आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज - घरच्या हलाकीच्या परिस्थितीशी चार हात करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून सीमा भगवान बोकणकर (१८, रा. पोलिस कॉलनी, पंढरपूर) या तरुणीने नुकताच १७ जुलै रोजी औद्योगिक परिसरातील रेस लक्ष करिअर अकॅडमी येथे प्रवेश घेतला होता. सिडको येथील जलकुंभाच्या मोकळ्या मैदानावर सरावाच्या पहिल्याच िदवशी गुरुवारी पहाटे ६.३० वाजेच्या सुमारास तिला अचानक चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केले. सीमाला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मृत सीमाला एक बहीण असून तिचे वडील अपंग आहेत. ते परिसरातील शाळा, महाविद्यालयासमोर गोळ्या-बिस्कीटची विक्री करतात, तर आई पंढरपूर येथे भाजी विक्री करते. घरची परिस्थिती हलाकीची असणारी सीमा नुकतीच ७२ टक्के गुणांसह विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली होती. पुढील महागडे शिक्षण आपल्याला परवडणारे नाही, याची जाणीव असणाऱ्या सीमाने सुरुवातीला पोलिस भरती व नंतर खात्यातून परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले होते. याबाबत ती नेहमी तिच्या आईशी चर्चा करत असे. त्यासाठीच तिने बारावीनंतर शहरातील अनेक पोलिस भरती प्रशिक्षण अकॅडमीला भेट दिली होती. मात्र, अकॅडमींची भरमसाट फीस भरण्याची परिस्थिती नसल्याने तिने काही दिवसांपूर्वी घरीच पुस्तकी धडे गिरवणे सुरू केले होते. मात्र, लेकीच्या कर्तृत्वावर व मेहनतीवर ठाम विश्वास असणाऱ्या तिच्या आईने परिचित व्यक्तीच्या मध्यस्थीने वाळूज औद्योगिक परिसरातील रेस लक्ष अकॅडमीचे संचालक शिवाजी बनकर यांची भेट घेऊन आर्थिक परिस्थितीबाबत माहिती दिली. सीमाच्या प्रवेशाबाबत विनंती केली. त्यावर नाममात्र शुल्कामध्ये बनकर यांनी तिला प्रवेश दिला.
उत्तरीय तपासणीनंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले. या प्रकरणी वाळूज एम पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेड काॅन्स्टेबल गणेश अंतरप करत आहेत.
सीमाला ग्राउंडवर सोडण्यासाठी आई सोबत गेली
सीमा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहाने ती पहाटे ६ वाजता व्यायामासाठी ग्राउंडवर गेली. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ती सराव करत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडली. तिला तत्काळ बजाजनगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला घाटीत हलवण्याचा सल्ला दिला. तिथे डॉक्टरांनी सीमाला तपासून मृत घोषित केले. विशेष म्हणजे लेकीचे कौतुक पाहण्यासाठी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सीमाला ग्राउंडवर सोडण्यासाठी तिची आई सोबत गेली होती. मात्र, काही वेळातच सीमाच्या अकाली निधनाची वार्ता तिच्या कानी पडली. सीमाच्या या अकाली निधनामुळे दोघींनी मिळून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिल्याची भावना तिच्या आजवरच्या संघर्षमय प्रवासात साक्षीदार राहिलेल्या तिच्या आईने व्यक्त केली.
भरतीपूर्वी वैद्यकीय तपासणी केली होती का? : पोलिस किंवा सैन्य भरतीपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्यास पुढील प्रक्रियेतून जावे लागते. तशाच प्रकारे प्रत्येक अकॅडमीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करूनच त्यास प्रवेश देणे बंधनकारक असताना बहुतांश अकॅडमी चालक नियमांची पायमल्ली करत विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देतात. त्यातून असे गंभीर प्रकार घडत असल्याचे मत तज्ज्ञ लोकांकडून व्यक्त केले जात आहे.
पंढरपुरावर शोककळा
पंढरपूर येथील बोकणकर परिवाराच्या आर्थिक संघर्षाबाबत गावभर माहिती असणाऱ्या व यातून बाहेर येण्यासाठी बाल वयापासून आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावणाऱ्या सीमाच्या अकाली जाण्याने संपूर्ण पंढरपुरावर शोककळा पसरली आहे. परिचित असणारा प्रत्येकजण तिच्या आई-वडिलांचे सांत्वन करत हळहळ व्यक्त करत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.