आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीचा बाप !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असाच एकदा माझ्या खोलीत एकटाच बसलो होतो. रात्रीचे अकरा वाजले होते. एखादा जुना हिंदी चित्रपट बघावा म्हणून डीव्हीडी सुरू केला. ‘नीलकमल’ नावाचा नितांतसुंदर सिनेमा मी यापूर्वी कितीदा तरी पाहिला असेल. आज मात्र त्यातल्या बलराज साहनीशी माझी तुलना करू लागलो. माझी आणि बलराज साहनीची अवस्था एकच असल्याचा भास होऊ लागला. ‘नीलकमल’ निर्माण झाला त्या वेळची सामाजिक परिस्थिती आज कितीतरी बदलली आहे. तरीही माझ्या डोळ्यांतून अश्रू का वाहत असावेत हे मला समजत नव्हते.

मुलीचा जन्म झाल्यापासून तिचे पालनपोषण करणे, तिच्यावर योग्य संस्कार करणे, तिला उत्तमोत्तम शिक्षण देऊन तिच्या पायावर उभी करणे ही सारी कर्तव्ये पार पाडताना मुलीचा बाप एका वेगळ्याच आदर्शवादी जगात वावरत असतो. परंतु ज्या वेळी तो आपल्या लाडक्या लेकीसाठी अनुरूप जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतो, त्या वेळी त्याला दाहक सामाजिक वास्तविकतेचे चटके बसू लागतात. तुमचे घरंदाज कुटुंब आहे. तुमची मुलगी सुंदर आहे, सुशील आहे. तिचा पगारही आमच्या चिरंजीवाइतकाच आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. वधू-वरांच्या अंगावर दागदागिने, संसारोपयोगी फ्रिज, टीव्ही इत्यादी सर्व तुम्ही द्यालच. एखादे भव्य मंगल कार्यालय बुक करा. आमच्या इभ्रतीला शोभेल अशा थाटामाटात कार्य पार पाडा. आम्हाला कशाची अपेक्षा नाही, परंतु तुम्ही तुमच्या मुलीसाठी एवढे करणारच ना, असे ऐकावे लागते. भिका-यालाही इभ्रत असते हे मुलीच्या बापाला त्या वेळी समजते. याला काही अपवाद नक्कीच आहेत, परंतु त्यांची संख्या नगण्य आहे. वास्तविक जीवनात कितीही मोठा असला तरी मुलीचा बाप मुलीच्या सासरी लाचार का दिसतो ? त्याने तिथे हात जोडून, मान खाली घालूनच वावरले पाहिजे, अशी अपेक्षा का ठेवली जाते ? सासरी उद्भवणा-या कुठल्याही प्रसंगी आपल्या मुलीची चूक नसतानाही तिचा बाप तिलाच नमते घ्यायला का सांगतो ?