आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल क्रमांक ब्लॉक केल्याने मुलीस धमकी, संशयाविरोधात गुन्‍हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मोबाइल क्रमांक ब्लॉक केल्याने युवकाने एका युवतीला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात घडला. गंगापूर पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरात मुलींना धमकावण्याचे अाणि विनयभंगाचे प्रकार वाढत असल्याने पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात अाहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती व पिडीत युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील संशयित राहुल गोराडे (रा. आडगाव) ओळखीचा गैरफायदा घेत तो अंगलटीचा प्रयत्न करत असल्याने तिने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. याचा राग येऊन त्याने महाविद्यालयात येत 'तू माझा मोबाइल नंबर का ब्लॉक केला? नंबर सुरू कर, नाही तुला बघून घेईन', अशी धमकी देत हात पकडून विनयभंग केला.

 

युवतींना धमकीचे प्रकार वाढूनही यंत्रणा सुस्त : शाळा-महाविद्यालयातील युवतींचा पाठलाग करत त्यांना धमकी देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत; मात्र पोलिसांत केवळ गुन्हा दाखल केला जातो. पोलिसांकडून तत्काळ आणि कठोर कारवाई होत नसल्याने टवाळखोरांची हिंमत वाढली आहे. महिला, युवती व मुलींना शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, कंपनी परिसर, तसेच निवासी परिसरातील सार्वजनिक ठिकाणी जाताना असुरक्षित वाटत असल्याचे काही घटनांवरून दिसून अाले अाहे. या परिसरात टवाळखोरांच्या टोळक्यांकडून छेडछाडीचे प्रकार घडत असल्याने रस्त्याने जाताना महिलांना असुरक्षित वाटते.


गस्तीचा अभाव
शाळा, महाविद्यालय बसस्थानक, कंपनी परिसरात पोलिसांची गस्त होत नसल्याने टवाळखोरांचा उद्रेक वाढला आहे. पोलिस ठाणेनिहाय बीट मार्शलची गस्तीचा अभाव असल्यानेही महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

 

पोलिसांकडून तक्रारीची वाट
छेडछाडीचे प्रकार काही नागरिकांकडून पोलिसांना कळवले जातात; मात्र पोलिसांकडून या तक्रारदारांची उलट तपासणी केली जात असल्याने तक्रार देण्यास कुणी पुढे येत नाही. पोलिस अधिकाऱ्यांकडून हद्दीचा मुद्दा पुढे करत टवाळखोरांवर कारवाई न करता या प्रकारांकडे डोळेझाक केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

 

'मिशन टवाळखोर'चा विसर
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना पदभार स्वीकारताना शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दंडुका हाती घेत रस्त्यावर उतरत कोम्बिंग, ऑलआउट, नाकेबंदीसारख्या धडक कारवाई सुरू केल्या होत्या. मात्र, सामाजिक उपक्रमात कालांतराने व्यस्त झाल्याने या कारवाईकडे आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे चित्र आहे.

 

निर्भया, मर्दानी पथके उरली नावाला
छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी मर्दानी, निर्भया पथकांची निर्मिती केली; मात्र 'नव्याचे नऊ दिवस' याप्रमाणे ही पथके औट घटकेचीच ठरली. महिला सुरक्षा पथकाकडून केवळ कौटुंबिक प्रकरणांमध्ये मदत केली जात असल्याची माहिती या शाखेच्या वतीने देण्यात आली.

 

या घटनांमुळे महिला-युवती असुरक्षित
काही दिवसांपूर्वीच कंपनी कामगार महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत तिच्या भावाला मारहाण करण्यात आली. तसेच, गेल्या काही काळात घरामध्ये घुसून महिलेचा विनयभंग, उपनगर परिसरात एका महाविद्यालयातून अकरावीच्या मुलीचे अपहरण करून विनयभंग, एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन भररस्त्यातच विनयभंग, शालेय मुलीला निर्जनस्थळी नेत मस्ती जिरवण्याची धमकी अशा विविध घटनांमुळे शहातील महिला व युवतींमध्ये भीती अाणि असुरक्षिततेचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...