंचित गॅस लिकेज झाल्यास प्रमाणित कंपनीचे गॅस गीझर तत्काळ बंद होते. 
२ गॅस कंपन्यांनी प्रमाणित केलेलेच रेग्युलेटर वापरणे अावश्यक अाहे. 
३ बाजारात गॅस सेफ्टी किट मिळते त्याचा वापर करावा. 
४ बाथरूमच्या बाहेर गॅस सिलिंडर बसवावे. 

बातम्या आणखी आहेत...