आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिशेबात पक्की आजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकेच्या नोकरीत असताना शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची सेवा करण्याचे संधी मला मिळाली. शहरी आणि ग्रामीण ग्राहकवर्गातील मानसशास्त्रामध्ये जमीन आसमानचा फरक असतो . ग्रामीण भागातील लोक दिसतात तितके साधे भोळे मुळीच नसतात. अनेकांना व्यवहार चांगला समजतो. उदा. पीक कर्जाची परतफेड करताना बँकेचा माणूस यंत्राच्या साह्याने हिशोब करेपर्यंत त्याच्या खूप आधीच व्याज आणि मुद्दल मिळून पुरेशी रक्कम सोबत आणणारे शेतकरी मी पाहिले आहेत. बँकेचे बारा टक्के व्याज म्हणजेच सावकारी पद्धतीच्या एक रुपया शेकडा दराने आम्ही हिशोब करतो असे एका ग्राहकाने मला सांगितल्याचे चांगले आठवते. पावकी, निमकी औटकी सारखे अवघड पाढे मुखोद्गत असणारे लोक अजूनही आढळतात हे विशेष. त्यामुळे मिळालेले व्याज बरोबर आहे, याची खातरजमा ते चटकन करू शकतात. ग्रामीण मानसशास्त्राची आणखी एक वेगळी झलक एका अन्य प्रसंगातून अनुभवता आली. एकदा एका आजींनी त्यांच्या नातीच्या लग्नासाठी बँकेत पन्नास हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली. पुढे काही दिवसांनी अन्य कामानिमित्त आजीबाई बँकेत आल्या.
माझ्या मुदत ठेवीतील पैसे कुठे आहेत असे त्यांनी साहेबांना विचारले. आजीबाईंना पावती त्याच दिवशी देण्यात आली होती ह्या गोष्टीचे स्मरण दिले तेव्हा आजी म्हणाल्या, त्या बॉँडला काय करता, नोटा कुठे ठेवल्या आहेत ते सांगा ! शेवटी त्यांच्या समाधानासाठी त्यांना रोकड विभागात नेऊन नोटांच्या बंडलांची थप्पी दाखवली आणि क्षणात त्यांच्या तोंडातून शब्द फुटले, ‘आंग अशी, हे कसं झाक काम झालं, आता पटलं बघा!’ खुश होऊन त्यांनी बँकेच्या स्टाफला घरी चहाला येण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या घरी पितळीमधून चहा घेताना आम्हाला चिनी मातीच्या क्रॉकरीतील सॉसर आणि कपांचा केव्हाच विसर पडला होता.