आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

501 कन्यारत्नांचे सामूहिक बारसे; कीर्तन महोत्सवात मुलींना एकाच वेळी मिळाली स्वत:ची ओळख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीडमधील १५ व्या खटोड राज्यस्तरीय कीर्तन महाेत्सवात रविवारी ५०१ कन्यारत्नांचे सामूहिक नामकरण करण्यात आले. नवजात मुलींना पाळणा, कपडे, खेळणी, चांदीचे वाळे अशा भेटवस्तू देण्यात आल्या, तर मुलींच्या मातांना साडीचोळीचा आहेर करण्यात आला. या विक्रमाची वंडर बुक ऑफ रेकाॅर्डमध्येही नाेंद झाली. गेल्या वर्षी याच महाेत्सवात ३०१ मुलींचे नामकरण झाले हाेते. जिल्हा रुग्णालय व आराेग्य प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला हाेता.

 

जिल्ह्यात २०११-१२ मध्ये मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ७९७ असा होता. त्यानंतर हे प्रमाण वाढत गेले. २०१२-१३ मध्ये ८९३, २०१६-१७ मध्ये ९२७, २०१७ -१८ मध्ये ९३६ असणारा जन्मदर २०१८ च्या नोव्हेंबरपर्यंत ९३८ वर जाऊन पोहोचला. शासनाच्या उपाययोजना, प्रबोधनात्मक कार्यक्रमांमुळे सकारात्मक बदल हाेत आहेत. 

 

बीडमधील सोहळा मुलींच्या सामूहिक नामकरणाची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 

कीर्तन महोत्सवाचा भव्य सभामंडप...व्यासपीठावरून "मेरी घर आयी नन्ही परी', "तू कितनी भाेली है, तू कितनी अच्छी है', अशा गीतांचे सूर उमटत होते. त्याच वेळी एकाच वेळी तब्बल ५०१ पाळण्यात बसवलेल्या चिमुकल्यांच्या कुर्रर्र असा आवाज काढत बाळांच्या आत्या त्यांचे नामकरण करत होत्या. शेकडो आत्याबाईंसोबत खासदार प्रीतम मुंडे मावशीच्या भूमिकेत होत्या. एका मुलीचे नामकरण करून त्यांनी आत्याची भूमिकाही पार पाडली. गर्दीने फुलून गेलेल्या भव्य सभामंडपात आनंदाला जणू उधाण आले होते. नामकरणानंतर मिठाईने सर्वांचे ताेंड गोड होत होते. हा भव्य, दिव्य आणि देखणा सोहळा रविवारी पडला स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १५ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात. एकाच वेळी ५०१ कन्यारत्नांच्या नामकरणाचा हा सोहळा सर्वांनी आपल्या डोळ्यांत तर साठवलाच शिवाय वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली. 

 

बीडकरांनी अनुभवला दुसऱ्यांदा उपक्रम : 
यंदा दुसऱ्या वर्षीही 'स्त्री जन्माचे स्वागत करा', 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकारातून रविवारी सकाळी १० वा. मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे, गोवत्स राधाकृष्ण महाराज (जोधपूर) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार वंडर बुक रेकॉर्डचे भारतातील हैदराबाद येथील समन्वयक बिंगी नरेंद्र गौड आणि डॉ. स्वर्ण गुराम, आरोग्य उपसंचालक डॉ.माने, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, स्वप्निल गलधर, सलीम जहांगीर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गाैतम खटाेड, संयाेजक भरतबुवा रामदासी यांची उपस्थिती होती. औरंगाबाद येथील अनघा संदीप काळे व गौरव पवार हे बारशाची गीते गात होती. त्यामुळे सर्व वातावरण भारावून गेले होते.
 
पाच सुवासिनींनी भरली मातांची ओटी : 
वंचित, उपेक्षितांना आनंद देणे हे मोठे कार्य आहे. बीडमध्ये खटोड प्रतिष्ठानच्या वतीने ३१ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत आयोजित कीर्तन महोत्सवात ५०१ कन्यांचा सामूहिक नामकरण सोहळा रविवारी झाला. असा भव्य कार्यक्रम होत असल्याचा खूप आनंद वाटतो. समाजातील वंचित,उपेक्षित घटकांना आनंद देणे हे सर्वात मोठे सामाजिक कार्य असते, असे मतखा. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले. 

 

फराळाची व्यवस्था 

पाैष मासानिमित्त महिलांना उपवास असल्याने प्रतिष्ठानच्या वतीने साबुदाणा खिचडीची व्यवस्था केली. बारशानिमित्त आलेल्या आत्याबाई आणि आईसह सर्व नातेवाइकांना मिष्टान्न भोजनासोबत उपासकऱ्यांना काजू, बदाम, मनुके, रेवड्याही देण्यात आल्या. 

 

बाळाला चांदीचे वाळे, आईचे फेटे बांधून स्वागत 
मुलींच्या नामकरण सोहळ्यात मुलींना पाळणा, कपडे, खेळणी, चांदीचे वाळे, अशा वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या तर मुलींच्या मातांना साडीचोळीचा आहेर, तसेच फेटा बांधून हळदी-कुंकू लावून स्वागत सत्कार करण्यात आले. एरवी चार भिंतीच्या आत होणाऱ्या बारशाला घरातील लोक आणि आप्तेष्टच उपस्थित असतात. बीडमध्ये मात्र हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नामकरण सोहळा पार पडला. 

 

यांनीही केले नामकरण 
प्रतिष्ठानच्या वतीने पल्लवी खटाेड, काेमल मुनाेत, श्रद्धा बाेरा, दीपा काेटेचा, अनिता खटाेड या पाच सुवासिनींनी ५०१ बाळाच्या आईंची तांदूळ, हळकुंड, सुपारी, खारीक, खाेबरे आदीं साहित्य देऊन ओटी भरली. सामूहिक नामकरण सोहळ्यात बोलताना खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपण बाळांची मावशी म्हणून आले, असे जाहीर केले तरी त्यांनी आत्या बनून कालिका वाघमारे यांच्या कन्येचे भारती असे नामकरण करत आत्याची भूमिकाही निभवली. 

 

वंडर बुकात नोंद 
कीर्तन महोत्सवातील या सामूहिक नामकरण सोहळ्याची 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड' या लंडन स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने नोंद घेतली. संस्थेचे हैदराबाद येथील समन्वयक बिंगी नरेंद्र गौड आणि डॉ. स्वर्ण श्री गुराम यांनी सोहळ्याचे निरीक्षण केले. या उपक्रमामुळे खटोड प्रतिष्ठानची दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद झाली आहे.