आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकूल संस्था परिवारातील विशेष मुलींनी साकारले पर्यावरणपूरक गणपती, थक्क करणाऱ्या कलाकृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मानसिक अपंग अर्थात विशेष व्यक्तींना ताेल सांभाळता येत नाही, त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही, सर्वसामान्यांप्रमाणे त्याला काेणतीही कला जाेपासता येत नाही, वगैरे वगैरे समज खाेडून काढत शाडू मातीच्या अतिशय सुबक गणेश मूर्ती घडविण्याचे काम घरकूल परिवारातील विशेष तरुणी अाणि महिला करीत अाहेत. एखाद्या नामांकित मूर्तिकाराला साजेशा या कलाकृती बघून थक्क व्हायला हाेते. 


प्राैढ विशेष महिला, विद्यार्थिनींसाठी घरकूल परिवाराची स्थापना बारा वर्षांपूर्वी पिंपळगाव बहुला येथे करण्यात आली. विशेष असणाऱ्या या विद्यार्थिनींना नवीन गोष्टी शिकायला मिळाव्या तसेच त्याच्यातील कलागुणांना वाव मिळून समाजाच्या प्रवाहात यावे यासाठी संस्थेच्यावतीने नेहमीच विविध उपक्रम व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार लागावा यासाठी संस्थेच्या वतीने या विद्यार्थिनींना नुकतेच शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मिळालेले प्रशिक्षण व शिक्षिकांच्या मार्गदर्शनाने मानसिकदृष्ट्या अपंग असले तरी एखाद्या व्यावसायिक कलाकाराप्रमाणे या विद्यार्थिनींनी या गणेशमूर्ती साकारल्या. 

 

सुरेख गणेशमूर्ती तसेच त्यावरील रंग, सजावट आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरावे अशाच स्वरूपाचे अाहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थिनींनी शाडू माती भिजवण्यापासून ते त्यावर रंगरंगोटी करत या मूर्ती साकारल्या आहेत. या गणेशमूर्तींना विविध सामाजिक संस्था, संघटना, उद्योजकासह नागरिकांकडून आतापासून मागणी असून आगाऊ नोंदणी केली जात आहे. अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून घरकूल संस्था परिवाराच्या वतीने या विशेष असणाऱ्या महिला, विद्यार्थिनींना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी सचिव विद्या फडके, अध्यक्षा सुनीता अाडके, खजिनदार वैदेही देशपांडे अादींनी विशेष प्रयत्न केले. 


राज्यभरातून या ठिकाणी येतात विद्यार्थिंनी 
विशेष महिलांसाठी निवासी असलेली ही उत्तर महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान न घेता गेल्या बारा वर्षांपासून अशा विशेष मुलींसाठी संस्थेचे कार्य सुरू आहे. यावर्षी संस्थेत राज्यभरातून आलेल्या ५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेच्या वतीने राबविले जाणारे उपक्रम, तसेच तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनामुळे समाजात या मुलींना एक आदराचे स्थान निर्माण झाले आहे. 

 

समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम 
मानसिकदृष्ट्या अपंग असल्या तरी या विद्यार्थिनी व महिलांना शिकण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देऊन समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम अाम्ही करत आहोत. 
-विद्या फडके, सचिव, घरकूल परिवार संस्था

बातम्या आणखी आहेत...