आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौटुंबिक कलहाला पवार कुटुंबीयांनी दिला राजकीय रंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबक कापडे | जळगाव

‘ईडी प्रकरण, पवारांचा विषय अाणि अजितदादांचा राजीनामा हे विषय लोक आता विसरलेत. पवार कुटुंबातील तो अंतर्गत कलह होता. त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. ते एक नाटक होते हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मराठा समाजाला भाजप सरकारच्या काळात आरक्षण मिळाले, जे एवढ्या वर्षांत कोणत्याही सरकारने दिले नाही. त्यामुळे मराठा समाज नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट मराठा समाजातील अनेक नेते भाजपसोबत आलेेत,’ असा दावा भाजपचे ‘संकटमाेचक’ तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.

प्रश्न : बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, मंदी हे प्रश्न विरोधक जनतेसमोर मांडणार आहेत. तुम्ही त्याला काय उत्तर द्याल?
महाजन : सरकारविरोधात बोलायला राज्यात विरोधक तरी शिल्लक आहेत का?  विराेधकांकडील एक तरी नाव सांगा मला जो निवडणूक जिंकून दाखवू शकतो. राहिला प्रश्न भाजप सरकारचा, या सरकारने गत पाच वर्षांत जे केले तेवढ्या गतीने आणि पारदर्शीपणे कोणीच केले नाही. शेतकऱ्यांंना सरसकट कर्जमाफी दिली. सुरुवातीला काही त्रुटी राहिल्या, पण त्यात तत्काळ दुरुस्ती केली. सिंचन क्षेत्र वाढले आहे. वीज पंपाचा पुरवठा खंडित होऊ दिला नाही. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हेच मार्ग उद्या विकासाचे महामार्ग ठरतील. बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारचा आराखडा तयार आहे आणि त्या दिशेने कामेही सुरू आहेत.

प्रश्न : शरद पवारांचा करिष्मा चालला तर?

महाजन : पवारांचा करिष्माही संपलाय. आता मोदी, फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढलाय. केंद्रात जसे मोदी सरकार आले तसे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येईल.

प्रश्न : महायुतीला किती जागा मिळतील?

महाजन : २४० जागा निश्चित मिळतील अाणि पुन्हा आमचेच सरकार येईल.

प्रश्न : एकनाथ खडसेंचे तिकीट पक्षाने का कापले?

महाजन : याचे कारण पक्षाध्यक्ष अमित शहाच सांगू शकतील. काही अडचणी असतील किंवा नवीन बदल करण्याचा त्यांचा विचार असेल, यापेक्षा वेगळे मला काही माहीत नाही.

प्रश्न : युती सरकारने जलसिंचनाचे कोणते मोठे प्रकल्प हाती घेतले ?

महाजन : आम्ही एकही नवीन काम हाती घेतले नाही. चौकशीत जी कामे रद्द झाली तीच सुरू केली. कारण जुने अपूर्ण प्रकल्प पूर्ण करायला हजारो कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तोच पैसा शासनाकडे नाही. २०० कोटींच्या कामाला मंजुरी द्यायची आणि निधी २५ कोटी मंजूर करायचा, असे केल्यास एकही प्रकल्प पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही जुने प्रकल्पच पूर्ण केले. त्यातून हजारो एकर जमीन ओलिताखाली येईल.

प्रश्न : अपूर्ण प्रकल्प पूर्ण करताना कोणता निकष लावला?

महाजन : जी कामे अंतिम टप्प्यात होती ती आधी घेतली. ती पूर्ण झाल्यानंतर अन्य कामे घेतली. सर्वच प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता नव्हती. गेल्या १० वर्षांत १० प्रकल्पांनादेखील मान्यता मिळालेली नव्हती. आम्ही ३५० पैकी ३०० प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. तीन- तीन कमिट्या नेमून ही प्रक्रिया पार पाडली. आता कुठे तरी ते प्रकल्प मार्गी लागले आहेत.

प्रश्न : प्रकल्प पूर्ण करताना भूसंपादनाचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते?

महाजन : हो, भूसंपादनाचे खूप लोकांचे पैसे राहिले होते. आम्ही या प्रकरणांमध्ये सरळ खरेदी पद्धत सुरू केली. वर्षानुवर्षे कोर्ट, कचेरी करण्यापेक्षा जमिनींची किंमत ठरवून ती सरळ खरेदी केली. अशा पद्धतीने हजारो कोटी रुपयांची जमीन आम्ही खरेदी केली आणि प्रकल्प मार्गी लावले. पाणी साेडण्याची पद्धतही बदलली. कॅनॉलमधून सोडलेले निम्म्यापेक्षा अधिक पाणी वाया जाते. आपल्याला नवीन प्रकल्प बांधायला मर्यादा आहेत. त्यामुळे बंद पाइप पद्धत सुरू केली.


प्रश्न :  तापी नदीतून गुजरातमध्ये जाणारे पाणी अडवले पाहि
जे?

महाजन : आहे त्या पाण्याचा उपयोग करून घेणे हे महत्त्वाचे आहे. तापी नदीवर आपण सध्या धरण बांधू शकत नाही. महाराष्ट्र आणि गुजरातने किती पाणी घ्यावे, हे ठरले आहे. तापीमध्ये आपल्या वाट्याचे पाणी शिल्लक असले तरी ते उचलणे खर्चिक आहे. त्यामुळे आपण नदीजोड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. दुष्काळात खितपत पडत बसण्यापेक्षा कर्ज काढून ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

गरिबांच्या हुशार विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार

‘राज्यात गेल्या २० वर्षांत एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःची मेडिकल कॉलेजेस सुरू केली. भरमसाट फी घेऊन श्रीमंतांच्या पण गुणवत्ता नसलेल्या मुलांना डॉक्टर बनवण्याचा गोरखधंदा केला. अशा परिस्थितीत आम्ही राज्यात नवीन ५ मेडिकल कॉलेज सुरू करत आहोत. जळगाव व बारामतीत नवीन कॉलेज सुरू झाले आहे. एक हजार जागा वाढवल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या हुशार विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे’,  असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...