आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाटणा - मुझफ्फरनगर शेल्टर होममध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सीबीआयने आपला आरोप-पत्र कोर्टात सादर केला. मुख्य आरोपी बृजेश ठाकूरच्या इशाऱ्यांवर बालिका आश्रमात काय-काय व्हायचे याचा तपशील तपास संस्थेने 73 पानांच्या या चार्जशीटमध्ये दिला आहे. त्यानुसार, बालिकागृहातील अल्पवयीन मुलींना वाट्टेल तेव्हा अश्लील गाण्यांवर डान्स करण्यासाठी मजबूर केले जात होते. मुलींना गुंगीच्या आणि विविध प्रकारच्या औषधी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला जात होता. गेल्या कित्येक वर्षांपासून बालिका गृहात मुलींचे शोषण करणाऱ्या मुख्य आरोपीचे राजकीय नेते आणि बड्या अधिकाऱ्यांशी संपर्क आहेत. त्यामुळेच, तो इतके दिवस पोलिसांच्या हाती आलेला नव्हता.
मुझफ्फरनगर बालिकागृहातील अत्याचार प्रकरणात बृजेश ठाकूरसह इतर 20 आरोपी आहेत. त्यामध्ये बालिकागृहातील कर्मचाऱ्यांवर सुद्धा पोक्सो अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलींना अंगप्रदर्शनासाठी तोकडे कपडे घालण्यास मजबूर केले जायचे. त्यांना अश्लील भोजपूरी गाण्यांवर डान्स करायला लावायचे. यासोबतच अमली पदार्थ आणि विविध प्रकारच्या औषधी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला जात होता. ज्या मुली विरोध करायच्या त्यांना बेदम मारहाण केली जात होती. आरोपी बृजेश ठाकूर आश्रमात येणाऱ्या पाहुण्यांसमोर या मुलींना हे सर्वच करण्यासाठी मजबूर करत होता असेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.
सरकारी अनुदानावर चालणाऱ्या या बालिकागृहात गेल्या 10 वर्षांपासून अत्याचार सुरू होते. टाटा इंस्टिट्युट ऑफ सोशल सायन्स (TISS) च्या अहवालानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. बालिका गृहातील 42 अल्पवयीन मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यापैकी 34 मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे निष्पन्न झाले. एकेकाळी 4 मजली असलेली ही इमारत आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बृजेश ठाकूरचे पॉलिटिकल कनेक्शन आहेत. तो बिहारच्या सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या नेत्यांचा जवळचा आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याचे मजबूत राजकीय संबंध असल्याचे म्हटले आहे. सोबतच, राज्यातील तुरुंगात ठेवल्यास तो खटल्यावर परिणाम टाकू शकतो. त्यामुळे, त्याला दुसऱ्या राज्यातील तुरुंगात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. देशभर संताप उमटणाऱ्या या प्रकरणानंतर बिहारचे समाज कल्याण मंत्री मंजू वर्मा यांना राजीनामा द्यावा लागला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.