देशातील 12 राज्यांमध्ये / देशातील 12 राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटला; महाराष्ट्रात वाढ

जितेंद्र झंवर

Feb 16,2019 10:40:00 AM IST

औरंगाबाद-शासनाकडून लिंगनिदानाविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. त्याचप्रमाणे बेटी बचाओ जनजागृती मोहीम राबवली जात आहे, परंतु सकारात्मक परिणाम अजूनही पुरेसा दिसत नाही. देशातील ११ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशात मुलांचा जन्मदर २००७ च्या तुलनेत २०१६ मध्ये घटला आहे. महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर वाढला आहे. जनगणना आयुक्तांच्या (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम) नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा व उत्तराखंडमध्ये मुलींच्या जन्मदरात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. आंध्र प्रदेशात २००७ मध्ये प्रति हजारी मुलांमागे मुलींचा जन्मदर ९७४ होता. तो आता ८०६ वर आला आहे. २००७ च्या तुलनेत त्यात १६८ ने घट झाली आहे. कर्नाटकात १००४ वरून ८९६, तामिळनाडूत ९३५ च्या तुलनेत ८४०, ओडिशात ९१९ च्या तुलनेत ८५८, तर उत्तराखंडमध्ये ८६९ च्या तुलनेत ८२५ झाला आहे. त्याचप्रमाणे गोवा ९४७ (९००), जम्मू व काश्मीर ९२२ (९१४), झारखंड ८६५ (८६३), राजस्थान ८३२ (८०६), पश्चिम बंगाल ९१८ (९११) व पुद्दुचेरी ९५० (९३१) झाला आहे. मणिपूरमध्ये २००७ मध्ये ९१३ मुलींचा जन्म होता. २०१५ मध्ये हे प्रमाण घसरून ६८६ वर आले आहे. महाराष्ट्रात २००८ मध्ये दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण ८७० होते, ते वाढून ९०४ झाले आहे. देशात मुलींचा जन्मदर सिक्कीममध्ये सर्वाधिक ९९९ त्यानंतर अरुणाचल प्रदेश व मिझोरममध्ये ९६४ आहे.

मृत्यूच्या नोंदीत नागालँड, बिहार मागे
देशातील आठ राज्यांत मृत्यूची नोंद १०० टक्के होत असल्याचे जनगणना आयुक्तांच्या अहवालात म्हटले आहे. त्यात गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मिझोरम, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडूचा समावेश आहे. चंदिगड, दादर व नगरहवेली, दिल्ली व पुद्दुचेरीत १०० टक्के मृत्यूची नोंद होत आहे. सर्वात कमी नागालँडमध्ये १९ टक्के, तर बिहारमध्ये २८ टक्के होत आहे. महाराष्ट्रात मृत्यूच्या नोंदीचे प्रमाण ९३.७ टक्के आहे.

उपाययोजना करू
- देशातील मुलींचा जन्मदर कमी असलेल्या १६१ जिल्ह्यांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवले जात आहे. अभियानानंतर या ठिकाणी मुलींचा जन्मदर वाढला आहे. आता ज्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी झाला आहे, त्याचा शोध घेऊन तेथे उपाययोजना करू.
राजेंद्र फडके, ‘बेटी बचाओ’ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक

X
COMMENT