आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास नकार दिल्याने प्रियकराकडून तरुणीची भररस्त्यात हत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - विवाहास नकार दिल्याने प्रियकराने भररस्त्यात चाकूने सपासप वार करत तरुणीची हत्या केल्याचा प्रकार अमरावती शहरात घडला. राजापेठ ते अंबादेवी मार्गावरील गोपालप्रभा मंगल कार्यालयाजवळील गल्लीत ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. हल्ला करून पळणाऱ्या प्रियकरास नागरिकांनी पकडून राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.


तुषार किरण मस्करे (२०, मलकापूर) असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे. तुषार आणि मृत युवतीचे २०१५ पासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, दोघांनी कायम सोबत राहाण्याच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु,  दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांचा विवाह होऊ शकला नाही. मात्र, जून २०१९ मध्ये त्यांनी एका मंदिरात जाऊन लग्न केल्याचा तुषार मस्करेने पोलिसांसमोर तपासादरम्यान दावा केला आहे. त्याने लग्नावेळी काढलेली छायाचित्रेही पोलिसांना दिली आहेत. परंतु, मंदिरात केलेल्या लग्नाला कोणतीही कायदेशीर मान्यता नव्हती. त्यामुळे तुषारने पीडितेच्या वडिलांची भेट घेत लग्नाची मागणी केली. परंतु, तिच्या वडिलांनी लग्नास स्पष्ट नकार देत बडनेरा पोलिस ठाण्यात एक महिन्यापूर्वीच तक्रार दिली होती. त्यामुळे, पोलिसांनी तुषारला ठाण्यात बोलावून घेतले. यापुढे मुलगी किंवा तिच्या कुटुंबीयांना त्रास देणार नाही, असे तुषार व त्याच्या भावाने लिहून दिले. शिवाय लग्नाचे फोटोही डिलीट केले. मुलीची बदनामी होऊ नये म्हणून वडिलाने तक्रार दिली नव्हती. मात्र, नंतर त्याचाच राग धरून ठेवत तुषारने प्रेयसीची हत्या केली.