आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंगोट वेळेवर शिवून अंगाला तेल लावले की कुस्ती जिंकतो मंत्री गिरीश महाजनांचा शिवसेनेला चिमटा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी इच्छा व प्रयत्न आहेत. मात्र, मित्रपक्ष सेनेचे मंत्री लंगोट बांधून तयार असल्याच्या घोषणा करताहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे पट्टीचे पहिलवान आहेत. ते लंगोट बांधून नव्हे, तर खिशात घेऊन फिरतात. आम्ही मात्र नेहमीच कुस्तीसाठी तयार असतो. आमच्याकडे कापड तयार असतेच. वेळेवर लंगोट शिवून अंगाला तेल लावले की आम्ही कुस्ती जिंकतो, असा चिमटा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला शुक्रवारी घेतला. जळगावातील अजिंठा विश्रामगृहावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, युतीची गरज भाजपसोबतच शिवसेनेलाही आहे. दोन्ही पक्षांचा त्यात फायदा आहे. वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य नाही. परंतु, शिवसेना लंगोट बांधून तयार असेल तर आम्हीही मैदान मारायला सक्षम आहोत. आम्ही युतीचे जर-तर गृहीत धरून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वेळीही विजय आमचाच होईल, असेही ते म्हणाले. 

 

आज अण्णांची भेट घेणार : 
अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अण्णांना अपेक्षित असलेल्या अनेक बाबींचा समावेश केला आहे. हे बजेट अभ्यासल्यानंतर अण्णा हजारे नक्कीच उपोषण मागे घेतील. यासंदर्भात २ फेब्रुवारी रोजी मी स्वत: राळेगणसिद्धी येथे जाऊन त्यांची भेट घेणार आहे.
 
पवार सत्तेसाठी उतावीळ 
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आमच्या सरकारने केलेले कोणतेही काम चांगले वाटणार नाही. ते सत्तेत आणि पदावर येण्यासाठी उतावीळ असून धडपडत आहेत. विरोधात काम करताना त्यांची दमछाक होत आहे. त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाबद्दल काैतुक किंवा शाबासकीची अपेक्षा नाही. ते चांगल्याला चांगले म्हणू शकत नाहीत. त्यांनी स्वत: काहीही केले नसल्याचे ते म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...