अमानुष प्रकार / प्रियकराच्या घरी भेटीला गेलेल्या चंद्रपूर येथील तरुणीला नातेवाइकांची बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण, रुग्णालयात दाखल

फाेन केल्यानंतर दीड तासाने अाले पाेलिस; सहा तास उलटूनही जबाब नाेंदवला नव्हता

प्रतिनिधी

Jul 29,2019 08:51:00 AM IST

जालना - प्रियकराच्या भेटीच्या ओढीने मूळची चंद्रपूर येथील रहिवासी असलेली आणि सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने थेट जालना गाठले. तेथून ती जालना तालुक्यातील प्रियकराचे गाव असलेल्या पीरकल्याण (सीड) येथे पोहोचून त्याचे घर गाठले. मात्र प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला घरात घेणे तर दूरच तिला हाकलून देत बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. या तरुणीवर सध्या जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रामस्थांतील चर्चेनुसार पुणे येथे शिकत असलेली एक मुलगी व पीरकल्याण येथील एक मुलगा यांचे प्रेम प्रकरण आहे. प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी रविवारी सकाळीच पीरकल्याण येथे पोहोचली. तिने ग्रामस्थांना पत्ता विचारून त्याचे घर गाठले. परंतु, ती मुलगी त्या मुलाच्या घरी आल्यानंतर मुलाच्या नात्यातील काही लोकांनी तिला बेशुद्ध होईपर्यंत जबर मारहाण केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बेशुद्ध पडल्यानंतर काही वेळाने त्या तरुणीला शुद्ध आली. ग्रामस्थ तिच्याभोवती गोळा झाले. कुण्या तरी ग्रामस्थाने तालुका जालना पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर दीड तासांनी पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तरुणीस जालना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.


ना दाद ना फिर्याद :

निष्काळजीपणामुळे तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी निलंबित केले आहेत. एखादी घटना घडल्यानंतर पोलिस ठाण्याला फोन लावायचा झाल्यास या ठाण्याचा फोन नेहमीच बंद असतो.

जबाब घेण्यासाठी आलेला पोलिस कर्मचारी मद्य प्राशन केलेला

सहा तासांनंतरही या मुलीचा जबाब घेण्यासाठी कुणी आले नव्हते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास एक पोलिस आला. परंतु, तो ही मद्य प्राशन करुन आला होता. तो तरुणीला हसून-हसून प्रश्न विचारत होता. यामुळे त्या पोलिसाला माघारी पाठवण्यात आले असल्याचे भारिपचे आनंद म्हस्के यांनी सांगितले.

तत्काळ पोहोचलो
मुलीला पोलिसांनी दवाखान्यात आणले. परंतु, नंतर तिचा जबाब घेण्यासाठी सहा तास एकही पोलिस फिरकला नाही. जो पोलिस आला तो मद्यप्राशन केलेला होता. मुलीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध करीत आहोत.
आनंद म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष, भारिप युवा, जालना.


दवाखान्यात आणले
मारहाण झालेल्या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर मुलीला दवाखान्यात आणले आहे. तिचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल. अजूनतरी गुन्हा दाखल झालेला नाही.
सुभाष भुजंग, पो. नि., तालुका जालना.

X
COMMENT