आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनश्याम शेलार लढवणार नगर दक्षिणमधून लोकसभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर : लोकसभेच्या निवडणुकीत आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन ते उमेदवारीबाबत स्वतःच घोषणा करू लागले आहेत. आतापर्यंत जे लोकसभेत निवडून गेले, त्यांनी विकास केला नाही, तसेच कोणतीही योजना पूर्णत्वाला नेली नाही. आता तर दिवाळीला मिठाई देण्याची नवी परंपराही सुरू झाली आहे, अशी टीका शिवसेनेचे समन्वयक घनश्याम शेलार यांनी काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्यावर करतानाच पालकमंत्री राम शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला. 


नगरमध्ये शिवसेनेचे शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. या वेळी जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव आदी उपस्थित होते. 


शेलार म्हणाले, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी शिवसेना स्वबळावर लढणार असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्याची तयारी सुरू केली अाहे. मला निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाले आहेत. पण सध्या स्वयंभू नेते तयार झालेले आहेत. मीच लोकसभेचा उमेदवार आहे, मीच निवडणूक लढणार, निवडणूक हरलो, तर राजकारण करणार नाही, असे वक्तव्य करून गावोगाव सध्या टाहो फोडू लागले आहेत. याअगोदरही लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मात्र, त्या वेळेला मिठाई वाटली गेली नाही. त्यांना अगोदर कधीच दिवाळी दिसली नाही का? असा सवाल करत या वेळी उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून डॉ. सुजय विखे यांनी याच मतदारसंघांत मिठाई वाटली, हे कशाचे द्योतक आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 


मला १९९९ मध्ये लोकसभेची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली होती. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांमुळे ती उमेदवारी मला नाकारण्यात आली, पण या वेळेला मला निवडणूक लढवण्याचे संकेत मिळालेले आहे. त्यानुसार मी तयारी सुद्धा केलेली आहे. माझ्यासमोर कोणीही प्रतिस्पर्धी असो निश्चितपणे विजयासाठी आम्ही बांधील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


लोकसभा मतदारसंघांमध्ये माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी सुद्धा नेतृत्व केलेले आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात सुद्धा अनेक योजना पूर्ण झालेल्या नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेत घेऊन त्यांना मंत्रिपद देऊन काम करण्याची संधी होती. मात्र, त्या संधीचं त्यांनी सोनं केले नाही, असाही आरोप शेलार यांनी केला. नगर दक्षिण मतदारसंघांत पाण्याचा प्रश्न, साकळाई सिंचन योजनेचा प्रश्न, तसेच एमआयडीसी उद्योगांचे प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. आज उद्योगधंदे विकसित होणे आवश्यक आहे, रेल्वे वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, अशी अपेक्षा असताना येथील खासदारांनी याकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास खुंटला असल्याचा आरोपही शेलार यांनी केला. 


राजकारणात काहीही होऊ शकते... 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. ठाकरे यांनी केलेल्या वातावरण निर्मितीचा फायदा होईल. शिवसेनाच राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष राहील, पण युती झाली, तर पक्ष देईल ते काम करु असे सांगत राजकारणात काहीही होऊ शकते, असा सावध पवित्राही त्यांनी शेवटी घेतला. 


सर्वच मतदारसंघांत सेनेचे प्राबल्य : गाडे 
शिवसेना-भाजप युती असताना जे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे होते, तेथे आमचाच विजय झाला आहे. इतर तालुक्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते आम्हाला मिळाली आहेत. शिवसेनेचे प्राबल्य सर्वच मतदारसंघात आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी स्पष्ट केले. 


पालकमंत्र्यांनीही कामे केली नाहीत 
पालकमंत्री राम शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघात विकास कामे करता आली नाहीत. केवळ घोषणा करुन त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. कर्जतमधल्या चारीचा महत्त्वाचा प्रश्‍न त्यांना सोडवता आला नाही, त्यामुळे विकास कामे होवू शकली नाहीत. याला तेच जबाबदार आहेत असा आरोपही शेलार यांनी यावेळी केला. 
 

बातम्या आणखी आहेत...