ठाण्यात प्रेम प्रकरणातून / ठाण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून

May 20,2011 06:09:52 PM IST

ठाणे - ठाण्यातील सिद्धिविनायक रेसिडेन्सी भागात विवाहित पुरुषाशी असलेल्या प्रेमसंबधातून एका तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी तरुणीच्या प्रियकराला कासरवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका अशोक त्रिभुवन (वय २८) अशी हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मोनिकाच्या वडिलांचे निधन झाले असून, ती आपल्या आईसोबत घोडबंदर रोडवरील सिद्धिविनायक सोसायटीत भाड्याच्या घरात राहते. मोनिकाने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून, ऋतु एन्क्लेवनजीकचे 'लेमन ऍण्ड स्पाइस' हे हॉटेल ती पार्टनरशिपमध्ये चालवत होती. या हॉटेलचा पार्टनर नीलेश सत्वी (वय ३५) याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. ठाण्यातील विजय गार्डन परिसरात वास्तव्याला असलेल्या नीलेशकडे वाडा तालुक्यातील काही कंपन्यांच्या कॅन्टीनचे कॉन्ट्रॅक्टही होते.

गेल्या दीड वर्षांपासून नीलेश आणि मोनिका यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, नीलेशचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत, याची माहिती मोनिकाला नव्हती. नीलेश नेहमी मोनिकाच्या घरी यायचा. तो आला तरी त्याची नोंद रजिस्टरमध्ये करू नका, असेही मोनिकाने रखवालदारांना सांगितले होते. येत्या काही दिवसांत ते दोघे लग्न करणार असल्याचीही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत नीलेश मोनिकाच्या घरात होता. त्याच दरम्यान मोनिकाची हत्या झाली आहे. मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून मोनिकाला ठार मारण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नीलेशनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप मोनिकाच्या आईने केला आहे.X