आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फी भरण्यासाठी पैसे नसल्याने सोलापूरात विद्यार्थिनीने किटकनाशक प्राशन करुन संपवले जीवन, पात्रता परिक्षेत मिळाले होते 89 टक्के गुण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ- मला कॉलेजला जाता येईल का नाही? या भीतीने 17 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज(24 जुलै)पहाटे मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावी घडली. रुपाली रामकृष्ण पवार असे मृत मुलीचे नाव आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील देगाव येथील रुपाली पवार या विद्यार्थिनीला सीईटीच्या पात्रता परीक्षेत 89 टक्के गुण मिळाले होते. तिने लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालिंदर, पंजाबमध्ये बी.टेक.साठी प्रवेश घेण्याचे ठरवल होते. या अकादमीत दहा हजार भरून प्रवेशही निश्चित केला होता. मात्र उर्वरित एक लाख रुपयांची रक्कम भरावी लागणार होती. त्याची शेवटची मुदत 20 जुलैपर्यंत होती. सातत्याने तीच्या वडिलांनी रक्कम जमवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वतःची तीन एकर असलेली कोरडवाहू शेतजमीन ही विकायला काढली होती. मात्र त्या जमिनीची किंमत कवडीमोल भावाने होत होती. तिच्या बी.टेक च्या प्रवेश प्रक्रियेला पैसे भरण्यासाठी परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने राहिलेले 1 लाख रुपये भरणे शक्य झाले नाही.

 

मी एवढी हुशार असूनही माझा काय उपयोग? अशी ती म्हणायची त्यातुनाच माझ्या मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे तिचे वडील रामकृष्ण पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तिने आज(24 जुलै)पहाटे मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या  दरम्यान राहत्या घरी आत्महत्या केली. तिला तात्काळ उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात आणले असता तिची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले होते, पण तिथे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. 
 

देगाव सारख्या ग्रामीण भागातील रुपाली पवार या विद्यार्थिनीने उच्च शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण घेतले. मात्र पुढील शिक्षणासाठी आर्थिक ओढाताण होऊ लागली. आणि त्यातूनच तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला या संपूर्ण घटनेमुळे मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.